शिवणीचा आंबा
शिवणीचा आंबा
दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट. सकाळी सकाळी मी धाऊलावर पोहायला निघालो होतो. सोबत माझ्या दोघी मुलीही पोहायला शिकण्यास जात होत्या .
घरापासून शेवाळलेल्या पायवाटेने जाताना सावधानतेने पाऊलं टाकत पाखाडीपर्यंत पोहोचलो. चिरेबंदी ,नागमोडी पाखाडीवरून जाताना छोटी गुड्डी आश्चर्याने म्हणाली, " बाबा,ते बघा आंब्याचं झाड पडलयं."
माझी नजर त्या पडलेल्या झाडावर गेली. झाडाची एका बाजूची विस्तीर्ण फांदी मोडून जमिनीला टेकलेली पाहून
मीही अवाक् होऊन म्हणालो, " अरेच्चा! काल संध्याकाळी तर झाड पाहिलं. केव्हा बरं मोडली असेल फांदी? "
अगदी म्हाता-या माणसाला लकवा मारावा व त्याची एक बाजू शरीरापासून लुळी पडावी तशीच अवस्था या झाडाची झाली होती ! जाता येताना पाहीलेलं डेरेदार खोडाचं झाड आज अधू दिसलं व क्षणभर त्या झाडाकडं पाहत मी स्तब्ध उभा राहिलो.
इतक्यात गुड्डी म्हणाली, "बाबा, चला पोहायला जायचं आहे ना?"
"हो ..हो " असं म्हणत आम्ही धाऊलाकडं मार्गस्थ झालो. पण झाड काय डोळ्यासमोरून जात नव्हतं.
कोकण म्हटलं की आंबा- फणसाची झाडं घराशेजारी, शेतात दिसतातचं. बहुतेक झाडांची नावं शेताच्या ठिकाणावरून ओळखली जातात. टेंबलीवरचा बरक्या फणस, दंडावरचा बिटकाआंबा, खिंडीतला गोडांबा , बोडणीकडचा धोद्यांबा , अख्खे घड धरणारा सांकवाजवळचा घडियाली, परसातला पातरीआंबा ...अशीच काही. प्रत्येक झाडांचं काहीतरी खास वैशिष्ट्य ठरलेलं .जसा कुठलाही फणस फक्त कापा वा बरका एवढ्याच बाबतीत वेगळा नसतो. तर त्याचे गरे, त्यांचे आकार, त्यांची फळांची संख्या, फळ धरण्याचा काळ ...आदिवरून ओळख ठरलेली असते. तशीच घराजवळच्या आंब्याची झाडंही आठवणीत रहावी अशीच!. एखादं मोठं आब्यांच झाडं तर..किमान दोन पिढ्यांच्या ओळखीचं. असंच सालप्यातील घागवाडीतलं सर्वांच्या परिचयाचं हे आंब्याचं झाड म्हणजेच- 'शिवणीचा आंबा' . दीड -दोन शतकांपूर्वी कुणीतरी लावलेलं असावं कदाचित! . जुन्या पिढीचा वारसदारच! कित्येक वर्ष खंबीरपणे वारा -खात,गारा -खात उभंच! गोड गोड रायवळ आंब्याची चव चाखायला देणारं...त्याचा चैत्र महिन्यात आंब्याचा बहर पाहण्यासारखांचं! कैरींचे घड या आम्रवृक्षाला लगडलेले . दिवाळीच्या सणाला विजेच्या दिव्यांची तोरणं
लटकावी तसेच जणू!
शिवणीचा आंब्याखाली वाडीतील अनेकांचं बालपण गेलेलं. झाडाच्या सावलीत रंगून गेलेले खेळाचे डाव... . मे महिन्यात सुट्टीला आलेल्या बालमंडळींची या मामाच्या गावच्या आंब्याखाली क्रिकेट खेळण्याची मजा ....काही औरच! मोठया सपाट मळ्या या झाडाच्या परिसरात असल्यानं मुलांनाही खेळायला ऐसपैस. या आंब्याच्या झाडाच्या रायवळ कैरीची चव तर मीठ व चटणी सोबत सर्वांच्या तोंडाला आजही पाणी आणते. पावसाळ्यात एखाद्या वादळाचा तडाखा बसलाच तर कैरींचा खच पडायचा.प्रत्येक आम्रवृक्ष दरवर्षी फळ देतोच असं नाही.कांही आडसालीही असतात. शिवणीचा आंबा न चुकता दरवर्षी बहरायचाच.पण गेल्या वर्षी तो बहरलाच नाही.
गावच्या संस्कृतीचंही दर्शन या झाडांनं घेतलंय. फाल्गुनात दरवर्षी शिमगोत्सवात होणारी पालखीनृत्य, सासर - माहेरच्या माणसांची नवसपूर्ती याच झाडाखाली ठरलेली. पाच पालख्यांच्या भेटीचा दिमाखदार सोहळाही या झाडांखाली पंचक्रोशीनं अनुभवलेला! माझ्या शाळेच्या, केंद्राच्या वार्षिक क्रीडास्पर्धा याच आम्रवृक्षाखाली भरायच्या. मंडपासमोर त्याची विस्तीर्ण सावली पसरलेली असायची.त्यात दिवसभर स्पर्धा रंगत.
झाडं ही त्या गावच्या पिढ्यांची साक्षीदार असतात. मातीतून उगवल्यापासून त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत व अगदी शेवटानंतरही त्याचं दातृत्व न संपणारं असतं! पण आपणचं माणसं त्याना विसरतो व घाव घालतो. आज 'शिवणीचा आंबा' थकलाय. अमरवेलनं त्याच्या फांदी फांदीला घेरलयं. तरीही ते ऊभंच आहे. जितकं शक्य आहे तितकं देण्यासाठी. अगदी इथल्या घराघरात एकट्या राहणा-या
म्हाता-या वा म्हातारीसारखं!
इथली बहुतेक घरं बंदच दिसतात. उघड्या असलेल्या बहुतेक घरात एखादी म्हातारा व म्हातारी .अगदीच एखाद्या घरात शेतीवाडी सांभाळणा-या मुलाचं कुटुंब. अनेकांनी चरितार्थासाठी मुंबई गाठलेली. त्या मुंबईत चाकरमनीलाच राहण्यास जागेची अडचण तर म्हातारी माणसं कुठं खपणार? कुणाचा भातुकलीच्या खेळाप्रमाणे अर्ध्यावरच संसार सोडून पती गेलेला तर कुणाची पत्नी!.उरलं आयुष्य गावाकडंच कंठायला चालू. आयुष्यभर खस्ता खाऊन शरीर थकलेलं व त्यात एखादं आजाराचं दुखणं सोबत घेऊन जीवनसंघर्ष नेहमीचाच! अगदी त्या शिवणीतल्या आंब्यागत!