संत नामदेव
संत नामदेव


महाराष्ट्रातील वारकरी पंथातील एक संत कवी म्हणून नामदेवांचा उल्लेख करता येईल. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेलेले नरसी नामदेव हे संत मराठवाडा येथील हिंगोली जिल्ह्यातले होते.
वारकरी धर्माची नि भागवत संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन ते पंजाबपर्यंत पोहोचले. त्यांच्या रचना शिखांच्या गुरुग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथात आजही पाहायला मिळतात. त्यांनी अखंड भजन-कीर्तन यांचे लेखन केले. श्री संत विठ्ठल हे त्यांचे दैवत होते.
दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. त्यांचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता म्हणजे ते शिंपी होते.
लहानपणापासूनच त्यांनी विठ्ठलाची भक्ती केली. एकदा गोरोबांच्या घरी संत गोरोबा, ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, चोखामेळा यांच्यासमवेत मेळा भरला होता. तेव्हा त्यांच्या डोक्याला हात लावून मुक्ताबाईने सांगितले, "नामदेव तुमचे मडके अजून कच्चे आहे..." तेव्हा ते गुरूच्या शोधात निघाले. विसोबा खेचर यांना त्यांनी आध्यात्मिक गुरू मानले. विसोबा खेचर गुरू मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनात खूप परिवर्तन झाले.
"पतितपावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा।
पतितपावन नव्हेसी म्हणूनी जातो माघारा।।”
या त्यांच्या रचनांतून त्यांचे बंड केवळ रचनांमध्ये नसून त्यांच्या वर्तणूकीतूनही वारंवार दिसून येते.
संत नामदेवांचा सारा परिवारच विठ्ठल भक्तीत रममाण होता. इतकेच नव्हे तर त्यांच्या घरी काम करणारी दासी जनाबाईदेखील विठ्ठल भक्त होती. तिच्या मदतीला विठ्ठल येत असे व तिचा घामदेखील आपल्या शेल्याने पुसत असे अशी आख्यायिका सांगितली जाते.
शीख बांधव नामदेव बाबा म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील शब्द कीर्तन व महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन यात विलक्षण साम्य आहे. घुमान येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. 'संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे १३५० साली पंढरपूर येथे पांडुरंग चरणी विलीन झाले.