SHRIKANT PATIL

Inspirational

3  

SHRIKANT PATIL

Inspirational

गुरूजींची निवृत्ती

गुरूजींची निवृत्ती

3 mins
290


   1986 चे वर्ष. आपल्या सरकारी शिक्षक नोकरीचा प्रारंभ व माझ्या शालेय जीवनाची सुरुवातीचे वर्ष . आपण आपल्या कार्याची सुरुवात जीवन शिक्षण विद्यामंदिर हसुरसासगिरी ,ता.गडहिंग्लज. येथे म्हणजेच माझ्या गावात केली हे आमचे भाग्यच. माझे वर्ग शिक्षक जरी दुसरे असले तरी तुमची छाप सर्व शाळेवर नेहमीच असायची. तुमचे सहकारी श्री. गिरी गुरुजी, श्री. जाधव गुरुजी श्री .गोरे गुरुजी अशी सर्व गुरुजन मंडळी त्यावेळी शाळेस लाभली. "हिरवी शाळा सुंदर शाळा" अशा स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी जशी शाळा हिरवीगार बनवली. तशी आम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनाची बाग तुम्ही फुलवलात. 


    आळस हा माणसाचा शत्रू असतो हे तुम्ही आम्हाला सुविचार सांगितला .हा शत्रू आमच्या अभ्यासात कधी कधी जवळ येत असायचा .पण आम्हाला घडविताना हा शत्रू तुमच्याजवळ कधीच फिरकला नाही. जादा वेळ देऊन विद्यार्थी नेहमीच आपण घडवले. केवळ पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर नेहमीच भर दिला. सकाळी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आपण पालखी भेटच्या माळापर्यंत धावलात. विद्यार्थ्यांना व्यायामाची गोडी लावली. 


   प्रत्येक माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो हे आपण केवळ सांगितला नाही तर जगलात. तुमचा अभ्यास सतत चालू असायचा. तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता ते बीज आम्हा विद्यार्थ्यांच्या मध्ये उतरवले. तुमच्या सहकार्‍यांसोबत तुम्ही अभ्यास केलाच. त्यानाही अधिकारी होता आलं. आपल्याला यशस्वी नाही होता आले तरी आपले ज्ञान पुढच्या पिढीसाठी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडावे म्हणून तुम्ही त्याकाळी " एम.पी.एस.सी. स्पेशल इतिहास आणि सामान्य अध्ययन " या पुस्तक रूपाने सर्वांना दिलात. केवळ शाळेशी एकरुप न होता तुम्ही गावाशी नाळ जोडली .आमच्या कुटुंबाच्या सुखदुःखात आजही तुम्ही सहभागी असता.


   गावच्या तरुणांसाठी योग्य दिशा देण्याचे काम तुम्ही शाळेच्या माध्यमातून सुरू केलं .रात्र अभ्यासिका सुरु केली. वाचन संस्कृती जपण्यासाठी जसे तुम्ही शाळेमध्ये दर शुक्रवारी एका कादंबरीचा काही भाग अभिवाचन करत असायचा. हे मला आजहीआठवते. गरिबीतून जिद्दीने शिक्षण कसे पूर्ण करावं हा संस्कार देण्यासाठी ,तुम्ही वाचलेली लेखक आनंद यादव यांची 'झोंबी' कादंबरी व त्यातील प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर येतात. गावातील वाचन प्रेमींसाठी आपल्या माध्यमातून सार्वजनिक वाचनालय सुद्धा सुरू केले. मुलांना निसर्ग सहली ,वनभोजन ,जादूचे प्रयोग , संभाजीराजांसारखा पडद्यावरील चित्रपट आदी सर्वकाही संस्काराचे भाग आम्हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलात. तुमच्या सहवासातले घालवले हे सुवर्णक्षण आजही माझ्या मनात रुंजी घालत आहेत. 


   आपण सुरुवातीला शाळेजवळच चव्हाणांच्या घरी राहत होता. गावातच राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपले मार्गदर्शन सातत्याने मिळायचे. त्या काळातील विद्यार्थी चांगले घडण्यामागे आपल्याकडे असणारी दूरदृष्टी, एखादा उपक्रम सक्षमपणे राबविण्यासाठी असणारी ऊर्जा, हीच जगण्याची वाट दाखवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. जी आजच्या काळात अभाव दिसतो. नवनवीन शिकणे, नवीन संशोधनाचा मागोवा घेणे, याला तुम्ही नेहमीच महत्व दिले. जीवन जगण्याची ऊर्जा तुम्ही दिलात. माझ्या गावातील शाळेतून बदली झाले नंतर आपण आपले शैक्षणिक कामा बरोबर सामाजिक कार्य चालू ठेवलात. ग्रामीण साहित्य संमेलनं , चिकोत्रा पुनर्वसन, महिला सक्षमीकरण यामधील आपला सहभाग प्रशंसनीय राहिला.


   संकटाला तोंड कसे द्यावे हे आम्ही तुमच्याकडूनच शिकलो.अर्जुनाला जसा भगवान श्रीकृष्ण गुरू लाभले. तसेच तुमची शिकवण, शिस्त आम्हाला लाभली. त्याकाळी रामायण महाभारत दूरदर्शनवर आम्ही पाहायचो. गुरुजींच्या खोलीत आम्ही ते बघायचो. ते गीताविचार आमच्यात नकळत रुजले. (योगायोगाने आजही कोरोनामुळे त्याचे पुन्हा प्रक्षेपण होत आहे. काळाची गरज.)


  शाळेच्या भिंतीवरती आपण सूचित केलेल्या कवी विंदा करंदीकरांच्या चारोळी मला आजही आठवतात .


इतिहासाचे अवजड ओझे 

डोक्यावर घेऊन ना नाचा

 करा पदस्थल त्याचे आणिक 

चढुनि त्यावर भविष्य वाचा


   या ओळीप्रमाणे आपण नेहमीच मुलांच्या,शाळेच्या , समाजाच्या भविष्याचा वेध घेत झटलात. आमचे भविष्य घडवलात. आज सरकारी नियमानुसार व नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात. शासकीय सेवेमध्ये हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक दिवस येतोच. आजच्या क्षणी तुमचे कार्य पाहता आयुष्यातील ही निवृत्तीनंतरची इनिंग खेळताना तुमच्या अनुभवाचा लोक सेवेसाठी नेहमीच उपयोग कराल यात मात्र शंका नाही. तुमच्या हातून अखंडपणे ही सेवा, साहित्य सेवा चालू राहणार आहे. आम्हा विद्यार्थ्यांच्या जीवन मंदिराचा तुम्ही केवळ पाया घातला नाही तर सातत्याने आजही मार्गदर्शन करून नावा प्रमाणे कळस चढवलात.

 अशीच गुरुकृपा आम्हा विद्यार्थ्यांवर राहो.तुमच्या भावी आयुष्यास सदैव हार्दिक शुभेच्छा


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational