चैत्र सोहळा वसुंधरेचा
चैत्र सोहळा वसुंधरेचा
चैत्र सोहळा वसुंधरेचा, सजधजला नवपालवीने
चैतन्याची चाहूल लागली, हर्षित सृष्टी तनामनाने. !!
कांती चमकली नववधूची, अवनीचे ते रूप गोजिरे
धावत धावत वसंत आला, पूर्ण करण्या स्वप्न अधुरे
लालीने ती सस्मित होई ,चोरटा कटाक्ष लज्जेने
चैतन्याची चाहूल लागली, हर्षित सृष्टी तनामनाने. १
ऊर्ध्ववदन मोगरा फुलला, दरवळ साऱ्या आसमंती
पान पान ही मोहरुन येई, तरारली ती लजवंती
कोकीळ कंठी उठतो सुस्वर, तार छेडीतो प्रसन्नतेने
चैतन्याची चाहूल लागली, हर्षित सृष्टी तनामनाने. २
मोहरून आली कळी हृदयाची, वसंत जागृत होई
एक अनामिक तरल भावना, रंगात रंगुनी जाई
अपूर्व देणे नक्षत्रांचे, डोलते अंतरी तन्मयतेने
चैतन्याची चाहूल लागली, हर्षित सृष्टी तनामनाने. ३