Seema Kulkarni

Tragedy

4.0  

Seema Kulkarni

Tragedy

प्रवास आठवणीतला

प्रवास आठवणीतला

4 mins
156


आज जवळजवळ बारा वर्ष झाली त्या गोष्टीला. ऑगस्ट महिना होता. मुलगा त्यावेळेस सात आठ महिन्याचा होता. वडिलांचे पहिले वर्षश्राद्ध जवळ आले होते. त्यासाठी मला लवकर माहेरी अर्थात पंढरपूरला जायचे होते. पंढरपूर स्टेशन च्या आधी टेंभुर्णी हे गाव लागते. तिथे माझी मोठी बहीण असते. पंढरपूर तिथून दीड तासाच्या अंतरावर आहे. मी तिच्याकडे उतरून तिथून आम्ही दोघी पंढरपूरला जायचे असे ठरले होते. तसा प्रवास नेहमीचाच होता. रात्रीच्या बसने प्रवास क्वचितच होत असे. संध्याकाळच्या वेळेस मुलगा झोपून जाईल, जास्त त्रास देणार नाही, या विचाराने रात्रीचा प्रवास करायचे ठरविले.पण त्याला घेऊन एकटीने प्रवास करण्याचे थोडे टेन्शन आले होते. पण डायरेक्ट बस, बरं इथून बसायचे ते तिथेच उतरायचे, आणि तिथे घ्यायला तर बहिणीच्या घरचे येणारच होते. त्यामुळे काळजीचे कारण नको , या अविर्भावात मी जायला तयार झाले.त्यामुळे संध्याकाळच्या साडेसातच्या बसने मुलाला घेऊन निघायचे असे ठरले. त्याप्रमाणे संध्याकाळची नाशिक सोलापूर बस मध्ये मी बसले. बस सुरू झाल्यावर बहिणीच्या घरी फोन वगैरे करून सांगितले. त्यामुळे प्रवास निर्धास्तपणे सुरू झाला. नशिबाने शेजारी एक लेडीजच होती. त्यामुळे मुलाला मी व्यवस्थित मांडीवर झोपवू शकत होते. म्हणजे अडचण वाटली नाही. रात्री दहा वाजता बस जेवायला थांबली. शेजारची लेडीज ने मला मदत केली. माझे जेवण होईपर्यंत तिने मुलाला सांभाळले. 10 नंतर मात्र बस मधील गोंधळ एकदम शांत झाला. सर्वजण झोपेच्या आधीन गेले. लाईट तर असेही बंदच असतात, संध्याकाळच्या प्रवासाच्या वेळी.


        माझी बस टेंभुर्णी ला पहाटे तीन ते साडेतीन च्या दरम्यान पोहोचणार होती. फोन केला आहे त्यामुळे बहिणीच्या घरचे घ्यायला येणारच या विचाराने मी निर्धास्त होते. पण उतरणार कसे, कोणाची तरी मदत घ्यावीच लागणार होती, कारण माझी बॅग, एका हातात मुलगा असे दोन्ही घेऊन मला उतरणे शक्य नव्हते. टेंभुर्णी जसजसे जवळ यायला लागले तसे मला टेन्शन यायला लागले. माझ्या डोळ्याला डोळा नव्हता. असे ही रात्रीच्या प्रवासात मला बिलकुल झोप लागत नाही.जोरात पाऊसही सुरू झाला होता. कारण रात्र असल्यामुळे एकूण एक प्रवासी गाढ झोपेत होते. त्याचप्रमाणे शेजारची लेडीज ही. पण काहीतरी हालचाल करणे आवश्यक होते. हिम्मत करून त्या लेडीज ला झोपेतून उठवले. जीवावर आले होते पण नाईलाज होता.'ताई ,प्लीज मला उतरेपर्यंत मदत करा,' तशी विनंती त्यांना केली. त्याप्रमाणे बस पहाटे साडेतीन वाजता टेम्भूर्णी आवारात शिरली. तिथे जोराचा पाऊस सुरू होता. रस्त्या रस्त्यावर पाणी साठले होते. शेजारच्या ताईंना सांगितले की तुम्ही बाळाला सांभाळा ,मी बॅग घेऊन खाली उतरते. मग तुम्ही बाळाला माझ्याकडे द्या. टेंभुर्णी स्टॅंडवर फारसे प्रवासी उतरणार नसल्यामुळे, आणि जोरात पाऊस सुरू असल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना याप्रमाणे बस आत स्टॅन्डमध्ये गेलीच नाही. ‌ बस स्टँड च्या बाहेरच उभी राहिली. मी पटकन बॅग घेतली. आणि खाली पावसामुळे पाणी साठले होते तरीही तिथेच बॅग ठेवली. आणि त्या ताईंनी बाळाला माझ्या कडे दिले. पावसापासून बचावासाठी आमच्याकडे काहीच नव्हते. तरी उतरताना, कंडक्टरने माणुसकीने विचारले, ' कशा काय जाणार घरी? मी सांगितले की घरचे घ्यायला येणार आहेत. ' आणि माझ्याबरोबर त्यां स्टॅंडवर एक माणूस उतरला. थोडी भीती पण वाटली आणि थोडे बरे पण वाटले. आम्हाला उतरून बस लगेच निघून गेली. तालुक्याचे गाव होते त्यामुळे परिसर पूर्ण निर्मनुष्य होता. बस थांबली ते ठिकाण आणि स्टॅन्ड पाच मिनिटाचे अंतर होते. कडेवर बाळा झोपला होता. त्यात पावसाचा रुद्रावतार, कशी काय, त्या माणसाला माझी दया आली. विचारपूस केली, त्याने माझी बॅग उचलली आणि पुढे जाऊन स्टँड च्या बाकड्यावर नेऊन ठेवली. आणि तो निघून गेला. पूर्ण बस स्टँड च्या आवारात आम्ही दोघेच होतो. तोपर्यंत बाळा पण जागा झाला होता. मस्त खेळायला लागला. त्याही परिस्थितीत माझ्या चेहऱ्यावर हास्य आले. त्याला उभे केले आणि अवघडलेला हात मोकळा केला. पटकन पर्स मधून फोन काढून लावला. तर बहिणीच्या घरी कोणी उचलायलाच तयार नाही. राग यायला लागला, चिडचिड होत होती ,रडायलाही येत होते. भीती वाटायला लागली होती. त्यांनाही गाढ झोप लागून गेली होती. सतत फोन करता करता दहा मिनिटांनी फोन उचलला गेला. सांगितलं , लवकर या. ते येईपर्यंत जिवात जीव नव्हता. जेव्हा त्यांची गाडी बघितली आणि हायसे वाटले. ते दहा मिनिट मी मोठ्या विचित्र मनस्थितीत काढले. सगळ्या संमिश्र भावना एकत्र दाटल्या होत्या. नंतर घरी गेल्यावर काय झाले असेल, याचा अंदाज करू शकता. शेवटी त्या त्या प्रसंगाची गंभीरता, जो अनुभवतो त्यालाच जास्त असते. एक तर मध्यरात्री पोहोचणं, त्यात त्यांचे उशिरा घ्यायला येणे, छोटा बाळ बरोबर, आणि त्यात भर म्हणून पाऊस, बसच बाहेरच थांबणं. सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्या होत्या.


      ‌ पण तेव्हापासून कानाला खडा लावला. एक तर रात्रीचा प्रवास करायचा नाही. केला तरी आपल्या आपल्या हिमतीवर करायचा. न घाबरता, कोणावर अवलंबून न राहता आपली सोय आपण करायची. कारण रात्र आहे, तर झोप ही प्रत्येकाला अनावरच होते. त्यामुळे शंभर टक्के दोष कोणालाही देता येत नाही. कायमस्वरूपी ही प्रवासाची आठवण मनावर कोरली गेली. आठवण आली की आजही अंगावर काटा येतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy