ती वाट बघत्येय
ती वाट बघत्येय


शुभम आज ऑफिसमध्ये टेबल वरचे काम घाई घाईनेच उरकण्याच्या तयारीत होता. रोज उशिरापर्यंत थांबणारा शुभम आज सारखा घड्याळाकडे बघत होता. त्याला आज लवकर घरी जायचे होते. उद्याची रजाही टाकायची होती. आज त्यांच्या लग्नाचा वर्षपूर्तीचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी त्यांच्या लग्नाचा प्रथम वर्धापन दिन होता. त्यानिमित्त शुभांगीला घेऊन बाहेर फिरायला जायचा बेत त्याने आखलेला होता.
सकाळीच ऑफिसला निघतांना शुभांगीने त्याला दुपारी लवकर यायला सांगितले होते. दुपारी लंच टाइम मध्ये शुभमने मॅनेजरच्या कॅबिनमध्ये जाऊन दुसऱ्या दिवशीची रजा मंजूर करून घेतली. मॅनेजरनेही लग्नाच्या वाढ दिवसा निमित्त त्याला शुभेच्छा देऊन रजा मंजूर केली. मात्र आजच्या शॉर्ट लिव्ह बद्दल जेव्हा त्याने विषय काढला तेव्हा नकार दिला. उलट दुसऱ्या दिवशीचे काम आज उशिरा पर्यंत थांबून पूर्ण केले तरच दुसऱ्या दिवसाची रजा घेता येईल हेही सांगितले. त्याचाही नाईलाज झाला. म्हणजे आज त्याला लवकर जाता येणार नव्हते. त्याने फोन करून शुभांगीला तसे कळवले आणि आपल्या कामाला लागला.
शुभमचा फोन आला तसा प्रथमतः शुभांगीचा मूड खराब झाला. मात्र सुटीची परवानगी मिळाल्याचे कळल्यावर ती पुन्हा उत्साहाने कामाला लागली. शुभमला उशीर होणार असल्यामुळे ती सामानाची आवरा आवर करू लागली. बॅगा भरून ठेवल्यावर तिने स्वयंपाक केला आणि शुभमची वाट पहात बसली. शुभम आल्यावर दोघांनीही पटकन जेवण उरकले आणि लगेच बेडरूम मध्ये झोपायला गेले.
सकाळी भल्या पहाटे उठून शुभम आणि शुभांगी रस्त्याला लागले. शुभम आज भलताच रोमँटिक मूडमध्ये होता. किशोर कुमारची सदा बहार नगमे शांत आवाजात सुरू होते. त्या आवाजात तोही गात होता. सोबतच शुभांगी सोबत गप्पाही सुरू होत्या. बराच वेळ झाला गाडी आणि गप्पा सुरु होत्या. पोटात भूकही लागली होती. शुभमने एक रस्त्यावरील छानसे हॉटेल बघून गाडी थांबवली. सुंदर झाडी, फुलझाडे, हिरवळ, अशा त्या निसर्गरम्य हॉटेलमध्ये दोघांनी मस्तपैकी नाश्ता केला. वर्दळ अशी फारशी नव्हती. निवांत बसून थोडा आराम केला.
त्या हॉटेल मधील आजू बाजूच्या सह प्रवाशां सोबत गप्पाही मारल्या. त्या गप्पां मध्येच त्यांना बालमटेकडी विषयी बरीच माहिती मिळवता आली. तिथल्या निसर्ग सौंदर्या बरोबरच अनेक दंतकथाही ऐकायला मिळाल्या. ते एक निसर्गरम्य ठिकाण होते. बाजूला खळखळ वाहणारी नदी, एका बाजूला उंच डोंगर. दुसऱ्या बाजूला खोल दरी. टेकडीवर मस्त सपाट मैदान, त्यावर निसर्गतः असलेली हिरवळ, छोटी छोटी झाडे जणू सावलीसाठी मुद्दाम कुणीतरी लावून ठेवली आहेत. तेथेच देवीचे एक भव्य,सुंदर, प्रशस्त, परंतु पुजाऱ्यांविना ओस पडलेले मंदिर. खूप दिवसां पासून तिथे पूजा अर्चा न झाल्यामुळे ती देवीची रागीट मूर्ती आणखीच भेसूर दिसते. त्या मुळे तिथे कुणी फारसे जात नाहीत. अशी बरीचशी माहिती त्या सह प्रवाशां कडून मिळाली. एक दोघांनी तिथे न जाण्याचा सल्लाही दिला. तरी पण त्या दोघांच्या तिथे जाण्याचा निर्णय काही बदलला नाही. एक तासाभरात ते तेथे पोहचू शकत होते म्हणून ते निघाले. या साऱ्या चर्चेमुळे बालमटेकडी विषयी दोघांच्या मनात कुतूहल जागे झाले होते. ते रस्त्याला लागले.
एक तासात दोघेही बालमटेकडीवर पोहोचले होते. एका झाडाखाली गाडी उभी केली. टिफिन, वॉटर बॉटल, बसण्यासाठी सतरंजी काढून गाडी बाजूला व्यवस्थित पार्क करून ठेवली. एका झाडाखाली जागा स्वच्छ करून सतरंजी अंथरली आणि तेथे बाकीचे सामान ठेवले. दोघेही थोडावेळ थंड सावलीत बसले.
"शुभांगी, मला आठवतं, आपल्या लग्नाला येतांना आमच्या बैलगाड्या गावा जवळ अशाच एका झाडाखाली थांबल्या होत्या. बाजूला एक झोपडीवजा घर होतं. त्या घरात तू भात खायला आलेली होतीस. भात खाऊन निघालीस त्यावेळी अचानक आपली नजरानजर झाली, तेव्हा तू काय झक्कास लाजली होतीस. व्वा! मी तर एकदम घायाळचं झालो होतो." शुभम लग्नाचा दिवस डोळ्यांपुढं पहात होता.
"माझे काय हाल झाले ते माझे मलाच माहीत. घरी जाई पर्यंत मैत्रिणींनी किती त्रास दिला मला." तीही गोड आठवणींच्या डोहात शिरली होती.
अशाच काहीशा गप्पा मारत बराच वेळ पर्यंत दोघे बसले होते. भूक लागली तसे ते दोघेही उठले, एका झाडा खाली जागा स्वच्छ करून जेवणासाठी बसले. हसत खेळत, एकमेकांना घास भरवत दोघांनी जेवण केले. आणि थोडी विश्रांती घेण्यासाठी दोघांनीही अंग टाकले. डोके शुभमच्या मांडीवर ठेवून शुभांगी लगेच शांत झोपली.
मांडीवर झोपलेल्या शुभांगीचे डोके अलगद बाजूला करून शुभमने हळूच मांडी काढून घेतली. आणि तो त्या भग्न मंदिराकडे गेला. त्या मंदिराविषयी ऐकले ते त्याला पडताळून पाहवेसे वाटत होते. तिथले दृश्य बघून त्याने तिथल्या छोट्या झुडुपाच्या काड्या जमा करून त्याचा खराटा बनवला आणि झाडायला लागला. वाळलेल्या पानांचा आवाज भेसूर वाटत होता. वटवाघळाची पिल्ले उगाच इकडून तिकडे उडू लागली. मूर्तीवर खूप कचरा पडलेला होता. त्यामुळे मूर्ती भेसूर दिसत होती. 'शुभांगी झोपली हे बरेच झाले नाही तर ती इथे येऊन घाबरलीच असती,' शुभमच्या मनात आले.
इकडे शुभांगीला थोड्याच वेळात जाग आली. कुणी तरी बाजूच्या बागेत फुलं वेचत होतं. फुलं वेचता वेचता गुणगुणतही होतं. तिचं ते आवडतं गीत होतं...
*दिसते मजला सुखचित्र नवे*
*मी संसार माझा रेखिते*
शुभांगी आवाजाच्या दिशेने गेली. तिच्याच वयाची कुणी सुंदर स्त्री ते गीत गात होती. आपल्याच मस्तीत गात असलेल्या त्या स्त्रीला शुभांगी निरखून पहात होती. भगवंताने निश्चितच तिला अगदीच निवांत वेळेत घडवले असावे. पाहता क्षणी कुणीही प्रेमात पडावं असं रूपसौंदर्य लाभलेली ती लावण्य लतिका तल्लीन होऊन, जगाचे भान विसरून गीत गात होती. तो आवाज अगदी तिच्या अंतःकरणा मधून पाझरत असावा तसा येत होता. शुभांगी मंत्रमुग्ध होऊन तिला पहात होती, गीत ऐकत होती. अचानक विणेची तार तटकन तुटावी तसा आवाज बंद झाला. तिने शुभांगी कडे बघितले स्मितहास्य केले. त्या स्मिताने शुभांगीला तिच्या अगदी जवळ नेऊन पोहोचवले.
"कोण तू? इथे कशी आलीस?" तिने शुभांगीला प्रश्न केला.
"मी शुभांगी. तुझे नाव काय? इथेच राहतेस का?" शुभांगीने विचारले.
"होय मी इथेच राहते, एकटीच राहते." तिने उत्तर दिले.
"किती सुंदर गातेस. खूप आवडते का तुला हे गीत? मला तर खूप आवडते. कधीपासून गातेस?" शुभांगी मूडमध्ये आली होती.
"सारे एकदम ऐकणार आहेस का? कधी तरी सांगेन पुन्हा भेट झाल्यावर." ती उत्तरली. 'तुला आवडते म्हणून तर तुझी माझी भेट झाली. आणखीही होईल.' असे काही तरी मनातल्या मनात बोलत तिने शुभांगीला विचारले, ...
"तू एकटीच आलीस का?"
तिच्या या प्रश्नाबरोबर शुभांगी एकदम दचकली. 'अरेच्या! मी एकटीच आले. शुभम शोधत असेल मला.'
"आम्ही दोघे आलेलो आहोत. मला झोप लागली होती. उठले तर माझे पती दिसले नाही, तेवढ्यात तुझा गोड आवाज आला अन् मी इकडे आले. आम्ही लग्नाचा वाढ दिवस साजरा करायला आलो होतो. खूप उशीर झाला, मला निघायलाच पाहिजे आता." शुभांगी भांबावली होती. तेवढ्यात शुभम येतांना दिसला.
"ठीक आहे. ये पुन्हा कधी तरी. भेटू पुन्हा." ती म्हणाली.
"अगं शुभांगी, इथे काय करतेस? केव्हाचा शोध घेतोय तुझा. चल बराच उशीर झालाय. कुणाशी बोलतेस तू?" शुभमचा आवाज आला तसे तिने मागे वळून बघितले.
"तू दिसला नाहीस मी इकडे आले. इथे एक स्त्री खूपच मंजुळ आवाजात गात होती, माझे आवडते गीत. तिचा आवाज ऐकून मी इकडे आले. आम्ही चांगल्या गप्पा मारत होतो. ती बघ किती सुंदर आहे?" असे म्हणत शुभमला दाखवण्यासाठी तिकडे वळली. ती तिथे नव्हती. गायब झाली होती. तिथल्या त्या झाडाजवळ एक बोर्ड दिसत होता....
*मी वाट बघत्येय*
"अरे, कुठे गेली ही? आत्ता तर होती इथे?" शुभांगी आश्चर्यचकित झाली होती.
"जाऊ दे. तुला काही तरी भास झाला असेल. चल आधीच उशीर झालेला आहे. असे म्हणत त्याने जवळ जवळ ओढतच शुभांगीला गाडी जवळ आणले, गाडीत बसवले आणि तो वेगाने तिथून निघाला. गाडी घराच्या दिशेने पळत होती. शुभांगी मात्र अजूनही मनाने तिथेच घुटमळत होती. तिचे ते गायब होणे, त्या ठिकाणी तो बोर्ड दिसणे, या सगळ्या गोष्टी तिच्या मनाला तिथे खिळवून ठेवत होत्या.