भेट -9
भेट -9
त्या दिवशी दुपारी कॉलेजमधून लवकरच बाहेर पडलो होतो. बाकी काहीच कामं नसल्यामुळे सरळ घरीच निघालो होतो. वाटेत तिचा मेसेज आला, महत्वाचं बोलायचं आहे त्यामुळे फ्री झालास की कॉल कर.
घरी आलो आणि तिला कॉल केला. सुरवातीचं बोलणं फार नॉर्मल होतं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर हळूहळू मुख्य विषयाला सुरवात झाली .
"आदित्य, मी जे काही सांगणार आहे ते शांतपणे ऐकून घेशील का?"
' हो ... बोल की .'
"प्लीज , रागावू नकोस आणि चुकीचा अर्थ काढू नकोस."
"तू सांगितल्याशिवाय मी कुठलाही अर्थ कसा काढणार ?'
"बरं ' .....
'"सांगून टाक ' ....
"मी आपल्या आतापर्यंतच्या सगळ्या बोलण्यावर नीट विचार केला. सुरवातीला मला हे फार भारी वाटतं होतं. कारण असं समोरून डायरेक्ट प्रपोज मी पहिल्यांदा अनुभवलं आहे .हा अनुभव फार गोड आहे पण ........
आपल्यात काही बेसिक फरक आहेत जे मला खटकतात किंवा असं म्हण की निर्णय घेण्यात फार अडसर आणतात. एक तर आपल्यात असलेलं अंतर, तू माझ्यापासून 850 किमी. अंतरावर रहातोस त्यामुळे Be practical आपली भेट झालीच तर फारच कमी वेळेला होऊ शकेल. दुसरं म्हणजे आपले विचार ... तू फारच जहाल विचारांचा आहेस आणि मी पूर्णपणे त्या उलट. त्यामुळे मला नाही वाटत आपलं फार काळ टिकू शकेल त्यामुळे मला असं वाटतं की काही सुरु होण्यापूर्वीच आपण थांबलेलं बरं ........."
पुढचा पाऊण तास मी शांतपणे (?) ते सगळं बोलणं ऐकत होतो; ना कोणती ऑरग्युमेंट्स केली ना ही तिला मधेच अडवून माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
" ....... त्यामुळे आपण एकमेकांचे चांगले Friends राहूया,"
"थांब .."
"आं?"
' मी म्हटलं आता थांब जरा .... मगाचपासून मी तुझं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं
एकही प्रश्न न विचारता किंवा तुला मधेच न थांबवता ... आता तू ऐक ...
तुझ्या सुरवातीच्या काही गोष्टी मला पटल्या पण पचल्या नाहीत. आपल्यालातल्या भौगोलिक अंतरा ऐवजी आपल्या मनातल्या अंतराचा विचार तू केला असतास तर जास्त बरं झालं असतं . काय गरज आहे एकत्र येण्यासाठी दर वेळी विचार सारखेच असायला हवेत . एकमेकांच्या विचारांना योग्य वेळी योग्य तो आदर देऊनही एकत्र येता येऊ शकतंच की .... आणि सगळ्यात महत्वाचं ..ते Friends रहाण्याबाबत ....
मी तुला नुसती मैत्रीण म्हणून कधी पाहिलंच नव्हतं वा तुझ्याबद्दल त्या दृष्टीने विचार केला . माझ्यासाठी तु तेव्हाही Life partner च होतीस , आत्ता आहेस आणि यापुढेही राहशील so मैत्रीचा प्रश्नच येत नाही कारण मी तुला नुसती मैत्रिण म्हणून कधी पाहूच शकणार नाही आणि पाहिलं तर तो मैत्री या नात्याचा अपमान असेल असं मला वाटतं '....
मैत्री करायची म्हटली तर मग आपण पुन्हा Friends होणार , आपल्यात बोलणं होणार, मला परत तुझ्याबद्दल त्याच भावना येणार, मी तुला परत प्रपोज करणार , तू मला परत तेच सांगणार , मी सॉरी म्हणून पुन्हा आधीसारखं नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न करणार , पण मग पुन्हा काही दिवसांनी ...... हे सगळं असंच चालू राहील so its better way की आपण विषयच संपवून टाकू. कधी काही काम असेल तर बिनधास्त फोन कर मला. आदित्य नावाच्या कोणा एकाला ओळखतेस तू म्हणून ....
पण आता ही मैत्री वगैरेची चिकटपट्टी नको ....असो .... झालं माझं बोलून ...तुला अजून काही सांगायचं आहे का?"
"मला काय बोलू तेच कळत नाहीये ..आपण please नंतर बोलूया या विषयावर?"
"ठीक आहे"
"काळजी घे .... बाय."
" हो ... तु सुद्धा ..."
क्रमशः
© आदित्य शेखर कुलकर्णी .