Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

सोज्वळ लावण्य

सोज्वळ लावण्य

3 mins
330


सोज्वळ लावण्य 

पहाटेचा थंडगार वारा

घालवी हा शीण सारा

अंगावर उठला शहारा

समीरण आवर पसारा


प्रभातीच्या निखळ, स्वच्छ समयाला हिरव्यागार निसर्ग सृष्टीचे चैतन्य अंगावर झेलत नवविवाहिता मंदिराच्या वाटे चालली आहे. भास्कराने आपली सोनकिरणे नभांगणात पसरवायला सुरुवात केली आहे. प्रभातीची थंडगार हवा आणि कोवळी उन्हे झेलत ही ललना नऊवारी नेसून हातात तांब्याचे तबक, कलश आणि निरंजन घेऊन नदीकिनाऱ्यावरच्या मंदिराकडे निघाली आहे. पाठीमागून झुळझुळ वाहणारे नदीचे पात्र सुरेल धून वाजवत प्रवाहित झाले आहे. सुवर्ण पिवळ्या नभांगणातून सहस्त्र रश्मी वसुंधरेपर्यंत पोहोचू लागल्या आहेत. असे भारतीय नारीचे रूप सोज्ज्वळ त्याचे सुंदर प्रतीक आहे.


महान हा भारत देश

नांदतेय येथे संस्कृती

नको बाधा परकीयांची

पसराया घातक विकृती


सोज्वळ रूपाची भारतीय नारी भारतातच नव्हे तर साऱ्या जगात आज समाज गौरवित आहे.नऊवार किंवा सहावार चापून-चोपून नेसलेली साडीतील तिची प्रतिमा एखाद्या देवी प्रमाणे भासते. माफक प्रमाणातील अलंकार आणि चेहर्‍यावरील हावभाव पुढच्या व्यक्तीला प्रभावित न करेल तरच नवल! आपल्या परिवारासाठी, घरासाठी, आप्तेष्टांसाठी खपण्याची तिची वृत्ती जगप्रसिद्ध आहे. स्वतःच्या घरासाठी दिनरात ती राबत असते. आपल्या लेकरांना मायेचा घास भरवित असते. देवधर्म, सणसोहळे या रूढी परंपरा जपत राहते. परमेश्वराकडे आपल्या कुटुंबासाठी पूजाअर्चा करून सुख मागत असते.तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, पायाच्या बोटातील जोडवी आणि कपाळावरची लाल टिकली तिच्या सौभाग्याच्या, पतीवरच्या प्रेमाच्य प्रतीकात्मकच आहेत.

जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय नारीच्या गुणांचे वर्णन ऐकावयास,पहावयास मिळते. आपल्या देशाला फार पूर्वीपासून सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. भारतात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. आपले सणसोहळे साजरे करतात. एकमेकांना सहकार्याने आणि अगत्याने घरी बोलावतात. आपल्या मिठास वाणीने आणि स्वभावाने घरी येणाऱ्या पाहुण्यांची ऊठबस करतात. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे स्त्रीचा हात असतो हे आपल्या संस्कृतीने दाखवून दिले आहे. राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि महाराणी ताराबाई ही काही उदाहरणे आहेत.स्त्री सर्वगुणसंपन्न असून संयम, जिव्हाळा, सोशिकपणा अशा गुणांची खाण आहे. त्यामुळे कितीही संकटे आली तरी धीराने ती त्यावर मात करत असते. तिचा देवावर आणि कर्मावर भरवसा असल्याने ती संकटांच्या वेळी डगमगून न जाता आपल्या कुलदैवताला संकटातून मुक्त करण्यासाठी आळवित असते.सुलतानी संकटाच्या वेळी स्त्रियांच्यावर अत्याचार, अन्याय झाले तरीही आपल्या सद्गुणांमुळे ती त्यातून ही तरुन निघाली. स्त्रीला कितीतरी काळ बंदिनी बनवले गेले, तरी तिने आजही आपल्या बुद्धीच्या, स्वभावाच्या आणि चातुर्याच्या जोरावर गगनभरारी घेतली आहे. सामर्थ्यवान बनली आहे.आज ती स्वतःच्या पायावर ती उभी आहे. अशाच एका सुंदर नवविवाहितेचे आज दर्शन घडले. तिच्या दिसणाऱ्या सुसंस्काराचे माझ्या लेखणीतून प्रतीकच उमटले गेले.


हिरव्यागर्द वृक्षाच्या खालून यौवना हलकासा मेकअप करून स्मितमुखाने वाट चालते आहे .वृक्षांवरच्या पाखरांचा गोड किलबिलाट ऐकत निसर्गसृष्टीचा डामडौल डोळ्यांनी भरून घेत ती शांत शिस्तीत पदकमले टाकत चालली आहे. तिला घरी पोहोचायची अजिबात घाई नाही असे वाटते. हलकासा मेकअप केलेल्या वदनावर नाकातील नथ सौंदर्याला खुलवत आहे.केसांच्या अंबाड्यात फुलांचा गजरा, हातामध्ये काचेची कंकणे, गळ्यांत मंगळसूत्र आणि चापून-चोपून नेसलेली वांगी कलरची नऊवारी साडी तिच्या सौंदर्याची शोभा वाढवित आहे, तिच्या खानदानी लावण्याची साक्षच देत आहेत. गोर्‍या कपाळावरील कुंकू तिच्या लावण्यात भरच घालत आहे. सोज्वळ रूपातील ही देखणी नारी शुचिर्भूत होऊन मंदिरात जात आहे.

हिरव्या निसर्गाला पहात तिचा पायही उचलत नाही. हा निसर्ग तिला लुभावत आहे. पायाखालची वाट लाल माती आणि हिरवळीने आच्छादुन गेली आहे. मखमाली हिरवळ तळपायाला जणू गुदगुल्याच करीत आहे. हिरवळीने फुललेला नदीचा काठ मनोहारी नि प्रसन्न भासत आहे. तिच्या पायाखालची वाट असून या सृष्टीची अनुभूती घेण्यासाठी तिची पदकमले थबकली आहेत. जणू निसर्ग तिला साद घालत आहे. वृक्षाच्या हिरव्यागर्द फांद्यावरील पक्ष्यांचा कलरव तिच्या कानावर पडला की काय! याचाच वेध ती घेत नसेल ना? नऊवारीमधील तिचा सरळ शेलाटा बांधा नि स्मित मुखावरील भाव तिच्या प्रसन्न मनोवृत्तीचे दर्शन घडवित आहेत. सभोवती उमललेल्या फुलांचा दरवळ मनाला मोहित तरी करत नसेल !


झालेय आज मनही बेधुंद

जाते ती मंदिराच्या वाटेवर

निसर्गसृष्टीची पाहता जादू

हरपुनी भान नाही थाऱ्यावर


Rate this content
Log in