विषय - एकत्र कुटूंब पद्धती
विषय - एकत्र कुटूंब पद्धती


घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
नांदावा प्रेम जिव्हाळा
नकोत फुसकी नाती
खरेच आहे.भरलेले घर गोकूळासम भासते.परंतू या घराची व्याख्याच बदललेली दिसते. मला प्रश्न पडतो की आजची युवा- पिढी आपल्या मूळ संस्कृतीपासून दुरावत चालली आहे काय ? माझ्या बालपणी आमचं दहा लोकांचं कुटुंब असायचं. आई, बाबा, आजी, आजोबा,आत्या, काका, काकू आणि लहानमोठी मिळून तीन चार मुले. सगळेजण एकाच छताखाली गुण्यागोविंदाने रहायचो. वंशपरंपरागत असा आमच्या कुटुंबाचा व्यवसाय होता. गावातच आमची पेढी होती. पेढीचे काम पाहायला दिवाण असत. बाबां नि काका सर्व व्यवहार आजोबांच्या सल्ल्यानेच करत. आजी, आई, काकू दिवसभर रांधा, वाढा, उष्टी काढा मनापासून नि निगुतीने करायच्या. बाबांची एक विधवा आत्याही कधी कधी राहायला यायची. शाळेतून घरी आलो की ओसरीवर बसून आजीच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व मुले परवचा म्हणायचो. देवापुढे सायंआरती करून शुभंकरोती म्हटली की आजीच्या सभोवती कोंडाळं करून बसायचो. आजीही रोज एक नवी गोष्ट सांगायची.
त्याकाळी दूरदर्शन नव्हते. रेडिओदेखील चैनीची गोष्ट. एखाद्याच्याच घरात रेडिओ असायचा. आमच्या घरात एक मोठा रेडिओ होता. 'आपली आवड' म्हणून मराठी चित्रपट गीते आणि 'बिनाका गीतमाला' म्हणून हिंदी चित्रपटगीते इतके कार्यक्रम आम्ही ऐकायचो.कधीतरी बालचित्रवाणीमध्ये भावगीतं सादर व्हायची.माझ्या आजोबांना क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायला आवडायची.ते ती ऐकण्यात एवढे तल्लीन व्हायचे की कॉमेंट्री चालू असताना मध्ये कोणालाही बोलू देत नसत.दिवसभर रेडिओला ते कानच लावून बसत.आई,काकू दुपारच्या वेळी बातम्या ऐकायच्या किंवा संध्याकाळी भक्तीगीतं ऐकायच्या.
आजीकडून गोष्ट ऐकली की ओसरीवर मग आमची शाळा सुरू.आत्या शाळा- मास्तरीण. कोणाला गणित ,कोणाला इंग्रजी असे विषय ती आम्हांला शिकवायची. रात्री आठपर्यंत आमचा अभ्यास झाला की आठच्या ठोक्याला जेवणाची पाने लागत. नऊ वाजता सर्वजण गुडूप झोपून जायचो ते सकाळी आजोबांच्या रेडिओवरील भूपाळीने सहा वाजता उठायचो. सकाळी आजोबा सक्तीने योगा ,प्राणायाम दंड-बैठका काढून घेत, सूर्यनमस्कार तर ठरलेलाच. सकाळी गृहपाठ झाला की शाळेची तयारी असे. सगळे टाइम टेबल असे असायचे. त्यात बदल म्हणजे सुट्टीत मामाच्या गावी गेलो तरच व्हायचे. जवळपास सर्वच घरात अशीच परिस्थिती त्याकाळी होती. मामाच्या गावाला फक्त उन्हाळ्याच्या सुटीतच जाता येत असे.बाकी वर्षभर आई आमच्याकडून आजोळसाठी लांबलचक पत्र लिहून घ्यायची.तिकडून कधी मामा किंवा आजोबा खुशाली कळवत.
हल्ली दूरदर्शन, संगणक, मोबाईल, लॅपटॉप अशा वैज्ञानिक संशोधनाने नि नवनव्या तंत्रज्ञानामुळे नव्या पिढीबरोबरच जुन्या पिढीला ही बिघडवले आहे. मोबाईल हातात असणे भाग्याचे किंवा मोठेपणाचे लक्षण समजले जाते. रडणारे दोन वर्षाचे मूलही मोबाईल हातात दिला की बटन दाबल्याप्रमाणे गप्प बसते. त्यामुळे जुन्या रुढी संस्कार किंवा देवपूजा ,धार्मिक कामे यापासून आजची पिढी खूप दुरावत चालली आहे. यांची रात्र बारानंतर सुरू होते आणि दिवस नऊ नंतर उगवतो. त्यामुळे व्यायाम किंवा सूर्यनमस्कार सोडाच पण सर्व शारीरिक व्यायामाचाही अभाव आहे. रोजच दिवाळी असल्याने दिवाळीसण किंवा खरेदी आणि दिवाळीचा फराळ त्यात काही नाविन्य राहिले नाही. मोबाईल वरून ऑर्डर दिली की दहा रुपयांपासून लाख रुपयांचा माल एका दिवसात घरपोच मिळतो. त्यामुळे पूर्वी दिवाळीला दुकानात जाऊन कपडे पसंत करणे,खरेदी करणे, फटाके आणणे यात जी मजा होती ती आता राहिली नाही. त्याकाळी शंभर रुपयेचा ड्रेस घेतानाही आनंद वाटायचा तो आता हजार रुपयांच्या खरेदीतही राहिला नाही. पूर्वी दिवाळीचा फराळ घरी बनवला जाई. गृहिणी चार दिवस मेहनत करून स्वतःच्या हाताने निगुतीने सर्व पदार्थ घरीच बनवत. आता बाजारात या पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे. बैठ्या कामामुळे रोगांचे प्रमाण वाढले आहे आणि गोड, तळलेले पदार्थ खाण्यावर नियंत्रण आले आहे.नवी पिढी मात्र पार्ट्या,हॉटेल्स,क्लब्ज नि पिकनिक्स यांच्या मोहमायेत गुरफटलेली दिसते.पाश्चात्य पद्धतीचे जीवन जगण्याची शैली वाढत आहे. त्यामुळे घरगुती जेवण किंवा कुटुंबाने एकत्र बसुन जेवणे ही पद्धतच आउटडेटेड झाली आहे.दोन पिढीतील वैचारिक मतभेद वाढले जात आहेत.संस्कारांचा अभाव दिसून येतो.पूर्वीच्या काळी जास्त पावसाळे बघितलेल्या जुन्या जाणत्या लोकांच्या सल्ल्यावरच घर चालत असे.हल्ली स्वैराचार वाढला आहे. नवविचारांनी प्रेरित झालेला यूवावर्ग स्वमताला जास्त गोंजारताना दिसतो.
जुन्या काळचे लोक म्हणजे अज्ञानी ठरत आहेत.यामुळे त्यांचा सल्ला घेणे दूरच पण त्यांच्या विचारांना ही किंमत दिली जात नाही.नवी पिढी स्वतंत्र पद्धतीनेच जगते. खान,पानाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत.चायनीज पदार्थ खाण्याकडे नव्या पिढीचा कल वाढला आहे. त्यामुळे अकाली हार्ट अटॅक येतात आणि ही पिढी निरनिराळ्या रोगांची शिकार बनत आहे. व्यायाम न करता फक्त खात राहिल्याने वजन बेसुमार वाढते . झोपेचे किंवा उठण्याचे निश्चित वेळेचे बंधन नसते त्यामुळे कधीही झोपणे, केव्हाही उठणे,इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपर्कात राहिल्याने डोळ्यावर नि मेंदूवर ताण पडतो. पूर्वी एकत्र कुटुंबात सर्वजण एकत्र बसणे, जेवणे किंवा गप्पा मारणे त्यामुळे संवाद चालायचे. विचारांची देवाणघेवाण होऊन मुलांवर वचकही रहात असे.आता विभक्त पद्धतीमुळे आणि आई-वडील दोघेही नोकरी करत असल्याने ते मुलांसाठी जास्त वेळ देऊ शकत नाहीत तर फक्त पैसे देऊ शकतात. त्यामुळे एकलकोंडेपणा वाढला आहे. मुले मित्रांची संगत, पबडान्स किंवा व्यसनांच्या बळी पडतात .यातून गुन्हेगारी वृत्तीही वाढली आहे. आई-वडील मुलांना मागेल तेवढे पैसे पुरवतात त्यामुळे पैशाची किंमत राहिली नाही. त्याचा विनियोग गैरमार्गाने होतो आणि नवी पिढी अनैतिक मार्गाने भरकटत चाललेली दिसते.एकत्र कुटुंबात संस्कार आणि प्रेम जिव्हाळा नांदत असतो. एकजूटीमुळे सर्वांची सुखदु:खात साथ मिळते.एखादे संकट आले की घरातले सर्वजण धावून येतात.मुलांच्या अंगीदेखील माणूसकी नि शिस्त आपसूकच बाणवली जाते.
पूर्वी लांब राहत असले तरी सणासुदीला सारे एकत्र यायचे त्यामुळे प्रेमाचे अतूट बंधन होते. आता सुट्टी पडली की अमेरिका ,युरोप टूरला जातात त्यामुळे सण साजरे होतच नाहीत किंवा त्यांचे माहात्म्यही जपले जात नाही. पूर्वापार भारतीय संस्कृती जगामध्ये आदर्श म्हणून नावाजलेली होती. पण आता बोकाळलेल्या या वागण्याने काही वर्षात भारत इंग्लंड अमेरिकेच्याच पंक्तीत बसलेला दिसेल. पिढीच्या संस्कारात तफावत जाणवेल.एकत्र कुटूंब पद्धतीत माणसे प्रेमाने, जिव्हाळ्याने बांधली जात होती. आता चित्र फार वेगळे दिसते आहे.निश्चितच ते एकत्र कुटुंब पद्धतीला मारक आहे.
घरात हसरे तारे असता
सुखसमृद्धीचे वाही वारे
भरलेले घर गोकूळासम
गोठ्यात बागडती गाईगुरे