SHRIKANT PATIL

Tragedy Inspirational

2  

SHRIKANT PATIL

Tragedy Inspirational

आई... हॅपी फादर्स डे

आई... हॅपी फादर्स डे

3 mins
160


 नमस्कार वाचकहो, कदाचित लेखाचे नाव वाचून तुम्हाला काय तरी चुकल्या सारखं वाटलं असेल, पण तसं नाही.माझ्या जीवनात आजही शीर्षक तेच आहे.  21 जून .योग दिवस. जून महिन्याचा तिसरा रविवार. त्यातच योगायोग फादर्स डे. सकाळी सकाळी' सकाळ' पेपर मधील फादर्स डे ची माहिती वाचून माझ्या दोन मुलीनी फोन करुन या दिवसाच्या शुभेच्छा मला दिल्या. 


   फादर.....कुणाचे बाबा,कुणाचे पप्पा तर,कुणाचे डैड. या सृष्टीचा निर्माता भगवंत जरी असला तरी आपल्या सृष्टीचा निर्माता म्हणजे आपले आई- बाबा. प्रत्येक सजिवसृष्टीला बाप हा असतोच.सजीवाला निसर्गतः लाभलेली अमूल्य देणगी म्हणजे प्रजननक्षमता.कांही सजीव आपल्या पिलाना जन्म देतात.आपल्या वंशजाला जगात सोडून जातात. पक्षी आपल्या पिलाना भरारी घेण्याची ताकद पंखात येईपर्यंत मोठे करतात.स्वतःच्या पायावर चालायला,ऊभं करायला हेच जन्मदाते बळ देतात. मनुष्य जन्मात मात्र केवळ जन्म देऊन सोडत नाहीत.आपल्या मुलाना मोठं करायचं स्वप्न उराशी ठेवून ते झटतात.ते सप्न पूर्ण करुन तेच खरे 'बापमाणूस' ठरतात पण, प्रत्येकाला असा 'बापमाणूस' भेटेलच असे नाही. प्रत्येकाच्या जीवन रथाला आई -बाबा ही दोन चाकं मिळतील अशी नाही. कांहीना जन्मापासून पोरकपण सोसावं लागतं. कांही जन्मापासून अनाथ होतात. कुणाचा बाप आयुष्याची साथ सोडतो तर कुणाची आई. अन्ं सुरु होतो जीवनसंघर्ष .


   तसं तर माझ्या आयुष्यात माझ्या नावातल्या जागेपुरताच कायमच बाप राहिला.आज माझ्या मुलीनी शुभेच्छा दिल्यानंतरच मला आठवण झाली ती माझ्या बापाची. माझं वय लहान .जेमतेम महिना दीडमहिन्याचं.बाप घरातून संसाराकडे पाठ फिरवून निघून गेला तो आजपर्यंत फिरकलाच नाही. आज आठवण झाली ती ही माझ्यातील बाप जागा झाल्याने. माझ्याआयुष्यात बापाची जबाबदारी आईनेच पेलल्याने माझ्या आईने कधीच बापाची उणीव भासू दिली नाही. माझ्या आईने लग्नानंतरचा त्यांच्या जोड़ीचा एक फोटो ठेवला होता. त्यामधील बापाचे पुसटसे चित्र मला माझ्या डोळ्यासमोर दिसते.पण आज माझ्या जीवनात बाबा म्हटलं की समोर आईच ऊभी राहते. माझी आई हेच माझे बाबा. 

   

त्या काळात लग्न लवकर व्हायची. आईच्या पदरात आम्ही दोन मुलं.माझी मोठी बहिण आणि मी. एक चाक मध्येच धावपट्टी सोडून गेलं तर आसरा शेवटी माहेरच्या वाटेचाच. माझ्या आईनेही तेच केलं. तीने आपल्या आईच्या साथीने आम्हा मुलाना मोठं केलं. बापाची आठवण यायची तेंव्हा आई भावाच्या मदतीने शोधाशोध करायची.पण कुठेच पत्ता लागायचा नाही. कधी तरी आईला भावाकडून शोध लागल्याची बातमी यायची ,पण कोणी तरी शोध घेत असल्याचा सुगावा लागताच तिथून तो पळ काढलेला असायचा.


बापाच्या आठवणीने रडणारी आई मी पाहिली. एवढी मेहनत करूनही मी माझ्या लेकरांना काही देऊ शकत नाही असं म्हणून स्वतः ला दोष देणारी आई मी पाहिली. आमचं वय वाढत गेलं, शिक्षणात आर्थिक खर्च वाढू लागला. तसं बाप बेपत्ता असल्याचा सरपंचाचा दाखला घ्यायची गरज लागली.बाप नसल्याने काय होतं हे जाणवायला लागलं.


पण, त्याचं वयात आपली आई काय सहन करत आहे हे ही कळायला लागलं आणि हट्ट कमी होऊ लागले. आपल्या अभ्यासावर लक्ष्य केंद्रित केल.

कोणीही न सांगता आलेलं हे शहाणपण याची कोणत्या पुस्तकात शिकवण दिली गेली नाही. माझ्या त्या वयात मी माझ्या आईला” बाप” होताना पाहिलंय. “मुलं कोवळी असतात, ओल्या मातीची असतात हे असंच असतं” हे व. पुं च वाक्य अगदी खरं ठरलं माझ्या बाबतीत तरी.

जगायचं असतं हे त्यांना काहीच न कळलेल्या वयात कळालेलं


“तुझा आदर्श कोण?” असा प्रश्न विचारला की मी माझ्या आईचं नाव घेतो ..ज्यांची आत्मचरित्र लिहिली गेली ज्यांनी देशासाठी काहीतरी केलं..त्यांचा त्याग इ. गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी माझ्या आईने माझ्यासाठी स्वतःच्या संसारासाठी केलेला त्याग मी पाहिलाय.

मी साक्षीदार आहे त्या प्रत्येक क्षणाचा…आणि मला अभिमान आहे अशा स्त्रीच्या सानिध्यात मी वाढलो,मोठा झालो. शिक्षक म्हणून अनेक मुलाना घडवताना आईकडून मिळालेले पालकत्वाचे संस्कार मला निश्चित 'बापमाणूस 'बनवतील. माझ्या वर्तमानासाठी कष्ट करणारीही तीच …

आणि माझ्या भविष्याचा आरसाही तीच आहे.


या विश्वाचे दर्शन, या मातीचा स्पर्श, या निसर्गाचा सहवास, या समाजाचा परिचय, माझा आनंद, माझे सुख, माझे संपूर्ण जीवन या सगळ्याला अर्थ तेव्हाच येतो, जेव्हा मी अशा आईच्या पोटी जन्म घेतल्याची जाणिव होते. माझ्या बाबारुपी आईशिवाय मी शून्यच, माझं अस्तित्व शून्य, माझी ओळखही शून्यच……...म्हणूनच माझी मदर हिच माझे फादर. आई... हैप्पी फादर्स डे .


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy