SHRIKANT PATIL

Inspirational Others

3.3  

SHRIKANT PATIL

Inspirational Others

नोकरीचा पहिला दिवस

नोकरीचा पहिला दिवस

5 mins
1.4K


गावच्या प्राथमिक मराठी शाळेत असतानाची गोष्ट. गुरुजी नेहमीच वर्गात प्रश्न विचारायचे. "मुलांनो, मोठेपणी तुम्हाला काय व्हायचं आहे?" वर्गातील मुलांची उत्तरे वेगवेगळी असायची. हुशार मुले इंजिनियर, डॉक्टर अशी उत्तरं द्यायची. चोर-पोलीस खेळ खेळणारी मुले 'पोलीस, मिलिटरी मॅन होणार' म्हणून सांगायची. लहानपणापासूनच वर्दीचे आकर्षण त्यांना असायचं. मी इयत्ता सहावीत असताना माझे वर्गशिक्षक गोरे गुरुजींनी मराठीच्या तासाला हाच प्रश्न विचारला होता. माझ्याही वर्गातल्या मुलांनी अशीच उत्तरे दिली. माझ्यावर जेव्हा उत्तर द्यायची पाळी आली तेव्हा मीही सांगितलं, "मला गुरुजी व्हायचंय..." खरं तर, त्या गुरुजींच्या शिकवण्याची पद्धत उत्तमच. त्यांचा पांढरा सदरा, पांढरी पँट असा नेहमीचा पेहराव. पांढरपेशीच माणसं ती. आम्हा मुलांना त्यांनी लावलेले प्रेम तर जास्तच. त्यांच्या या सर्व आकर्षणाच्या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर पडला होता. त्यामुळे माझं उत्तर 'गुरुजी व्हायचंय' हे मनात अगोदरपासूनच ठसलेलं. माझ्या वर्गातल्या भिंतीवर एक वाक्य लिहिलेलं होतं, "माग भिक पण मास्तरकी शिक." हे वाक्य तर सारखे खुणावत असे. त्या काळची परिस्थितीही तशीच होती. लवकर नोकरी-धंदे मिळत नसत. त्यामुळे मास्तर होण्याचं मनात कोरलेलं. त्या वेळेपासूनच वर्गातील माझ्याबरोबरचे मित्र मला नेहमी 'मास्तर' म्हणूनच हाक मारायचे. पुढे हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केलं. मी शिक्षक कोर्ससाठी जाण्याचं ध्येय समोर ठेवलं होतं. त्यामुळे मी कला शाखा निवडली. तालुक्याला जाऊन अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केलं. कला शाखेत तालुक्यात अव्वल नंबर काढला. आता आपले ध्येय पूर्ण होणारच हा आनंद होता. डीएड़ प्रवेशाचा मार्ग सहज खुला झाला.


मी दोन वर्षाचा डी. एड़चा कोर्स पूर्ण केला. पण... नोकरी नाही. एक वर्ष खासगी शिकवणी सुरु केली. कधी मिळणार आपल्याला सरकारी नोकरी? कधी आपले स्वप्न पूर्ण होणार? असे नेहमी मनात प्रश्न सतावत राहायचे. 2001 साल संपत आलेले. दिवाळी सणानंतर वर्तमानपत्रात जाहिरात आली. ज्या शिक्षक भरतीची वाट पाहत होतो ते दिवस उजाडले होते. सरकारनेही 'शिक्षणसेवक' असे गोंडस नाव ठेवले होते. कंत्राटी भरती. काहीही असो, पण अगोदर नोकरी मिळवली पाहिजे. त्यामुळे अर्ज करायला सुरुवात केली. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आमच्या जातीचा कोटा शिल्लक नव्हता. मी दोन-तीन जिल्ह्यात अर्ज केले. पहिल्यांदा कोणत्या ठिकाणावरुन कॉल येईल तिथे जायचं हे ठरवलं. शेवटी स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी करण्याची इच्छाच विझली होती. 


पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यातून मुलाखतीस बोलावले. नोव्हेंबरच्या महिन्यात मुलाखत झाली. मुलाखतीनंतर जवळ जवळ एक महिना उलटत आला. डिसेंबर महिनाही संपत आला. मी नियुक्तीच्या पत्राची वाट पाहत होतो. अखेर डिसेंबरची 20 तारीख. दुपारची वेळ. मी नुकताच शेतातून आलो होतो. इतक्यात दारात पोस्टमन हजर. पोस्टमनने मला पत्र हातात दिले व अभिनंदन केले. पत्र हातात घेतले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील शाळा मिळाली होती-जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मोसम नं 1. मनोमन आनंद झाला होता. आता आपला आनंदी  'मोसम' सुरु होणार होता. पण मनात विचारचक्र सुरु झाले. आपल्याकडील खेडेगावातील शाळांची नावे.. जीवन शिक्षण विद्या मंदिर.. अशा नावाने सुरु असतात. कदाचित मोठे गाव असेल की काय? तिथे अनेक शाळा असतील.. म्हणूनच त्याना 1 नंबर, 2 नंबर असे नंबर दिले असतील तर मग! असे अनेक मनात तर्क-वितर्क सुरु झाले होते.


माझ्या गावाजवळच्याच विनायक नावाच्या मित्राला संपर्क केला. त्यालाही तोच तालुका मिळाला होता. दुसऱ्या दिवशी जाण्याची तयारी सुरु केली. डोक्यात विचाराचं काहूर माजलं होतं. रात्रभर झोप लागत नव्हती. एकीकडे आनंद त्याचबरोबर नवीन ठिकाणी जाण्याची हुरहुर. आयुष्यात प्रत्येकजण आपल्या उपजीविकेसाठी धडपडत असतो. कधी एकदा नोकरी-धंद्याला पोरगं लागेल या विचारात माय-बाप असतात. त्यांनी त्यांची स्वप्नं आपल्या पोरांच्यात पाहिलेली असतात. त्यासाठी आयुष्यभर त्यांनी खस्ता खाल्लेल्या असतात. आता ते त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याचा दिवस उगवणार होता आणि तो दिवस माझ्या आयुष्यात उगवला. शुक्रवार दिनांक 21 डिसेंबर 2001. नोकरीचा पहिला दिवस म्हणजे मनात बरेच प्रश्न, उत्सुकता, धाकधूक, थोडंसं टेन्शन, नवीन नोकरीचा आनंद... असं सगळं होतं. तरीही आयुष्यात पहिल्या गोष्टी खूप स्पेशल असतात. पहिला पाऊस, पहिलं प्रेम, पहिली शाळा, पहिले शिक्षक, पहिलं नोकरीचं ठिकाण वगैरे वगैरे सगळीच पहिलाई! आणि हृदयात असणारी पहिलेपणाची अपूर्वाई.


आज मुलगा नोकरीला जाणार म्हणून आईने सकाळी लवकरच उठून डबा बनवला. सकाळची पहिली कॉलेज गाडी म्हणजेच वस्तीची एसटी बस पकडली. सोबत मित्र विनायक होता. गाव ते गडहिंग्लज. गडहिंग्लज ते कोल्हापूर असा प्रवास झाला. कोल्हापूर बस स्टँडवर चौकशी केली. राजापूर जाणारी बस किती वाजता आहे? किती तास प्रवासाला वेळ लागतो? जवळजवळ दीड-दोनशे किलोमीटरचा प्रवास अजून बाकी होता. पहिल्यांदा तालुक्याच्या ऑफीसला हजर व्हायचं होतं. त्यामुळे  दहाची कोल्हापूर-राजापूर ही बस पकडली. वाटेत बसमध्येच बसून डबा खाल्ला. घाटात वळणावळणाचे रस्ते पार करत बस दुपारी अडीच-तीनच्या सुमारास राजापूरात पोहोचली. 


तालुक्यात पंचायत समितीला हजर झालो. तेथून कार्यालयीन कामकाज आटोपून आम्ही शाळेत हजर होण्यासाठी निघालो. शाळा सुटायच्या आत म्हणजेच पाच वाजेपर्यंत तिथं पोहोचणं गरजेचं होतं. राजापूर बस स्थानकात चौकशी केली. माझा व मित्राचा शाळेचा मार्ग वेगळा होता. मित्राला बस मिळाली. माझा शाळेपर्यंतचा प्रवास अजून दीड-दोन तासाचा होता. गावात जाणारी थेट बस नव्हती. मी पावणे चारची राजापूर-खारेपाटण बस पकडली. साडेचार वाजेपर्यंत बसने खारेपाटणला पोहोचलो. तिथे चौकशी केली तर शाळेपर्यंत जाण्यासाठी रिक्षाशिवाय पर्याय नव्हता. रिक्षा केली. तोही प्रवास अर्ध्यापर्यंतचा. खारेपाटण ते मोसम हॉटेल हा दहा मिनिटाचा प्रवास रिक्षाने संपला. जवळच एक शाळा होती. मला वाटले आली आपली शाळा. शाळेचे नाव पाहतो तर प्राथमिक शाळा मोसम नं. 2. तिथे असणाऱ्या मुख्याध्यापकांनी मला कच्च्या रस्त्याने 1 नंबर शाळेकडे जाण्यास सांगितले. 


मी ती वाट तुडवत निघालो. वाटेत ना माणसं दिसत होती ना घरे. थोड्या अंतरावर गेल्यावर दोन मंगलोरी कौलाची उतरत्या छप्पराची घरे दिसली. तिथे अंगणात दोन माणसं दिसली. मी त्यांना शाळेबद्दल विचारले. ते म्हणाले, "अहो ती माळावरची शाळा काय? या घाटीने (उंच डोंगरातील वळणाची पायवाट) सरळ उतरा. पुढे एक वाडी लागेल तिथून जा."  माझा सर्व भ्रमनिरास झाला होता. आदल्या रात्रीला केलेले सर्व तर्क-वितर्क साफ चुकले होते. एका खेडेगावात ही शाळा होती. शाळेपर्यंत जाण्यास पायवाटेचाच पर्याय होता. मी घाटी उतरु लागलो. लाल धुरळ्याची वाट संपते कधी असे झाले होते. पुढे उतरत्या छप्पराची सात-आठ घरे दिसली. त्या वाडीत एका माणसाला विचारले, त्यानी पायवाटेने जाण्यास सांगितले. मी वाडीतील एका घराजवळच घुटमळलो. पाठीवर निळी पिशवी. डोक्यावर टोपी. हातात रुमाल, घामाघूम चेहरा, अंग भिजलेलं. असा माझा अवतार पाहून वाडीतील कुत्रीही भुंकू लागली. तिथल्या एका माणसाने कुत्र्याना हटकलं. मला पायवाटेने सांकवापर्यंत (ओढ्यावरचा लहान लाकडी पूल) सोडलं व या घाटीने जा म्हणून सांगितले.


उंच अशी डोंगरातील पाऊलवाट, दोन्ही बाजूने दाट करवंदाची जाळी, मध्येच आंब्या-काजूची झाडे दिसत होती. घाटी चढल्यावर माळ लागला. एक-दोन गुराखी दिसले. त्यांना शाळेविषयी विचारले. त्यापैकी एक म्हणाला, "आता शाला सुटूचा टाईम झाला. एक गुरूजींका याचं वाटेनं येऊचा लागता. वाटेक तुमका भेटतील." माझ्या कानावर त्यांच्या मालवणी भाषेतील बोल पहिल्यांदाच कानावर पडले. मी सपासप वाट संपवत गेलो. शाळेची घंटा कानावर पडली. मी धावत सुटलो. समोर शाळेची इमारत दिसली. मुले दप्तर घेऊन मैदानावर पोहोचली होती. काही अजून शाळेजवळच घुटमळत होती. मला पाहताच काही मुले गुरुजींना सांगायला धावत सुटली. एक गुरूजी व बाई आवराआवर करत होत्या. मी त्यांना हजर होण्यासंबंधी सांगितलं. पाण्याचा तांब्या माझ्या हातात दिला. मी थोडं पाणी पिऊन उरलेलं तोंडावर मारलं. मुख्याध्यापकांची चौकशी केली. ते कांही ऑफीस कामानिमित्त लवकर शाळेतून निघून गेले होते. गुरुजींनी आजच्या तारखेस हजर करुन घेतले. उद्या मुख्याध्यापक आले की रिपोर्ट करु. तुम्ही काही काळजी करु नका, असे म्हणाले.


शाळा सुटूनही थांबलेली सर्व मुले माझ्याकडे पाहत होती. नवीन गुरूजी आले आहेत, असे त्यांना बाईंनी सांगितले. बाई मला म्हणाल्या, "येथून वस्ती लांब आहे म्हणून आम्ही पाच मिनिटे लवकरच निघत असतो. पण आज काही मुलं, चारच्या सुमारास लहान सुट्टीत बोरं काढायला जंगलात भिकार टेंबलीकडे (स्थानिक टेकडी ) गेली होती. त्यांना आताच शोधून आणलं. त्या मुलांना शिक्षा म्हणून पाच मिनिटे वर्गात बंद केले होते. तुमचं नशीब चांगलं. नाही तर आम्ही तुम्हाला वाटेतच भेटलो असतो." खरं तर माझं नशीब चांगलच होतं. माझ्या नशीबातील तो सुवर्ण दिवस होता. 


शाळेच्या आजूबाजूला डोंगर होते. शाळेजवळ एक-दोन घरं दिसत होती.  दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने सकाळची शाळा होती. माझ्यासमोर त्या दिवशी वस्तीला राहण्याचा प्रश्न होता. बाई शाळेच्या गावातच एका वाडीत राहत होत्या. त्यांनी त्या दिवशी माझ्या राहण्याची सोय केली. वाटेतून जाताना राहण्यास खोली करण्याची सोय कुठे होईल काय याची चौकशी सुरु केली. त्यांनी माझ्या जातीची विचारपूस केली. त्या म्हणाल्या, "आम्ही सुशिक्षित याचा विचार करत नाही हो, पण इकडे जुने लोक अजूनही विचार करतात." जातीच्या निकषामुळेच मला परजिल्ह्यात नोकरी करण्याची वेळ आली होती. जी कधीच आपल्यापासून जात नाही ती 'जात' असते. हा जातीचा पगडा शिक्षणाच्या माध्यमातून दूर करुन  'माणूस' तयार करण्याचे आव्हान माझ्यासमोर आता होते आणि ते मी पहिल्या दिवसापासूनच स्विकारलंही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational