'तें' दिवसच्या निमित्ताने ...
'तें' दिवसच्या निमित्ताने ...


गेल्या 5-6 वर्षांपासून मी मुंबईत नियमित ये - जा करतो आहे . गेली दोन वर्षें शिकायलाही होतो . पण म्हणावी तशी मुंबई फिरलो नाही किंवा बघायला अनुभवायला मिळाली ती ही अगदी वरवरची . गिरगावात MTच्या ब्रँच च्या आजूबाजूला असणारा परिसर खरी मुंबई म्हणून माहीत होता . विद्यापीठात असताना तुळशीच्या लग्नाच्या निमित्ताने समीर दादाच्या हरहरवाला चाळीत जाऊन आलो होतो तेव्हा बहुसांस्कृतिक चाळ संस्कृती तेव्हा कुठेशी कळायला लागली होती . ताडदेव भागात काही निमित्ताने जाणं व्हायचं तेव्हा जुन्या पांढरपेशी चाळी बघायला मिळाल्या . बाकी आमची मुंबई म्हणजे विलेपार्ले दादर चर्चगेट (मरीन ड्राइव्ह ) काहीवेळा कुलाबा ( स्पष्ट सांगायचं तर श्रीकृष्ण आणि बडेमियाँ ला गेल्यावर ) . बाकी सगळं आयुष्य लोकलच्या प्रवासातच .
एक दोन प्रसंग मात्र चांगले आठवतायत .
त्यातला पहिला - गेल्यावर्षी गणपतीत गिरगाव ब्राह्मण सभेत ' चतुरस्त्र सावरकर ' असा सावरकरांनी लिहिलेल्या गीतांचा एक कार्यक्रम केला होता .रात्री उशीर होणार असल्यामुळे गिरगावातच मित्राकडे राहिलो होतो .चाळीत राहूनही कुठेही अडचण वाटली नाही एवढी प्रशस्त जागा .सकाळी लवकर उठून गिरगावतच नेहमीच्या ठिकाणी नाश्ता करायला गेलो होतो तेव्हा अगदी क्षणभर का होईना पण मुंबई दिसली होती .
आणि दुसरा - MT मधे असताना भायखळा ( माझगाव ) ब्रँच ला जाणं व्हायचं तेव्हा . तिथेही काही प्रमाणात अजूनही जुन्या मुंबईच्या काही खुणा आढळतात . तेव्हा ती लोकांचे स्वभाव , खाण्या-पिण्याच्या सवयी अशा माध्यमातून दिसली .
_______________________________________
गेल्या दीड तासात सलगपणे ' तें ' दिवस वाचून काढलं . सुरवातीलाच मुगभाट ,कांदेवाडी कृष्णाजी भिकाजी चाळ वगैरे शब्द वाचल्यावर एकदम पुलंचीच आठवण झाली . नंतर नंतर मात्र 25 -35 सालची मुंबई डोळ्यासमोर उभी राहिली . अनेकवेळा जुन्या मुंबईचे बघितलेले फोटो , ऐकलेली वर्णनं , किस्से झर्रकन डोळ्यासमोरून गेले . तेंडुलकरांच्या लिखाणात असलेली सहजता फार सोप्या पद्धतीने तत्कालीन लोकांची , त्यांच्या राहाणीमानाची , सवयींची , त्या काळच्या समाजाच्या विचारसरणीची चित्रं डोळ्यासमोर उभी करते.
वडिलांनी मुंबई सोडून कोल्हापूर आणि काही काळाने कोल्हापूर सोडून पुण्यात स्थायिक होण्याचा घेतलेला निर्णय , त्या काळातल्या लेखकाच्या आयुष्यात घडलेल्या बऱ्यावाईट घटनेचे कवडसे उमटवून जातात .
स्वातंत्र्यपूर्व काळ असल्याने अर्थातच त्या काळच्या प्रचलित विचारधारा , त्यांचे संघर्ष आणि या सगळ्यांपासून अलिप्त असणारा एक सर्वसमावेशक असाही एक समाज वेगळा जाणवतो . लेखकाच्या शाळेतले शिक्षक, त्याचे शिक्षण , संघाच्या , कम्युनिस्ट पार्टीच्या बौद्धिक वर्गाच्या गोष्टी , 14 ऑगस्टचा किस्सा , गांधीहत्या , पुण्यातल्या ब्राह्मण कुटुंबाची जाळलेली घरे , त्या काळच्या लोकांच्या साहित्य ,कला ,नाट्य या सगळ्यांच्या अभिरुची , नवश्रीमंत वर्ग , वसंतदादा पाटलांच्या घेतलेल्या खाजगी मुलाखतीत ब्राह्मण समाजाच्या घरं जाळण्याचा प्रसंगावरची त्यांची प्रश्नोत्तरे , सिनेमाच्या चलतीच्या काळात मरीन लाईन्सच्या मैदानात होणारे नाट्य महोत्सव ;त्यातल्या गमतीजमती ;त्या काळचा प्रेक्षकवर्ग , पांडेचा किस्सा हे प्रसंग जास्त लक्षात रहातात .
पण सगळ्यात जास्त वेगळेपण जाणवतं ते पुस्तकाच्या सुरवातीला दिलीप माजगावकर यांची तब्बल बत्तीस पानांची प्रस्तावना . माजगावकरांना तेंडुलकर जसे भेटले , जसे बोलले , जसे वागले तसे तेंडुलकर त्यांनी सांगितले आहेत .म्हणूनच की काय ती सरधोपट पद्धतीने प्रस्तावना न वाटता एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबद्दची करून दिलेली अल्प ओळख अशी वाटते . पण हे पुस्तक तेंडुकरांच्या आयुष्यातल्या पहिल्या जेमतेम सोळा ते अठरा वर्षांच्या अनुभवाचं आहे . त्यामुळे पुस्तकाच्या शेवटी अजून थोडं वाचायला मिळालं असतं तर बरं झालं असतं हा विचार राहून राहून येतो .
पुस्तकातलं सर्वाधिक भावलेलं वाक्यं -
' भूतकाळ ' मनातच बरा असतो . तो प्रत्यक्षात पुन्हा भेटणे खरे नसते . कारण तो 'तो ' भूतकाळ उरलेला नसतो .
© आदित्य शेखर कुलकर्णी