पुनःश्च हरिओम
पुनःश्च हरिओम
जून महिना संपला. 'निसर्गा'चा रौद्र अवतार पाहिला. कोकण किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले. अगोदरच कोरोनाची महामारी आणि त्यात वादळ. दुष्काळात तेरावा महिना. तरीही बळीराजाने पुनःश्च हरिओम म्हणत नव्या दमाने सुरुवात केली. मृगाच्या अगोदरच ओहोळ, नद्या दुथडी भरुन वाहू लागले होते. कोकणातील भातलावणीला जोर आला. मध्येच लहरी पाऊस गायब झाला पण, यंदा शेती कसल्याशिवाय पर्याय नव्हता. हातच्या पोटावरचे चाकरमान्यांचे काम-धंदे बंद झाले आहेत. त्यामुळे त्यांनी गाव गाठलं. सर्वांचं पोट भरायचं तर शेतीशिवाय पर्याय नाही म्हणून चाकरमान्यांनीही कंबर कसली. कित्येक वर्षांनी त्यांनी हातात पुन्हा नांगर धरला. चिखलणी करु लागला. शेतीच्या कामाची मोडलेली सवय अंगात बाणवायला पुन्हा सुरुवात केली. परिस्थिती माणसाला बदलायला लावते. किंबहुना परिस्थितीप्रमाणे आपणही बदललं पाहिजे. तर अणि तरच आलेल्या संकटावर मात करु शकतो.
आमचंही शैक्षणिक वर्ष सुरु झालं. पण शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्या नाहीत. शाळेत मुलं नाहीत त्यामुळं देव नसलेल्या मंदिरात मन लागलं नाही. माणसाला काम हे पाहिजेच. कामात व्यस्त असणारं मन जर एकाकी पडलं तर... रिकामे मन सैतानाचे घर अशी अवस्था होते. या महामारीने जग किती वर्षे पाठीमागे जाईल यावर तज्ज्ञ माणसं समाज माध्यमातून भाष्य करत आहेत, पण काहीही असो मला मात्र वीस एक वर्ष पाठी गेल्यासारखं वाटलं. परिस्थितीही तशीच आहे. माझ्या नोकरीच्या काळातील दिवस आठवले. स्वावलंबनाचे धडे घेऊन नोकरीच्या ठिकाणी हजर झालो होतो. स्वत:च्या स्वयंपाकापासून ते धुणी-भांडी करण्यापर्यंत सर्व काही काम करत असे. दोनाचे चार हात झाल्यावर थोडा हातांना या कामातून विराम मिळालेला. सध्या मात्र कुटुंब गावी असल्याने नोकरीच्या ठिकाणी या सर्व गोष्टींचा पुनःश्च हरिओम म्हणत श्रीगणेशा करावा लागला.
आयुष्यातील सर्वांत महत्वाची कला म्हणजे पोट भरण्याची कला अर्थात स्वयंपाक कला जमली पाहिजे. केवळ पुस्तकी शिक्षण काय कामाचे? खरंतर याचे सर्व शिक्षण मला घरातूनच मिळाले होते. आई शेतमजुरी वरुन घरात येईपर्यंत चुलीवर भात शिजायचा. वसतिगृहात असताना भात-भाजीपासून चपाती
-भाकरी भाजण्यापर्यंत सर्व काही शिकलो. कोरोनामुळे सध्या खानावळी बंद. त्यात खेडेगावात एखाद्याकडे राहायचं म्हटलं तरी सर्वांनाच अवघडल्यासारखं. माझे जवळचे दोघे-तिघे मित्र स्वयंपाक न करता येत असल्याने जेवणाचे हाल कसे होतात ते सांगतात. परवा मुंबईत अत्यावश्यक सेवेमुळे अडकलेले माझे एक नातेवाईक तर पैसे असून जेवण वेळेवर भेटत नाही, असे म्हणाले. एकीकडे ऑनलाईन शिक्षणाचा मारा ऐकताना खरंच असे पुस्तकी शिक्षण पोट भरायला अशा परिस्थितीत उपयोगी आहे का? असे वाटतं. खरे शिक्षण तेच जे जीवन जगायला शिकवतं. म्हणून जीवनाची कौशल्ये आत्मसात करायला हवीच.
निसर्ग तोच आहे पण माणसाचं जीवन आता शहरी झालं आहे. शहरातल्या सवयी त्याला लागल्या. माझ्या शेजारी सहा-सात चाकरमान्यांचे कुटुंब आले. त्यांना चौदा दिवस दुसऱ्या घरात क्वारंटाईन केले. त्यात चार लहान शाळकरी मुलेही. त्यांना वाटलं आता गावी आल्यावर नदीवर मनसोक्त उड्या मारायला मिळतील. शेतात चिखलणीत बैलांना हाकायला मिळेल, पण या सर्वांच्या मध्ये कोरोनाची भिंत ऊभी होती.
एक-दोन दिवसांनंतर मुलं म्हणाली, "गुरूजी आम्हाला कंटाळा आला आहे. गावी नेटवर्क नसल्याने मोबाईलवरचाही टाईमपास बंद. आता चौदा दिवस संपायचे कधी?" मी म्हणालो आपणास हे दिवस पाळावेच लागतील. तुम्ही पुस्तकांना सोबती बनवा. माझ्याकडे वाचनकट्ट्याची काही पुस्तके आहेत. ती तुम्हाला देईन. त्यांनी "वाह! बरं झाले..." असे म्हणत मला त्यांच्या आवडी सांगितल्या. त्यांच्या वयोगटानुसार मीही लगेच पुस्तके दिली.
इकडे गावकरी लोकांच्या मनात तर कोरोनाची भयंकर भीती. ते चाकरमान्यांपासून नेहमीच दूर थांबत. अगदी गुराखीही गुरांसोबत जाताना मास्क घालू लागला. गुरं मात्र विना मुसक्ं, मन पसंत निसर्गात हुंदडत होती. पावसात अंघोळ करत होती. हिरवा लुसलुशीत चारा मन पसंत खात होती. पण या महामारीने मात्र माणसाच्या मुसक्या आवळल्या. शेवटी या सर्वांवर मात करत, निसर्गाची साद ऐकत, पर्यावरणाचे रक्षण करत माणसाला पुन्हा 'पुनःश्च हरिओम' म्हणत सुरुवात करायलाच हवी ना!