तो पाऊस
तो पाऊस


तो पाऊस * तनामनाला साद घालणारा अंगावर शिरशिरी आणणारा
तो पाऊस
माझा बालपणीचा सोबती ,सवंगडी त्याच्या साथीने पावसात स्वतःभोवती गोल गोल गिरक्या घेत नाचले व त्याला पैशाचे आमिष दाखवून
येरे येरे पावसा तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा...
ये ग ये ग सरी माझे मडके भरी
सर आली धावून मडके गेले वाहून असं गाणं देखील म्हटले.
पुढे कळत्या वयात सर आली धावून च्या ऐवजी सर आले धावून मॅडम गेल्या वाहून असा पांचट जोक पण मारलाय.
तो पाऊस त्याच्या साक्षीने तारुण्याचे उमाळे अनुभवलेत, दोघे एका छत्रीतून जाताना होणारे त्याचे निसटते आणि नंतर जाणून-बुजून केलेले स्पर्श, ओघळत्या पावसात त्याने घेतलेले चुंबन करकचून मारलेली मिठी सारच काही एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारं..
तो पाऊस त्याच्या साक्षीने सोसलेले गरिबीचे चटके ,शाळेत जाताना डोक्यावर बारदाना चा रेनकोट व हातातली वह्या पुस्तके पावसापासून वाचवत चिखलात अनवाणी पायाने केलेला प्रवास,
गावी या दिवसांना पडीचे दिवस म्हणतात.
शेतात काही नसते हाताला काम नसते त्यामुळे आधीच केलेली बेगमी पुरवून पुरवून वापरायची असते अशावेळी नकोसा होतो तो पाऊस..
तो पाऊस लग्नाच्या वेदीवर चा प्रवेश, ती मंगळागौर, ती शिवामूठ, आयुष्यातले ते जादुई दिवस पुढे लहान मुले पावसापासून त्यांना जपण्याचे दिवस, त्यांच्यासोबत पन्हाळी खाली भिजण्याचे त्यांना पावसाचा आनंद देण्याचे दिवस, पावसाळी पिकनिकचे दिवस..
तो पाऊस कधी धो-धो पडणारा अक्राळ विक्राळ रूप घेणारा..
कधी डोळ्यातून बरसणारा, कधी मनात खदखदणारा ,रुद्र रूप धारण करणारा परिस्थितीच्या रेट्यातून एकमेकांची साथ निभावत पार केलेला कधी जवळ येण्याचा तर कधी रागाने दूर जाण्याचा..
तो पाऊस,
26 जुलै चा दुसरा प्रलयच जणू! होतं नव्हतं ते वाहून नेणारा पुन्हा कोऱ्या पाटीवर रेघोट्या ओढायला शिकवणारा, पुन्हा नव्याने सारे उभे करायला लावणारा त्यावेळी अगदी नकोनकोसा..
तो पाऊस
आता शांत झालाय थंड पडला, विझलेल्या अग्निकुंडा सारखा.. परतीची वाट चालणारा. आता नेमेचि येतो मग पावसाळा असे न म्हणता, आता नाही येणे जाणे असे म्हणायला भाग पडणारा जणू काही साऱ्यात त्रिखंडातला प्रलयच.