Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win
Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win

SHRIKANT PATIL

Inspirational

2  

SHRIKANT PATIL

Inspirational

हृदये जपून ठेवा

हृदये जपून ठेवा

3 mins
245


    शनिवारी सकाळची साडेसातची वेळ. शाळेत मुलांची सरस्वती पूजनाची लगबग चालू होती. विद्येची देवता सरस्वतीचे पूजन शाळेत होत असते. मुलांनी सरस्वती पूजनास सुरुवात केली. सरस्वती ची आरती म्हटल्यानंतर परिपाठामध्ये 'पणती जपून ठेवा अंधार फार झाला' हे गीत गायनास सुरुवात केली.


"हृदये जपून ठेवा, अंधार फार झाला

थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला."


या त्या गीतातील ओळी आज हृदयापासून हाक देत होत्या.


हे सण, उत्सव नक्कीच आपली नाती जपण्यासाठीच असतात. दसऱ्यासारख्या सणाच्या दिवशी आपण हृदयाच्या आकाराची आपट्याची पाने एकमेकांच्या हातात देऊन "सोने घ्या सोन्यासारखे राहा". अशा सदिच्छा व्यक्त करतो. अशा सणांच्या निमित्ताने माणसे येतात भेटतात. गप्पागोष्टी होतात. दिवस आनंदात जातात.

  

परवा एका जवळच्या मित्राला भेटण्यासाठी मी चाललो होतो. गावातील एका दहा -बारा घरांच्या त्या वाडीत मी गेलो. त्या मित्राची भेट झाली. मुलांच्या प्रगतीविषयी संवाद साधला व तेथून घरी येण्यासाठी निघालो. त्या छोट्याशा मावळतीला असणाऱ्या वाडीतून येताना मला कोणीतरी हाक मारली. मी मागे वळून पाहिले. एक आजी मला म्हणाली,

"तुम्ही पाटील गुरूजी ना?"

"होय, तुमची तब्बेत बरी आहे काय? " मी म्हणालो. 

"आता कसली तब्बेत? बाबा रे, मला आता डोल्यान दिसायचं कमी झालंय. बरंच दिवस दिसलंव नाय.

इथं चार नंबर साळंला असताना कधीतरी नजरस पडत होतीव." 

"होय आजी."

आता कुठल्या सालंत असताव?

मी म्हटलं, "आता गावातील एक नंबर शाळेत आहे."


या गावात पाच शाळा. बहुतेकशी एक दशकापर्यंत मी गावातील चार नंबरच्या शाळेतच सेवा केली. त्यामुळे सर्व वयस्क माणसंही मला घरच्या माणसासारखी ओळखत होती. त्या आजीने माझ्या परिवाराचीही विचारपूस केली. मावळतीला असणाऱ्या या वाडीतील लोकांच्या मनातील प्रेम, असणारा आदर किंचितही मावळलेले नसल्याची प्रचिती आली. त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये असलेलं हे नातं, रक्ताच्या नात्यापेक्षाही जोडलेलं आणि अखंड होतं. 


जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात.काही नाती असतात रक्ताची, तर काही हृदयाची! ही रक्ताची आणि हृदयाची नाती जपली पाहिजेत. सध्याच्या जगात आपण स्वतःचा खूप विचार करतो पण आपल्या नात्यांचं फारसं महत्त्व देत नाही. या धावत्या आयुष्यात महत्त्वाची असणारी नाती हरवत चालली आहेत.


नातं म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक असते. एका हृदयाची दुसऱ्या हृदयामध्ये केलेली. आपल्या प्रेमाची, विश्वासाची, एकमेकांना अवघड काळात मदत करण्यासाठी, आनंदात सहभागी होण्यासाठी ही अमूल्य नाती खूप महत्त्वाची आहेत. नात्यांमध्ये जितकं द्याल तितकंच तुम्हाला परत मिळेल. तुम्ही जितकं प्रेम कराल, विश्वास दाखवाल तितकाच तो तुम्हालाही मिळेल. त्यामुळे एकमेकांना समजून घेणं हेच महत्त्वाचं आहे.


काही परिवारामध्ये काही पिढीजात वाद असतात. मग ते जमिनीवरून असू दे अथवा संपत्तीवरून. येणाऱ्या पिढीवर त्याचा पगडा पडता कामा नये. आपल्या पिढीजात वादांचे कुसंस्कार भावी पिढीवर पडल्यामुळे हृदये दुभंगली जातात. असे मतभेद प्रत्येक नात्यामध्ये असतात म्हणून वाद घालत बसणं काहीच फायद्याचं नाही. त्यामुळे जर समोरचा बदलणार नसेल तर त्याच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःला बदल केला पाहिजे. एखाद्याकडून अपेक्षा करणं कमी केलं पाहिजे.


आज श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील दरी वाढत चालली आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी आपण रक्ताची नातीही क्षणात तोडायला मागेपुढे पाहत नाही. संपत्तीसाठी सख्खे भाऊही पक्के वैरी होतात. आपले आई-वडील, भाऊ-बहीण यांचा थोडाही विचार केला जात नाही. अहो, सर्वच नाती पैशावर तोलून कशी चालणार? त्यामुळे आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावून बसत आहोत. म्हणून नात्यांध्ये कधीही पैश्याचं मोजमाप करायचं नाही. नातं म्हणजे फक्त रक्ताचं नातं नाही, तर नातं म्हणजे जे मनातून जुळतं, एक रेशीम धागा जो अती ताणला तर तुटून जातो. म्हणून नात्याला खूप हळूवार आणि प्रेमाने जपू या. 

त्या प्रार्थनेतील शेवटच्या दोन पंक्तीची ज्योत आपण सदोदित आपल्या हृदयी तेवत ठेवू या.


 "पणती जपून ठेवा अंधार फार झाला

 थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला

 आले चहू दिशांनी तुफान विस्मृतीचे

 हृदये जपून ठेवा अंधार फार झाला"


Rate this content
Log in

More marathi story from SHRIKANT PATIL

Similar marathi story from Inspirational