Bharati Sawant

Others

2  

Bharati Sawant

Others

श्रावणातील गमतीजमती

श्रावणातील गमतीजमती

3 mins
221


'ऋतू हिरवा ऋतू बरवा' असे श्रावण महिन्याला म्हटले आहे ते काही वावगे नाही. असा हा श्रावण सगळीकडे हिरव्या मखमालीचा गालिचा पसरतो.


'श्रावणमासी हर्षमानसी

हिरवळ दाटे चोहिकडे

क्षणात येती सरसर शिरवे

क्षणात फिरुनी उन पडे'


असा हा हरीत श्रावण फार फसवा असतो. ऊन पडले आहे म्हणता म्हणता पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागतात. परंतु हा श्रावण पक्ष्यांचा राजा मोर यांस डौलदार पिसारा फुलवून नृत्य करण्यास आव्हान करतो. पावसाच्या धारा येवू लागल्या की मोराला थुई थुई नाचायला स्फुरण चढते. नानारंगी पिसारा फुलवून नाचताना त्याची छबी मनोहारी दिसते. श्रावणात वेली, वनस्पतींना वेगळीच पालवी फुटलेली असते. जसे काही नववधूचाच पेहराव. धरणी हिरव्या मखमालींचा साज अंगावर ल्यालेल्या हरितवसना नववधूच्या तोऱ्यात डौल दाखवते. फळाफुलांनी वृक्षलता बहरून येतात. पिवळी व जीर्ण पाने झडून जातात व हिरव्या लेण्यांचा साज चढवतात.


गवते आपली पिवळी कात टाकून हरित वस्त्रे परिधान करतात. वातावरणात प्रसन्नता येते. मृगसरी बरसून जातच खग आपले इवलाले पंख झटकून पिलांसाठी चारा आणायला घरट्याबाहेर झेपावतात.


उन्हंवाऱ्याचा लपंडाव‌

चालतो श्रावणीवारांत

धुंद प्रणयोत्सुक निसर्ग

झिंगतो टपोऱ्या धारांत


‌ 'येरे येरे पावसा तुला देतो पैसा' सारखी बालगीते गुणगुणत रिमझिम सरी अंगावर घेत आबालवृद्ध पावसात चिंब भिजतात व आनंदाने उड्या मारतात. कार्यालयात जाणारे लोक छत्र्या व पिशव्या सांभाळत, ऑफिस गाठण्याचा प्रयत्न करत असतात. रस्त्यातच वर्षाराणी बरसू लागली की त्यांना पळता भुई थोडी होते. टपोरे थेंब अंगावर झेलत त्यांना पडताना पाहून कोण मजा येते! असा हा श्रावणमास लहानथोर वृद्धबालके यांच्या आवडीचा महिना आहे. कारण पाऊस पडताच सर्वांना गरम गरम भजी व चहा यांची मेजवानी मिळते आणि विद्यार्थीवर्गाला मुसळधार पावसामुळे शाळेला सुट्टी मिळते.

श्रावणात धो धो पाऊस पडतोय म्हणून छत्री, रेनकोट घेऊन निघावे तर क्षणात उन्हाचा पट्टा पडलेला दिसेल. कधी उन्हातच पाऊस पडू लागेल त्यामुळे मुले गाणे म्हणत नाचू लागतील. थंडगार हवेच्या झोताने टपोऱ्या थेंबांच सिंचन पाहायला नयनरम्य वाटते. जिकडेतिकडे मृदगंध दरवळत मनालाही गारवा जाणवतो.श्रावणात पारिजातक, जाई, जुई अशा कितीतरी फुलांना बहर येतो. सारा परिसर हरितमय होऊन जातो. श्रावणात कधीकधी कोकिळेचे मधुर कुजन कानी पडते. सकाळी सगळीकडे दाट धुके पसरलेले असते. पावसाचे थेंब झाडांच्या पानावर मोत्यांसारखे चमकतात. हा निसर्गरम्य देखावा पाहताना भानच हरपून जाते.


श्रावणात निरनिराळ्या सणांची रेलचेल असते. रक्षाबंधन,नारळी पौर्णिमा, नागपंचमी, गोकुळाष्टमी असे सण असल्याने नातेवाईकही भेटतात. बहिण भावाला राखी बांधते. नागपंचमीला नागराजाला रक्षण करण्याचे आवाहन करतात. गोकुळाष्टमीला सर्वच आनंदी असतात. कृष्णाचा जन्मदिन उंच उंच हंड्या बांधून आणि फोडून साजरा करतात. १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सणही श्रावण महिन्यातच येतो.सणाच्या निमित्ताने शाळा कॉलेजला सुट्टी असते. घरी निरनिराळे गोड पदार्थ बनवले जातात.मिठायाही आणल्या जातात. निरनिराळे फराळाचे पदार्थ खायला मिळतात.


अभ्यास नि परीक्षेची कटकट नसते. श्रावणात आकाशात सप्तरंगी इंद्रधनूची मजा काही आगळीच भासते. सखीचा हात हातात घेऊन धबधब्यातील जलतुषार अंगावर झेलत इंद्रधनुची अनोखी शोभा न्याहाळत स्वच्छंद पाखराप्रमाणे हिंडण्याची मजा काही निराळीच! आकाशातुन त्याचे प्रतिबिंब रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या डबक्यात पाहायला मिळते. असा हा मनोवेधक, चित्ताकर्षक साऱ्या चराचर सृष्टीला मनोहारी असणारा पाऊस कोणाला आवडणार नाही?


शेतकरी लोक मात्र या ऋतूची या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात कारण त्यांना शेतातील बरीच खोळंबलेली कामे पूर्ण करायची असतात. सण साजरे करताना स्त्रिया, मुलींना नवीन वेश, अलंकाराने मिरवायची संधी मिळते. सर्व मुलामुलींना, स्त्रीपुरुषांना आनंद देणारा हा श्रावण सर्वांना प्रिय , सुखावणारा असतो. परंतु ओल्या हवेमुळे व चिखलामुळे निराळे किडे कीटक व कृमजीवींचा उपद्रव होतो. जागोजागी तळे साचून त्यात 'डराव डराव' करत बेडूक वास्तव्य करतात. मुले कागदांच्या होड्या तळ्यात सोडून आनंद मिळवतात असा हा श्रावण ऊन पावसाचा लपंडाव खेळत आनंद देतो.


दरवर्षी येणारा पावसाळा

भासतो नेहमीच नव नवा

जलतुषारांचे शिंपण होई

वसुंधरेचा थाट गार हिरवा


Rate this content
Log in