STORYMIRROR

Jayshri Dani

Action

4  

Jayshri Dani

Action

तंट्या बिल्ला : आदिवासी वीर

तंट्या बिल्ला : आदिवासी वीर

3 mins
410


        माझ्या अगदी लहान वयातच माझा टंट्या -बिल्ला (तंट्या भिल्ल) या व्यक्तीरेखेशी परिचय झाला. मला वाटायचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या गावी राहणाऱ्या आम्ही मुलांनीच टंट्या पाहिलाय. गणपती आणि मोहरमच्या उत्सवात टंट्याच्या मिरवणुका निघत. पण मग अमरावती आणि विदर्भाच्या आसपासचे लोकही टंट्याच्या मिरवणुकीबद्दल सांगत. तेव्हा वाटे टंट्या पूर्ण देशालाच माहिती असावा.  

      टंट्या-बिल्ला म्हणजे भव्य दिव्य मिरवणुकीत वाघाची रंगरंगोटी केलेला एक मनुष्य. त्याला संपूर्णतः साखळदंडानी चारहीबाजूंनी जखडलेले असे. त्याला जेरबंद करणारे लोक त्याला पूर्ण शक्तीनिशी आपल्याकडे ओढत आणि तो तरीही तसाच सहज उभा राही. त्यावरून आकळले की टंट्या म्हणजे एक अचाट शक्तीचा पुरूष. वाघाची वेशभूषा म्हणजे कर्मानेही अतिशय शूर असावा. वाघाने लिलया शेपटी हलवावी तसा टंट्या मनात येईल तेव्हा सपासप आपल्या अंगावर चाबकाने फटके मारून घेत. त्याच्या एकएक फटक्याच्या आवाजासरशी आमची भीतीने गाळण उडे आणि त्याचे रक्तबंबाळ शरीर पहायचे अवसानच उरत नसे. 

    वाघ कसा मुक्तपणे वावरतानाच शानदार दिसतो . पिंजऱ्यातला वाघ पाहताना तितकिशी मजा येत नाही तसेच या बंदीवान टंटयाला पाहून वाटे. साखळदंडात अड्कलेला त्याचा बलशाली मस्तमौला देह पाहून नकळत एक करुणा मनात पाझरत राही.

   टंट्या चांगला की वाईट ? टंट्या नेमका कोण ? पुरूष की नृसिंहासारखा एखादा अवतार असे अनेक प्रश्न पड़े. आजोबांसारख्या वयस्क लोकांना जेव्हा मी याबाबत विचारी तेव्हा टंट्याबद्द्ल सांगताना त्यांच्या डोळ्यात अद्भुत झाक दिसे. माझ्या जन्माच्या वेळी टंट्या ही एक आख्यायिका होती, टंट्या ही एक दंतकथा होती. कित्येक पिढ्यांनी न पाहिलेली व्यक्तिरेखा होती. पण माझ्या आजोबांच्या लहानपणी टंट्या हा नुकताच सरून गेलेला भूतकाळ होता. त्यांच्या आधीच्या एकदोन पिढ्यांनी खरा टंट्या पाहिलेला होता. टंट्या-बिल्ला हे आमच्या पिढीपर्यंत ,आमच्या गावापर्यंत आलेले "तंट्या--भिल्ल " या नावाचे अपभ्र्रंश रूप.

     तंट्याचा जीवन कार्यकाळ सन 1840 ते 1890 मानला जातो. काही पुस्तकात 1842 चा जन्म असल्याचाही उल्लेख आहे. स्थळकाळदर्शनाची पुरेशी किंवा तंतोतंत कागदपत्र उपलब्ध नसल्याने संभ्रम आहे. काहींच्या मते मध्यभारतातील नेमाड़ या गावी तर काहींच्या मते खंडवा जिल्ह्यातील एका खेड्यात तंट्याचा जन्म झाला. भाऊसिंग हा त्याचा आदिवासी शेतकरी गरीब भिल्ल पिता. तेव्हा डोंगरदऱ्या, रानावनात भिल्ल, गोंड, कोरकू व रानटी टोळ्यांचे वास्तव्य होते. त्यांचे जीवन निसर्गाशी निगडीत आणि समरस होते.

   बालवयातच तंट्याच्या धैर्य,बुध्दी ,

तल्खपणा आणि असामान्य मनोबळाचा भिल्लांना परिचय झाला. वयाच्या चोविसाव्या वर्षी एका महाकाय संतप्त रेड्याला त्याने क्षणभरातच खाली लोळवून अचाट शक्ती सिद्ध केली. तोवर ब्रिटिशांनी व्यापाराच्या नावावर भारत बळकवायला सुरूवात केलेली होती. आदिवासी समाजाचे जनजीवन असलेल्या जंगलावर जेव्हा इंग्रजांनी मालकी हक्क सांगून कर लावला तेव्हा आदिवासी पेटून उठले. तंट्या आणि त्याचे वडिलही मालगुजार, जमीनदार, शेतमालकाच्या शोषणाला त्रासले होते.  

    सत्य ,सहनशीलता घेवून निसर्गाच्या संगतीत राहणाऱ्या आदिवासींना अन्याय सोसवेनासा झाल्यावर तंट्याने उठाव केला. इतर आदिवासींच्या तुलनेत तो धनुष्यबाण मारण्यात आणि भालाफेकीत अतिशय निष्णांत होता. खरेतर तो आपल्या समाजाच्या हक्कासाठी आदिवासींचा म्होरक्या बनला परंतू इंग्रजांनी व सावकारांनी त्याला दरोडेखोर घोषित केले. त्याला पकड़ायला बक्षिस लावले.   

    छळवादी सावकारांना लुटल्यानंतर तो स्वतःजवळ कधीच लुटीचा माल ठेवत नसे. मुक्तहस्ते गोरगरीब व समाजबांधवांना वाटून टाकी. तो गरजूंचा मसीहा होता. डोंगरदऱ्यात त्याच्याप्रती आदर,भक्तीभाव ,मान होता. आपल्याला "मामा " म्हणून संबोधणे त्याला विशेष आवडे. इतरांच्या जगण्याचा तुल्यबळ आधारस्तंभ बनत तो अतिशय संस्मरणीय जीवन जगला. 

    आपल्या कुटील मनसुब्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या तंट्याला पकड़ायला इंग्रज जंगजंग पछाडत होते. अनेकदा हुलकावणी दिल्यावर शेवटी विश्वासघात करून तंट्याला पकडण्यात इंग्रजांना यश आले. 1890 मध्ये त्याला जबलपूर येथे फाशीची शिक्षा झाली. त्याआधी या बलाढ्य इसमाला (किंवा इंग्रजांच्या लेखी असलेल्या गुन्हेगाराला ) आपण कसे हातोहात पकड़ले आणि आपले अंकित केले हे दाखवायला राज्यकर्त्यांनी त्याची साखळदंडात बंदिस्त अशी मिरवणूक काढली.

    तंट्याची अटक म्हणजे आपली अटक ,

आपली हार या विचारांनी आदिवासी समाज पुन्हा गर्भगळीत झाला. आणि देशासोबतच रानावनात हातपाय पसरायला इग्रजांना अधिकच बळ मिळाले. 

  सुप्रसिद्ध लेखक श्री. बाबा भांड यांनी तंटया बिल्लावर कादंबरी लिहून तंट्याच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला. श्री. विश्वनाथ देशपांडे यांचेही अनुवादित पुस्तक प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यलढ्यातील पहिला आदिवासी वीर म्हणून तंट्या भिल्लाला इतिहासात योग्य स्थान मिळावे अशी अपेक्षा आणि धडपड दोन्ही लेखकांनी व्यक्त केली आहे. इंग्रजांनी जरी त्याला एक कुख्यात दरोडेखोर म्हणून घोषित केले असले तरी प्रत्यक्षात तो एक सच्चा इमानी जननायक होता. 

          त्याच्या मृत्यूनंतर जेव्हाजेव्हा सण उत्सव येत तेव्हा तेव्हा त्याच्या गौरवाप्रित्यर्थ समाजबांधव मिरवणुकीत वाघाच्या प्रतिकाचा उपयोग करत. जेरबंद होवून मातीत मिसळला असला तरी तो त्यांचा निधड्या छातीचा मोठ्या दिलाचा वाघ होता. अद्यापही महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील बऱ्याच भागात टंट्या-बिल्लाच्या मिरवणुका निघतात. मोठ्याप्रमाणात त्याच्यावरील वीररसपूर्ण लोकगीत गायल्या जातात. देहरूपाने निघून गेलेला तंट्या भिल्ल लोकगीत व मिरवणुकीच्या स्वरूपात अशातऱ्हेने आजही जनमानसात अजरामर आहे. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Action