Aditya Kulkarni

Classics

3.7  

Aditya Kulkarni

Classics

सनाथ असूनही अनाथ !

सनाथ असूनही अनाथ !

2 mins
1.3K


सकाळची घटना . नाश्ता आटपून रूमवर चाललो होतो . कोतवाल गार्डन समोरच्या बसस्टॉप मागे सत्तरीचा वृद्ध गलितगात्र होऊन पडला होता. अंगात फुल बंडी, खाली लुंगी.रस्त्यावरचा सगळा कचरा बंडीला लागल्यामुळे बंडी मळकटलेली. दोन्ही पायावर मरणाची सूज. तोंडावर आलेला साधा वर्तमानपत्राचा कपटाही त्याला दूर करता येत नव्हता. भरीस भर म्हणजे त्याच्या डोक्याशी थंड पाण्याची छोटी बाटली भरून ठेवली होती पण हाताला कंप सुटत असल्यामुळे बाटलीतलं पाणी पिताना ते त्याच्या तोंडात कमी आणि कपड्यांवरून जास्त ओघळत होतं. बाजूला एक पोरगा त्याचं निरीक्षण करत होता म्हणून मीही थांबलो. वृद्धाला नीट बोलताही येत नव्हतं .त्याला सरळ बसवून विचारायचा प्रयत्न केला तर अर्धवट मराठी - हिंदीत त्याने त्याच्यासोबत त्याचा भाचा असल्याचे सांगितले. तो कुठे गेला विचारलं तर म्हणाला इथे बसवून मगाशी निघून गेला. काहीही विचार न करता त्यांना उचललं आणि कोपऱ्यात बसवलं. उचलताना तो म्हणत होता, माझ्याकडून कोणीही येणार नाही. बायको, भाऊ, पोरगा आहेत, पण माझ्याकडे बघणारं कोणीही नाही. ऑफिसला जायची घाई असल्यामुळे तिथेच बसलेल्या एका ताईंना लक्ष द्यायला सांगून मी पुन्हा रूमवर आलो. आवरून खाली येईपर्यंत तो वृद्ध तिथून निघून गेला होता . ताईंना विचारलं तेव्हा कळलं त्याची बायको आणि भाचा त्याला रिक्षात बसवून घेऊन गेले पण जातानाही त्यांच्यात बाचाबाची सुरु होती.

मुंबईकरांना हे प्रकार नवीन नाहीत . मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलात तरी पावलोपावली असल्या घटना पहायला मिळतात. मागे युट्युबवर स्वतःच्या अपंग सासऱ्याला फोकाने मारत असलेल्या सुनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. नागपुरात, प्रेमात अडचण नको म्हणून दत्तक घेतलेल्या मुलीने प्रियकराच्या मदतीने आईवडिलांना संपवल्याची घटनाही ताजी आहे. किती उदाहरणं सांगायची? कौटुंबिक कलह सगळ्यांच्याच घरात असतात पण म्हणून असलं वागणं ?

काही वर्षांपूर्वी बुलंदी नावाचा रजनीकांत आणि अनिल कपूर अभिनित एक चित्रपट आला होता. गावचा मुखीया म्हणून 'आई- वडिलांची जबाबदारी कोण घेणार ? यावरून दोन भावांमध्ये पेटलेल्या भांडणाचा निवाडा करत असताना "बाप निरुपयोगी म्हणून तो कोणालाच नको तर आई भांडी-कुंडी घासण्यापासून ते पोरांना संभाळण्यापर्यंत सगळं काम करू शकते म्हणून आईला आपल्याजवळ ठेवण्याच्या हट्ट " या दुटप्पी भूमिकेचे अनिल कपूर वाभाडे काढतो.

सांगायचं इतकंच आहे की ,

जिवंत आहेत तोपर्यंत मनात कोणताही किंतु-परंतु न ठेवता त्यांना त्यांचा यथोचित मान द्या. जिवंतपणी यातना देऊन मेल्यावर बांधलेल्या स्मारकांवर फक्त कृतघ्नपणाची धूळ बसते .



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics