निर्धार
निर्धार


आज विनू रडतच शाळेतून घरी आला. आईने हळूच विचारले, "काय झाले आमच्या बाळाला? कोणी काही बोलले का?”
तसे विनू आणखीच फूरंगटून बसला. आता मात्र आईला राहवेना. एवढा शहाणा विनू आज असे हट्टाला का पेटलाय? तिला काहीच समजेना. ती विनूच्याजवळ जाऊन त्याच्या केसांतून हळुवार हात फिरवू लागली.
"काय झाले ते तरी सांगशील..." तसे त्याने आईचा हात झटकला. आता मात्र आईला त्याचा राग आला. ती म्हणाली, "नसेल सांगायचे तर राहू दे पण आज आम्ही काय बनवलेय ते पाहणार की नाही?"
आता पहिल्यांदाच विनूने मान वर करून पाहिले. आई गुलाबजामची वाटी हातात घेऊन उभी होती. विनूला गुलाबजाम खुप आवडत म्हणून आई वरचेवर गुलाबजाम बनवत होती.
आजही विनू शाळेला गेला तसे ती गुलाबजाम बनवण्याच्या तयारीला लागली. दोन दिवसांनी विनूचा वाढदिवस होता. सर्व मित्रांना गुलाबजाम खाऊ घालायचे असे विनूने तिला निक्षून सांगितले होते. आता विनूचा राग थोडा मावळला आणि तोंडाचा फुगा तसाच ठेवून तो पुटपुटला, "आमच्या या वाढदिवसालाही बाबा येणार नाहीत? गेल्या वेळेलापण ऑफिसच्या कामासाठी गेले. आताही नाहीत. आई बघ ना, माझ्या सगळ्या मित्रांचे बाबा बर्थडेला हजर होतात आणि आपले बाबा माझ्या बर्थडेला नाहीत."
विनूच्या रुसण्याचे कारण आत्ता कुठे आईच्या लक्षात आले ती हसली आणि म्हणाली, "असे आहे होय! मला वाटले काही दुसरेच कारण..." आपण असे करू या वाढदिवसाला आजी-आजोबांना नि मामा, काकांना बोलवू म्हणजे खूप मजा येईल.
आता मात्र विनूचे डोळे चमकले, "आई खरे का गं खरंच बोलवायचे का साऱ्यांना? कित्ती मज्जा येईल. सर्वजण मला खूप खाऊ नि खेळणी आणतील, मग मी माझ्या मित्रांना पण खेळणी दाखवीन." आईने त्याचा गालगुच्चा घेतला नि दोघे झोपायला गेली.
आज विनूच्या चेहर्यावर एक वेगळेच स्मित तरळत असल्याचे जाणवले. आईला वाटले नोकरीच्या निमित्ताने आपण मोठ्या कुटुंबापासून वेगळे राहिलो परंतु मुलांना आजी, आजोबा, काका, आत्या यांच्या प्रेमापासून परावृत्त तर करत नाही ना? मुले ही देवाघरची फुले त्यांना नात्यांची ओढ असते. आपले म्हणणारे सारे त्यांना जवळ हवे असतात. खरेच! आपला काळ वेगळा होता. वीस-पंचवीस लोकांचे ते भरलेले घर गोकूळासारखेच वाटत होते. जरी आज आपण सासरी आलो तरी त्या रक्ताच्या लोकांचे स्नेहबंध आपण जपून ठेवले आहेत. मग आत्ता आपल्या मुलांना त्यांच्या सग्यासोयऱ्यांपासून का वेगळे ठेवायचे?
आईने मनाशी काहीतरी निर्धार केला. विनूचे बाबा गेल्या दोन वर्षांपासून नोकरीनिमित्त दुबईला राहत होते. वर्षातून एक महिन्याची रजा काढून ते भारतात सर्वांना भेटायला येत होते. ते विनू आणि त्याची आई मग सगळीकडे फिरत. त्यावेळी विनू खूप जोशात असायचा. बाबा परत निघायची वेळ आली की मात्र तो चिमणीएवढे तोंड करून बसायचा.
तो बाबांना म्हणायचा,"बाबा तुम्ही इकडेच कायमचे रहायला या ना! तुमच्या साहेबांना सांगा ना माझा विनू माझी खूप आठवण काढतो. मग ते तुम्हाला इकडची नोकरी देतील."
त्या बालबुद्धीला इतकेच कळत असे. त्यामुळे बाबाही त्याला समजावत, "बाळा, मी थोड्याच दिवसांत इकडेच येणार आहे कायमचा नि आमच्या विनूबाळासोबत खूप खूप खेळणार आहे." अशा वेळी विनूचे डोळे वेगळ्याच तेजाने चमकत.
आईदेखील बाप-लेकाचे हे प्रेमळ संवाद ऐकत असायची. तिलाही खूप वाईट वाटे. विनूच्या शाळेसाठी तिनेच बाबांना हट्टाने इथे शहरात भाड्याने घर घ्यायला सांगितले होते कारण विनूच्या बाबांचे खेडेगाव होते. तिथे मराठी माध्यमाचीदेखील शाळा चांगली नव्हती तर इंग्रजी माध्यमाची शाळा कुठून असणार. आपल्या एकुलत्या एक मुलाला चांगले शिक्षण मिळावे असे दोघांनाही वाटत असे नि पूर्ण विचारांती निर्धार करून पत्नी नि मुलाला शहरात ठेवले होते. विनूचे बाबा सुटीला आल्यावरच ते तिघे गावी आजी-आजोबांकडे जात. तोवर त्यांच्यात काही संपर्कही नसे. मग विनूला त्याच्या माणसांचा लळा तरी कसा लागणार?
आता मात्र विनू मोठा होऊ लागला होता. त्याला घरात खूप माणसे राहायला हवी असायची. यावेळी विनूला बाबांचा नि आजी-आजोबांचा खुप विरह जाणवत होता. तिलाही ते जाणवले होते. तिने विचार केला या इवल्याशा लेकराला त्याच्या गोतावळ्यापासून दूर ठेवण्याचा मला काय अधिकार आहे?
नि एका झटक्यात मनाशी निर्धार करून ती उठली नि विनूला म्हणाली, "विनूबाळा उद्यापासून तू गावच्या शाळेत जाणार आहेस. मी घरी तुझा सारा अभ्यास घेत जाईन म्हणजे तू शिक्षणात कुठेच कमी पडणार नाहीस.” एवढे बोलून तिने घरातील सर्व सामान बांधायला घेतले. आई काय बोलते नि काय करतेय हे न कळून विनू तिच्याकडे आ वासून पाहू लागला...!