सोन्या बैल
सोन्या बैल


"अरं चंदू, ऊठ लवकर. कोंबडा आरवला. धारा काढायच्या हाईत. बैलांना आंबवण घालायचं हाय." आपल्या मोठ्या आवाजात ताराई चंदूला हलवत म्हणाली.
"अग, आये जरा झोपू दे ग, तू धारा झाल्या की ऊठव."चंदूची सकाळी सकाळी लागलेली साखरझोप मोड होताच चंदू ताराई वर खेकसत म्हणाला.
"अरं आज कामावर जायचं हाय तुला. ऊठ आटप लवकर. मी चूल पेटवून धारंला जातो." ताराई चंदूला कामाची आठवण करून देत म्हणाली व चूल पेटवायला परसात गेली.
पहाट झाली की ताराईची नेहमी अशीच कामाची धांदल उडायची. परडयातल्या नारळाच्या झाडाखालच्या चुलीत विस्तव पेटवून आंघोळीसाठी पाणी ठेवायचं. त्याच विस्तवातलं एखादं जळतं लाकूड घेऊन जेवण खोलीतली चूल पेटवायची. त्यावर रात्री भिजत घातलेल्या कडधान्याला कड आणायचा.
वाईलावर तोपर्यंत चहा शिजायचा. चहाचा घोट घेऊनच ताराई धारला बसायची. धारा होईपर्यंत चंदू ऊठून बैलांना आंबवण गोठयाजवळ आणून ठेवायचा. धारा झाल्या की डेअरीवर जाण्यासाठी चंदू दूधाची किटली मोटरसायकलला अडकवायचा.
आज सकाळी धारा काढल्यावर चंदूनं गाडीला किटली अडकवली. गाडीला किक मारली. इतक्यात गाडीच्या आवाजानं अंथरुणातनं ऊठून चंदूचं धाकटं पोरगं डेअरीवर जायला पाठच्या दरवाजानं रस्त्यात जसं बारकं वासरू आडवं यावं तसं आलं नि चंदूला रडतच म्हणालं, "बाबा, मला सोडून कुठं चालला, मला गाडीवर बसायचं हाय."
"अरं, तोंड तरी धुवून ये बेट्या." चंदू पोराला म्हणाला. तसं पाठीमागच्या टाकीच्या नळाला लगबगीने जाऊन पोरांनं तोंडावर पाणी शिंपडलं व तोंड शर्टाला पुसत गाडीवर बसलं न डेअरीवर निघालं.
इकडं ताराईनं आपल्या गोठ्यातील सर्व कामं आटपून गुरांची दावी सोडली. सारी गुरं गोठ्यातून एकामागोमाग रांगेत बाहेर पडली. गोठ्यात सात-आठ गुरं नेहमीच असायची. दोन बैल, तीन गाई आणि दोन-तीन वासरे. सोन्या आणि सख्या ही बैलांची जोडीची नावं व तांबू, लक्ष्मी, चंपा या दुभत्या गाईची. त्यांची दोन-तीन वासरं.असा गोठयातील सगळा परिवार.
सोन्या बैल दिसायला पांढऱ्या वर्णाचा, डौलदार, दोन्ही शिंग टोकदार तलवारासारखी. 'सख्या' त्याच्याच जोडीचा. मध्यम उंची व तांबूस रंगाचा. पोटावर काळे ठिपके. मानेवर दोन-चार गाठी उठलेल्या. पण, नेहमी शांत असायचा. तर, सोन्या मात्र इतर गुरांच्याकडे टवकारून बघायचा. नेहमी नजर त्याची पाठीमागच्या गुरांवर रोखूनच. चरायला रानात सोडला तर सर्व गुरांच्या पुढेपुढेच. सगळ्या गुरांचा तो वाटाड्या होता. काटेरी झुडपे, जाळी यांच्यात बिनधास्त घुसायचा. डोंगरातील हिरवळीचा नेहमीच माग घ्यायचा.
त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी गुरं सोडली. सगळी गुरं गावठाणाच्या हिरव्या माळावर जाऊन चरत होती. शेजारच्या गणपाची गुरंही तिथेच चरत होती. त्याचा एक मारका बैल 'खंडया' हा 'सोन्या' बैलाकडे बघून झुंजायला आला. दोघांच्यात झुंज लागली. गणपा घाबरला. त्याने काठीने हाकलवायचा प्रयत्न केला पण सोन्यानं काही दाद दिली नाही. खंड्या आपला दम लावत होता. शेवटी गणपानं धापा टाकत ताराईला जोराने हाक मारली, "ये ताराई पळ, पळ लवकर...सोन्यानं आमच्या खंड्याला पाडलं बघ."
तिकडून ताराईने हातात काठी घेऊन धावत धावतच सोन्याला हाक मारली. "सोन्या, हो बाजूला... चल हट... हट....." ताराईची हाक ऐकताच सोन्याला झुंज सोडावी लागली. तिकडे खंड्या आपली ताकद पणाला लावून दमला होता. तो आपल्या कळपात निघून गेला. सोन्याचा कोणतेच बैल किंवा गुरं नाद करत नसत. जर केलाच, तर सोन्या तो आपल्या शिंगाने धुडकावून लावायचा. ताराईच्या गुरांचा तो राखणदारच! आजूबाजूला दुसरी गुरं दिसली की त्यांना टवकारून बघत उभा असायचा. त्यामुळे कुठलीच दुसरं गुरं फिरकायची नाहीत.
ताराईशिवाय सोन्या कुणाचं ऐकायचा नाही. ताराईची हाक ऐकताच धावत सुटायचा. तिच्याजवळ येऊन थांबायचा. तिच्या आजूबाजूला नेहमी चरत असायचा. तिचंच सोन्यावर खूपच प्रेम... अगदी लेकरासारखंच! ताराईच नेहमी गुरं सोडायची. पण, एखाद्या दिवशी घरातल्या इतर माणसाने गुरं सोडलीच तर त्यांना सोन्याला सांभाळताना नाकी नऊ व्हायचे.
यंदा नेहमीप्रमाणे भातशेती लागवडीला सोन्या आणि सख्यानं चांगलीच साथ दिली. ही जोडी म्हणजे सर्वांना भारीच! विना थकता नांगरणी करायची. चिखलणीत भर पावसात उभारायची. पण कधीच कामं थांबायची नाहीत. संपूर्ण शेती त्यांच्याच जीवावर. त्यामुळं घरातली माणसं त्या दोन बैलांची विशेष काळजी घेत.
एके दिवशी नेहंमीप्रमाणे धारा काढल्यावर ताराईनं गुरं रानात चरायला सोडली. चंदू कामावर जात होता. तो ताराईला म्हणाला, "आई, रानात वाघ आल्याची बातमी हाय. परवा पप्या धनगराचं वासरू वाघानं खाल्लं. त्यामुळं घराशेजारच्या शेतवडीतच गुरं सोड." ताराईनं बरंबरं अस म्हणत गुरं पुढं हाकलली. गुरं चरण्यासाठी आजूबाजूला बांधावर गवत शोधू लागली. घराच्या आजूबाजूची कामं करत गुरांवर लक्ष ठेवून ताराई होती. घरात थोडं काम होतं म्हणून ती घरात गेली. चुलीवर स्वयंपाकघरात भात शिजायला ठेवला. इतक्यात बाहेर धडपडीचा आवाज ऐकू आला. तारा धावत गेली. पाहते तर काय? घराशेजारच्या आंब्याच्या झाडाखाली उतरंडीला सोन्या बैल घसरून पडला होता. चारही पाय वर. मान मुरगळून पडलेली. मानंच्या खालच्या बाजूला वीतभर जखम. त्यातून रक्ताचा पाट वाहत होता. उठण्याच्या प्रयत्न तो करत होता. पण... शक्ती उरली नव्हती.
ताराई पूर्ण घाबरली. तिनं 'सोन्या'ची मान सरळ केली. पण त्याला ऊठून उभं राहता येईना. तशीच तिनं दोघां-चौघांना बोलावलं. त्यांच्या हातभारानं
सोन्याला उभं केलं. त्याच्या पुढच्या दोन पायात खोलवर जखम झाली होती. त्यात घरात धावत जाऊन आणलेली हळद ताराईनं भरली. सोन्याला चालवत चालवत गोठ्यात आणलं. नेहमीच्या जागेवर न बांधता त्याला एका बाजूला बांधलं. दरम्यान चंदूला फोन करून डाॅक्टरला बोलवून घेतलं. मलमपट्टी केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी गोठ्यातील बाकीची गुरं सोडली. सोन्या बैल मात्र उठत नव्हता. डाॅक्टरनं सांगितल्याप्रमाणे जखम खोलवर असल्याने
लवकर बरी होणार नव्हती. ताराईकडं त्यानं नजर फिरवली. बाकीची गुरं सोडल्यामुळं हंबरू लागला. उठण्यासाठी हालचाल करू लागला, पण, अंगात ताकद नव्हती. ताराईनं त्याच्या तोंडावर हात फिरवला नि ती रानात इतर गुरांमागं निघाली. तसा 'सोन्या' ताराईकडं टकामका बघून हंबरू लागला.
त्याच्या डोळ्यातून टिपं गळू लागली. हे बघून ताराईचेही डोळे पाणावले. पदराने डोळे पुसत तिनं बारक्या नातवाला सोन्याकडं लक्ष ठेवायला सांगितलं नि रानात इतर गुरं राखणं करायला निघून गेली.
एक-दोन तासात नातवानं गोठयात पाहिलं. गोठ्यात सोन्या बैल निपचित पडला होता. त्याने मान टाकली होती. पाय पसरले होते. तो घाबरला. तो धावत जाऊन ताराईला म्हणाला, "आजी, सोन्या गोठ्यात गप्प पडूनच हाय, पाय पसरल्यात. चल लवकर."
ताराई गोठयाकडं धावत आली. सोन्याचं दावं सोडलं. तोपर्यंत सोन्यानं आपली जीवनयात्रा संपवली होती. ती सोन्याकडं पाहून ढसाढसा रडू लागली.
बारका नातूही रडू लागला. सर्वांना अश्रू आवरले नाहीत. मोठया नातवाने फोन करून चंदूला कामावरून बोलावले. सात-आठ माणसं जमा झाली. शेतवडीत खड्डा काढला. सोन्या मातीआड झाला. त्या जागेवर सोन्याची आठवण म्हणून एक आंब्याचं रोपटं लावलं. जे पुढं 'सोन्याचा आंबा' म्हणून ओळखू लागलं.