Bharati Sawant

Inspirational

3  

Bharati Sawant

Inspirational

नाळ मातीशी

नाळ मातीशी

4 mins
754


काळ्या मातीत......तिफण चालते

बीज हूंकारूनी...... मातीत अंकुरते

नंदीबैलासंगे......बळीराजा राणीही

बीज काळ्या......... रानात पेरते


पिकवितेय हिरेमोती

रानची ही आई काळी

निरपितो बळीराजाही

घाम गाळूनीच भाळी


माती काळी की तांबडी. पण ती आपल्या पोटातून माणसाला हिरे मोती उगवून देते. स्वतः ऊन, वारा, पाऊस, थंडी यांचे चटके सोसून आपल्या गर्भातून मानवासाठी धान्य, कडधान्य, फळे, भाज्या यांचे उत्पादन देते. तिच्या गर्भात रूजलेलं बियाणं कधी वाया जात नाही. एका बीजापासून लाखो दाणे भरलेली कणसं ती देत असते.तिच्यात रुजलेलं बी-बियाणं अंकुरताना उठणारे हूंकारही सुखद वाटतात आणि दिनरात कष्ट केलेला बळीराजा भान हरपून पाहत राहतो. ही काळी आपल्या लेकरांना कधी उपाशी झोपू देत नाही.आपल्या कुशीतून जन्मलेल्या सजीवसृष्टीच्या मुखी घास घालायचा जणू ती वसा घेते. त्यामुळे तिची कुस उजवताच होणारा आनंद अनमोल असतो. त्यांचा घास मुखी घालून सारे आपले दैनंदिन जीवन जगतात. मातीतील वृक्ष, झाडे, वेली आपल्या पानाफुलांचा संभार वाढवितात.


ही माती त्यांच्या मुळांना घट्ट पकडून ठेवते. त्यांना उन्मळून पडू देत नाही. कितीही वाढले तरी त्यांची काळजी घेते. आपल्यातील सर्व पोषक द्रव्ये त्यांना पुरविते. त्यांच्या जीवावर सजीव आपले पालन पोषण करीत असतात. वृक्षांवर कितीतरी पाखरे आपापली घरटी बांधतात. सुरक्षितपणे अंडी घालून ती उबवितात. ऊन,वारा, पाऊस, थंडी यांच्यापासून आपल्या पिलांचे संरक्षण करतात. वृक्षाखालीही कितीतरी प्राणी आश्रयाला राहतात. एवढेच नव्हे तर उन्हांतून थकून आलेला पांथिक वृक्षांच्या खोडांची उशी करून आपले डोके टेकवतो. वृक्षाच्या सावलीत गाढ झोपी जातो. दिवसभर उन्हांतान्हांत काम करून थकलेला बळीराजा दुपारच्या जेवणाची शिदोरी याच वृक्षाखाली उघडून खातो. थोडा वेळ शीण घालविण्यासाठी तिथेच लवंडतो. ही माती म्हणजे सर्व सजीवांची आईच आहे.

मनुष्याचे भरणपोषण ही काळी आईच करत असते तरीही तो अधिक उत्पन्नाच्या हव्यासापायी वारंवार बीज पेरतो, रसायनांचा फवारा करतो आणि तिचं पोषणमूल्य कमी करतो. तरीही ती आपल्या लेकरांवर रागावत नाही. तिच्याकडून होईल तेवढे अन्नधान्य, कडधान्याचे उत्पादन काढून ती आपले पोट भरत असते. तिच्या पृष्ठभागावरून किती ओढे, झरे, ओहळ, नद्या वाहत असतात. ते आपल्या सोबत मातीचे कण वाहून नेत असतात. खडकांची झीज करून मातीत रूपांतर करतात. पण माती तरीही त्यांची साथ सोडत नाही. ती सुपीक बनत राहते. आपल्या पांढरीत राहणाऱ्यांना सुखी, समृद्ध करण्याचा प्रयत्न करते. या मातीतूनच कुंभार गाडगी, मडकी बनवतो आणि त्या मडक्यातील थंडगार पाणी तहानलेल्या वाटसरूला अमृताची चव आणि मनाला थंडावा देते. लहानथोर साऱ्यांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवत तिच्यातच सारे सजीव मोठे होतात. माणसाचा स्नेहबंध मातीची जोडला गेल्याने ती आईच्या नात्याची ओढ लावते. तिच्यावर पडणारे पावसाचे थेंब ही फुलारून उठतात आणि परिसर संमोहित करतात.


या काळ्या मातीशी नाळ जोडलेला मनुष्य पुन्हा पुन्हा तिच्याकडे परततो. म्हणूनच म्हटले आहे," मातीतून जन्मशी, मातीतच मिसळशी". खरेच आहे! सजीवाचा जन्मही मातीतून होतो आणि मेल्यानंतर मृत शरीरही मातीलाच मिळते. इतके आपण मातीशी घट्ट जोडलेलो असतो. तिच्यावरून चालताना आपणाला ती सुखद अनुभूती देते. अनवाणी चालणाऱ्या जीवाला थंडावा देते. मातीत पाय माखून घरी आलेला श्रमिक तिच्या स्पर्शाने प्रफुल्लित झालेला दिसतो. वृक्षतोड करून मानव जरी या मातीची धूप करत असेल तरी ती मानवाला कधीच दगा देत नाही. माती मुरमाड, खडकाळ असेल तरी ती मानवाला आपल्यामधील सर्वस्व देण्याचा प्रयत्न करते. या काळ्या आईवर प्रेम करणाऱ्या बळीराजाला ती भरभरून देते


खेड्यात जन्मलेल्या जीवांना मातीचे मोल कळले असले तरी शहरात तेवढे तिचे मोल कळालेले नाही. किंबहुना शहरात तिला सिमेंट काँक्रिटच्या जंगलात भूषष्ठाखालीच दाबले गेले आहे. शहरात वृक्षतोड बेसुमार होत आहे. इमारती, रस्ते, पूल बांधण्यासाठी मातीची धूप होत आहे. परंतु तरीही शहरात नोकरीला असलेला माणूस गावाच्या ओढीने गावी जातो. त्याची नाळ गावाच्या मातीशी बांधलु गेलेली असते.हा नोकरदार सणासुदीला, यात्रेला आपल्या गावाच्या मातीकडे परतत असतो. तिच्यात पेरलेलं रानमेव्याचं मिळणारं दान खाऊन मोठा होत असतो.


आपली पोषकद्रव्य नद्या-नाल्यांना पुरवत माती त्यातील पाण्याला अमृतमय करून टाकते. कोणताही आकस न ठेवता ती आपल्याकडील सर्व काही वाटतच असते.कितीतरी कवी हृदयाला स्वतःकडे आकर्षित करते आणि कवी लेखकही मातीची आपल्या जीवनाशी सांगड घालत सृजनाची काव्यनिर्मिती करतो. या मातीतून उगवणारी पांढरीशुभ्र फुले सुगंध वाटतात, तर धवल असणारा कापूस माणसाचे लज्जारक्षण करण्यासाठी कापड बनविण्यास उपयोगी पडतो. या मातीत असणारी पोषक मूल्य खाऊनच मनुष्य ऊर फाटेस्तोवर काम करू शकतो. मातीपासून नानाप्रकारची खेळणी बनवली जातात. आपली छकुली बाळे त्या खेळण्यांशी खेळत स्वत:चे मनोरंजन करून घेतात.मातीचे अनेक प्रकार असूनही सर्व प्रकारची माती मानवाला उपयुक्त असते. सुगंधी फुले पाहून आजारी माणसाचा रोगही पळून जावा. ती आपणास सर्व काही पुरवू शकते. त्यामुळे तिच्यात खपणाऱ्याला ती 'सर्व जगाचा पोशिंदा' अशी पदवी मिळवून देते. आजही कितीही कितीतरी संशोधक मातीचे परीक्षण करून तिच्यात वेगळ्या प्रकारचे उत्पादन कसे मिळेल याचे शोध लावत असतात.तिच्यातील कस हेरला जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन काढले जाते आणि स्वतःचे जीवन सुखावह केले जाते.या काळ्या आईच्या जीवावरच आज कितीतरी लोकांनी आपली प्रगती साधली आहे. देशाला किती तरी चलन मिळवून देण्यासाठी ही काळी आईच उपयुक्त आहे. कितीतरी युवक आज आपले करियर या मातीच्या जीवावरच अजमावत आहेत. सर्वांना भरभरून मोत्याचं दान देणारी ही काळी आई सर्वांनाच हवीहवीशी वाटते.


आला झिम्माड पाऊस

माती झाली गंध ओली

सुगंधित या परिमळाने

सृष्टी नवचैतन्यात न्हाली


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational