चेंडू
चेंडू


परवा अडगळीच्या खोलीमधील खेळणी काढताना तीन-चार चेंडू सापडले. काही प्लास्टिकचे, काही रबरी. त्यांच्याकडे पाहून बालपण आठवलं. आयुष्यात चेंडूबरोबर खेळला नाही असा माणूस भेटणं थोडं मुश्किलच. माझी आजी गोधडी शिवायची. जुने कपडे ती वापरत असे. ती जुन्या कपड्यांचे काठ, चड्डीच्या नाड़या, फाटके सुरकुतलेले कपडे गोळा करुन बाजूला ठेवायची. ते एकत्र करुन एका कपड्यात बांधायचे व त्याला गोल आकार देऊन आजी त्याला दोन-चार टाके घालायची आणि चेंडू तयार व्हायचा. तो आमच्या आयुष्यातील पहिला चेंडू. तो चेंडू लगोरी, क्रिकेट, फेकाफेकी, पकडा-पकडी अशा खेळात वापरला जायचा.
त्या दिवशी मला आईनं सांगितलं होतं. आज मोठा मामा येणार हाय. मी मामाची आतुरतेने वाट बघत होतो. डोक्यावर पांढरा फेटा, लांब हातोप्याचा पांढरा शर्ट, शुभ्र धोतर
असा पेहराव. एका हातात काठी व दुसऱ्या हाताने डोक्यावरची पिशवी सांभाळत मामा येताना दारातून दिसताच मी त्याच्यादिशेनं पळतच सुटलो. मामाच्या डोक्यावरची पिशवी मी हातात घेतली. कारणही तसंच होतं. प्रत्येक वेळी मामा येताना लहान रंगीत रबरी चेंडू आणायचा. कधी लाल, कधी पिवळा तर कधी तपकिरी चेंडू मला मिळायचा. आताच्या रंगीत झिरो बल्बसारखा आकाराचे. मामाच्या घरी छोटी मांजरे होती. त्यांना हे चेंडू खेळायला मामा आणत असे. त्यातले काही चेंडू माझ्यासाठी आणायचा. हा चेंडू जसा घरी भेटायचा तसा तो शाळेतही. आमच्या वर्गात गणिताच्या तासाला तर आम्हाला हमखास भेटायचा. मोजसंख्या शिकवताना, बेरीज- वजाबाकी करताना गुरूजी चेंडूची
उदाहरणे नेहमी देत.
ते म्हणायचे, " बोला मुलांनो,मधुकडे पाच चेंडू आहेत . त्याला आणखी चार चेंडू दिले तर आता त्याच्याजवळ किती चेंडू झाले? "
सर्व मुले हाताची बोटे मोजत उत्तर द्यायची ,"नऊ चेंडू"
आम्हाला एक चेंडू मिळत नव्हता. पण गुरुजींच्या तासाला असे आभासी भरपूर चेंडू भेटायचे. इंग्रजी विषयाची सुरुवात तर 'ए' फ़ॉर ॲपल, बी फ़ॉर बॅट किंवा बॉल अशीच व्हायची. त्यावेळी शाळेच्या मैदानावर गोल बसून एकमेकांकडे फेकताना कापडी चिंध्याचा चेंडू हातात असायचा. मैदानावरच्या फेकाफेकीच्या खेळात त्याने आमची पाठ कधीच सोडली नाही. पण तो नेहमी हवाहवासा वाटायचा.
आम्ही शाळेत असताना बालमित्रांबरोबर क्रिकेटचा खेळ रंगू लागला. जसा श्रीकृष्ण, सुदामाच्या सोबतीने चेंडू असायचा तसा चेंडू आम्हा बालगोपाळांसोबत नेहमी असायचा. आम्ही जसे मोठे झालो तसा आमच्या हातातील चेंडूही आकाराने बदलला. लाल, पांढऱ्या रंगातले रबरी मोठे चेंडू दुकानात मिळायचे. त्यावेळी गावातील काही मोजक्याच मुलांकडे स्वतःच्या मालकीचे चेंडू असत. चेंडू असणारा मित्र आम्हाला खूप श्रीमंत वाटायचा. त्याची मिजास मोठी असायची. गोड बोलून त्याची मर्जी राखावी लागे. खेळताना चेंडू कधी कधी झाडा-झुडपात हरवायचा. तो शोधण्यातच अधिक वेळ जात असे. हरीचा चेंडू गेला कुठे? असा प्रश्न जसा पेंद्याला पडायचा तसाच प्रश्न आम्हाला त्यावेळी पडायचा. आमची बॅट कधी नारळाची झावळीपासून तयार व्हायची तर कधी जाडजुड लाकडाचा गोल टोणका किंवा लाकडी छोटी फळी. कधीकधी गल्लीतली मुलं-मुलं वीस, पंचवीस, पन्नास पैसे वर्गणी काढून तो चार-पाच रुपयाचा चेंडू विकत घेतला जायचा. तो चेंडू आम्हाला एकत्र करायचा. आमची सर्वांची मनं एकत्र करण्याचे काम तो एक चेंडू करत असे. त्याने आम्हाला जशी एकी शिकवली तशी स्पर्धाही.आमच्या आयुष्यातील संघटनचे तो प्रतीक बनला.
हळूहळू काळ बदलला. कंपनीची बॅट आली. कंपनीचा चेंडूही आला. आम्ही आमचे संघही तयार केले. स्पर्धा भरवल्या. सुरवातीला गल्ली विरुध्द गल्ली सामने .पुढच्या काळात जवळपासच्या गावात जाऊन आम्ही सामने खेळलो. प्रवेश फीच्या नफ्यातून , जिंकलेल्या बक्षिसातून नवीन चेंडू, बॅट खरेदी केले. ते नवीन चेंडू हाताळताना एक नवीन मित्र भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेह-यावर असायचा.
आज हा चेंडू क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, थ्रोबॉल, बॅडमिंटन, टेनिस इत्यादी खेळ प्रकारांत वापरला जातो.पण, आज जगभर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये त्याचे प्रमुख स्थान आहे. त्याने त्याला महत्वाचे स्थान मिळवून दिले. या खेळातील चेंडू आणि बॅट ही प्रमुख साधने. अकरा- अकरा खेळाडू या एका चेंडूभोवताली दिवसभर धावतात याचे सर्वांना आश्चर्य वाटते ना! गोलंदाजाचे ते प्रमुख अस्त्र असते. फलंदाजाचे ते लक्ष्य असते. त्याला तो धावा जमवताना साथ देतो. अनेक विश्वविक्रम त्याला हाच चेंडू मिळवून देतो. चेंडू सीमापार टोलवण्यात फलंदाजाला अत्यानंद वाटत असतो तर त्याच चेंडूच्या अचूक माऱ्याने गोलंदाजाला यष्टी उडवण्यात आनंद. क्षेत्ररक्षकाला तो कधी एकदा हातात येईल असे वाटते. चित्त्याच्या चपळाईने चेंडू अडवताना धावा वाचवल्याचा आनंद असतो. तसेच फलंदाजाने मारलेला फटका अंतराळी वाघासारखी झेप घालून पकडताना तर तो चेंडू आनंदाचा सर्वोच्च बिंदू असतो. आपला संघ अंतिम सामना जिंकल्यानंतर विजयी फटका ज्या चेंडूच्या नशिबी येतो किंवा शेवटचा फलंदाज अचूक टीपणारा चेंडू खरा भाग्यवान ठरतो. तो चेंडू आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून खेळाडू आठवणीने आपल्या जवळ ठेवतात. अशा चेंडूची किंमत कधीकधी लिलावात सर्वोच्च ठरते. खरंतर विजयाचा तो अनमोल ठेवा असतो. कधीकधी याच चेंडूला काही कुप्रवृत्तीच्या उंदरानी कुरतडले. त्याला गालबोट लावण्याचे काम केले. पण, प्रत्येकाच्या मनाला एकीचे धडे देणारा, प्रत्येकाच्या मनात आनंदाची उसळी घेणारा, हे विश्व माझ्यासारखे गोल आहे असे सूचित करणारा चेंडू कधीच हरत नाही. तो सदैव मनात विजयीच राहील यात मात्र शंका नाही.