SHRIKANT PATIL

Others

3  

SHRIKANT PATIL

Others

तामजाई

तामजाई

3 mins
377


दिवाळीची सुट्टी संपली. शाळाही सुरु झाली होती. त्यामुळे आम्ही शाळेची वाट धरली होती. सकाळची घरातील किरकोळ कामं, अभ्यास करुन मी शाळा गाठायचो. सुगीचे दिवस अजूनही सुरुच होते. त्यामुळे आई दिवसभर मोलमजुरीसाठी शेतं गाठायची.सोबत दोन-तीन शेरडं असायची. इकड आमचं शाळेत मन रमत नव्हतं. सुट्टीची सवय झाली होती. कधी एकदा पाच वाजतील अन्ं घरी धूम ठोकायला मिळेल असं व्हायचं. घरी आल्यावर दफ्तर ठेवायचं आणि शेताकडं धावत सुटायचो. आईच्या डोक्यावर कोवळ्या झाडपाल्याचा भारा. त्याला एक हात. दुसऱ्य हातात शेळीचा दोर. त्यांच्यापाठी दोन शेळीची पिल्लं. बें ऽऽबें ऽऽकरत, उड्या मारत असायची. मी शेळीचा दोरं हातात घ्यायचो. शेळीच्या पिल्लांसोबत मजा वाटायची. वाकड्या तिकड़या उड्या मारत, रस्त्याच्या बाजूला असणा-या गवताच्या पानाला हुंगत, थोडं -थोडं थांबत. ही गोंडस पिल्लं धाव घ्यायची.


      रविवारची सुट्टी म्हणजे आम्हाला पर्वणीच. शेरडांना घेऊन मनसोक्त हुंदडायला मिळायचं ना! गावच्या दोन्ही बाजूला डोंगर. एका बाजूला भिमा डोंगर व दुसऱ्या बाजूला तात्या डोंगर. हे डोंगर म्हणजे गावाला सांभाळणारी 'आई- बा'चीच रुपं. खळखळत वाहणाऱ्या झऱ्यांना जन्म देणाऱ्या या दोन डोंगराच्या कुशीत वसलेल्या माझ्या गावावर मायेची सावली धरलेली. पूर्वेला सामानगडपासून मावळतीला जात्याचं पेडापर्यंत भिमा डोंगर पसरलेला. जात्याचं पेडाखाली गुरवकी, गोइली, धोंडल, घोल्ह अशी स्थानिक डोंगराच्या उतारावरची शेतं पसरलेली. डोंगराच्या वरच्या बाजूला हिरवंगार पठार. त्यावर बजरंगबली हनुमानाचं मंदिर, शिवमंदिर. तसेच कुशीत सत्पुरुष भीमशाप्पाचं व पूर्वेला श्री चाळोबाचं मंदिर. या श्री भीमशाप्पा या सत्पुरुषाच्या नावावरुन डोंगराला 'भिमा' डोंगर म्हणून ओळखलं जायचं.


त्यादिवशी सकाळीच आई मला म्हणाली, "आज ऐतवार हाय, मी हिंग्लजला जाऊन बाजार करुन येतो . शेरडांना घेऊन धोंदलात घेऊन चरवून आण." 

 "हां, मला लवकर भाकरी वाढ" मी मनोमन आनंदून म्हणालो.


  भाकरी खाल्ली व दिवाळीतला उरलेला फराळ बांधला. शेरडं घेतली व निघालो. 'धोंदल' हा डोंगराचा उताराचा भाग.मोठ मोठे आकाराचे काळसर, तांबूस दगड-धोंडे असलेला भाग. त्यामुळेच 'धोंडल' असं म्हटलं जात असावं. सकाळी सकाळीच बहुतेक गुराखी आपली गाईगुरे घेऊन येत. सुट्टी असल्यानं मुलांची गर्दी असायची. गुरं, शेरडं चरत असायची. पोरांचे खेळ सुरु व्हायचे. ऊंच ऊंच दगडावर चढायचं. दोन्ही बाजूला पसरलेल्या हिरव्यागार करवंदीच्या जाळीत घुसायचं. लपाछपी खेळायची. झाडावर चढायचं.असे खेळ व्हायचे. जवळच्याच झऱ्यावर जायचं. खूप मज्जा होती. मोठी माणसं आपल्या आपल्या कामात असायची. इस्ताऱ्या (पत्रावळ्या ) तयार करायला पळसाची पाने गोळा करणे, शेळ्याना पाला तोडणे, जळाऊ लाकडे गोळा करणे अशी त्यांची कामे चालू असायची. 

 

 डोक्यावर ऊन येत होतं. गुरं, शेरडं जवळच्या तळीवर पाणी पिऊन आली होती. त्यांची पोटं टुंब भरली होती. आम्हीही एकत्र बसून आणलेला फराळ खाल्ला होता. घरी निघण्याअगोदर दररोज येणाऱ्या गुराखी मन्डळीपैकी ज्येष्ठ मंडळीनी विषय काढला. "अरं, आपली तामजाई कधी करायची. कुठला तरी ऐतवार पकडून करायला हवी."

इतक्यात सारी पोरं म्हणाली, "अहो, आज आठदिवसान्ंच करुया की. सारी शाळंची पोरंबी असत्यात." 

"बरं बरं, कुणी कुणी काय आणायचं शनवारी बघू." असं सर्वजण म्हणाले. गुरं हाकलत आम्ही घरी निघालो. जाता जाता जाणत्यानी तामजाई बद्दल माहिती सांगितली. 'तामजाई' ही तर डोंगरातली देवी.जीचा परंपरेने गावातील गुराखी उत्सव करत. आज बदलत्या काळानुसार ही श्रध्देची रुपं लोप पावत गेली. त्या काळात गाई गुरांच्या अंगावर गोचिड, पिसूप्रमाणेच तांबू हा परजीव मोठ्या प्रमाणात असायचा. तांबू गुरांच्या शरीरातलं रक्त शोषून घेते.त्यामुळं गुरं अंगांंन खराब व्हायची. अशी "तांबू जा बाई" असं या अदृश्य देवीला साकडं घातलं जायचं. "तांबू जा बाई"चा पुढं अपभ्रंश होऊन 'तामजाई ' असं झालं. 


  उद्या तामजाई आहे म्हटल्यावर आदल्या रात्री डोक्यात त्याचेच विचार. कधी एकदा आपण जातो असं व्हायचं. ती डोंगरात जेवण बनवून जेवण्याची मजाच वेगळी. जनावरं राखणाऱ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं आलेला हा एक उत्सवच होता. ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी सकाळीच सर्वानी जमवलेले साहित्य घेतलं. धोंदलाच्या वरच्या बाजूला पोहचलो. गुरांनी चरायला सुरवात केली. आम्ही आपापली कामं करु लागलो. कुणी तीन दगडाची चूल मांडली. कुणी लाकडं जमवून आणू लागला. कुणी तळीवरच्या झऱ्यातलं पाणी आणलं. कुणी कांदा, मिरची, भाजी चिरायला सुरु केलं. तर दोघां-तिघांनी पळसाच्या ताज्या पानाच्या इस्ताऱ्या (पत्रावळ्या ) बनवायला सुरुवात केली. अनुभवी गुराखी मंडळी आचारी झाली. एकमेकांच्या सूचना सुरुच होत्या. भात तयार झाला. आमटीला फोडणी दिली. फोडणीचा सुगंध दरवळला. तशी दूरवर गुरं परतायला गेलेली बारकी पोरं धावतच आली. अशा खटपटीतून एकदासं जेवण तयार झालं. ज्येष्ठ मंडळीनी नारळ फोडला. देवीला निवद केला. सर्वांनी हात जोडले, "गुरा-ढोरांची... लेकरां बाळांची काळजी घे ग माय." अशी प्रार्थना केली. सर्वांनी नमस्कार केला. गाईला निवंद खायला दिला आणि पंगत बसली.

 

ताज्या हिरव्या इस्ताऱ्यावर भात. त्यात हाताने आळं केलेलं. गरमागरम आमटी त्याच्यात ओतलेली. तामजाईच नावं घेतलं अन् जेवायला सुरुवात झाली. जुन्या आठवणीच्या गप्पा मारत. एकमेकांची चेष्टामस्करी करत मनसोक्त जेवण झाले. तृप्तीचा ढेकर देत सर्व गुराख्यानी तांबू नष्ट करणाऱ्या या देवीची कृपा सर्वांवर अशीच राहू दे, असे म्हणत देवीचे आभार मानले. खरकटं पाणी जवळ आलेल्या गुरांना पाजले. देवीच्या प्रसादाचं पाणी पिल्यावर, त्यांच्यावर शिंपडल्यावर गुरांची रोगराई पळून जाते असा समज होता. मुलांचे दगड-गोट्यांचे खेळ सुरु झाले. नेहमीप्रमाणे दगडावरची चढाओढ सुरु झाली आणि आम्ही तामजाईच्या नव्या आठवणी सोबत गुरं-ढ़ोरं, शेरडांना घेऊन घरी परतलो.


Rate this content
Log in