सुट्टी
सुट्टी


आई , उद्या परिक्षा संपणार माझी ..
हो ..मग ?
कधी जायचं ..?
बाबांना विचार .....
तू विचार ना ...
असं काय ग करतेस ... तूच विचार ना .... उद्याच जाऊया का म्हणून ..
बघते ....जा आता ...अभ्यास कर ..... पर्यावरणचा पेपर आहे ना उद्या ?
हो ...पण त्याचा कसला अभ्यास करायचा ? येतयं मला सगळं .... अभ्यास पण पुर्ण झालाय माझा आधीच ....
उद्या जायचयं ना पुण्याला ? विचारू नको का बाबांना ...
हां अगं थांब , तो शेवटचा प्रश्न राहिलाय थोडा ..करुन टाकतो पटकन ...
जा पळ .... मी नंतर घेते तुझा अभ्यास ...
हो जातो .
संध्याकाळी -
उद्या परिक्षा संपत्ये रावसाहेबांची ....
हो मग ?
सुट्टी लागणारे ना ..... जाऊ दे का पुण्याला ?
नको .... मस्ती करतो तो फार .. आई म्हणाली होती मागच्यावेळी मला ..... सारखा बागेत न्यायचा हट्ट् करत बसतो ...... या वर्षी इथेच राहू दे सुट्टीत ...
बाबा , जाऊ द्या ना हो ..... 2 महिने इथे काय करू नुसतं बसून ?
नकोच ते ......
असं काय करता हो बाबा .... जाऊ द्या ना ...
एकदा नाही म्हटल्यावर कळतं नाही का ??
बाबा , आजी मला म्हणालेली की ती तुम्हाला बांधून ठेवायची म्हणून .... फार मस्ती करायचात म्हणून ..खरं आहे का हो ...??
............ रात्रीच्या गाडीने जाणारात ना ? उद्या सकाळी तिकीटं काढून आणतो .....
आई बाजूला गेल्यावर हळूच ...
अजून काय काय सांगितलं रे आजीने ?
फोडणी गरम झाल्यावर पाणी का टाकलं होततं हो ?
ह्या ह्या ह्या ....उगाच रे ... जा आता खेळायला ...
बॅग भरली का उद्याची ?
नाही ...आई भरणारे ...
हां .... ठीकै ....
परिक्षेवरून आल्यावर संध्याकाळी -
आई तो काळा शर्ट पण दे ना आणि तो वॉटरकलर चा डबा पण ..... आज्जी ने दिलेला ....
हो देते ...... पण मागच्या सारखी रंगरंगोटी करू नकोस ... नवी रंगवलेली भिंत खराब केलीस मेल्या ....
खराब कुठे अगं ? नुसतं पुणे एवढंच तर लिहिलं होतं मी ...
मग तु लिहीण्याच्या आधी पुणं नव्हतं का ......की तू ते लिहील्यावरच पुणं पुणे म्हणून ओळखायला लागलं ?
आला मोठा शहाणा ..... बारसं करणारा ...
..........परत नाही लिहीणार आता .....
गुडबॉय .....ही घे बॅग ... बाजूला ठेऊन दे .....
_____________________________________
रात्री 9.30 च्या गुहागर - पुणे गाडीने रावसाहेब उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी पुण्याला आजीकडे रवाना व्हायचे .......
गेले ते दिवस ..... राहिल्या फक्त आठवणी ....