श्री समर्थ रामदास
श्री समर्थ रामदास


श्री संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, तुकाराम, एकनाथ या संतकुळीतील एक महान संत ज्यांच्या दासबोध ग्रंथरूपाने महाराष्ट्रात अध्यात्म जिवंत ठेवला आहे अशा संत रामदासांचा जन्म शके १६०८ साली चैत्र शुद्ध नवमीस मध्यान्हीस झाला. त्यांचे नाव नारायण. वडिलांचे नाव सूर्याजीपंत नि आईचे नाव राणूबाई होते. ते आठ वर्षाचे असतानाच वडील वारले आणि त्यामुळे ते अंतर्मुख बनले. मग पुढील वर्षी त्यांना प्रत्यक्ष राम दर्शन झाले. श्रीरामांनी त्यांना तेरा अक्षरी तारक मंत्र दिला. वयाच्या बाराव्या वर्षी विवाहप्रसंगी भटजींकडून 'सावधान' हा शब्द ऐकताच ते लग्न मंडपातून पळून गेले.
नाशिकजवळील गोदावरीकाठी त्यांनी टाकळी गावी अतिशय तपस्वीपणे, वैराग्याने, एकाग्रतेने बारा वर्षे रामोपासना केली. त्यांना आत्मसाक्षात्कार होऊन ते संपन्न झाले. चौतिसाव्या वर्षी भारतभ्रमण, तीर्थयात्रा करून वयाच्या ३६ व्या वर्षी ते कृष्णातीरी आले. चाफळला १६४८ मध्ये रामनवमीचा मोठा उत्सव केला. शिवाजी महाराजांना त्यांनी १६४९ मध्ये अनुग्रह दिला. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना युवा सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून मारूतीच्या नावे अनेक ठिकाणी बलोपासना केंद्रे काढली. रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु होत. जेव्हा शिवरायांनी त्यांच्या पायाशी स्वराज्य सोपविले तेव्हा त्यांनी ते नाकारले नि तुम्ही हिंदवी स्वराज्य सांभाळावे ही श्रींची इच्छा आहे, असे निक्षून सांगितले. त्यांनी निष्ठावान स्वामिभक्त सहकारी मिळविले. परकीय सत्ता जोपर्यंत समाजावर स्वामित्व गाजविते तोपर्यंत समाजाची दैन्यावस्था दूर होत नाही ही शिकवण त्यांनी दिली.
करुणाष्टके, मनाचे श्लोक इत्यादी साहित्य निर्माण करून समाजाला मार्गदर्शन केले. दासबोध या ग्रंथातून संसाराचे सार स्पष्ट केले. ते म्हणत 'आधी प्रपंच करावा नेटका मग जावे परमार्थ विवेका'. विवेकाच्या जोरावर मानव अंत:करणाने विशाल व आत्मज्ञानी बनतो हे त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान होते. सामान्य माणसाच्या, तळागाळातील माणसांच्या पातळीचा ते फारच सहानुभूतीने विचार करीत. शके १६८१च्या मार्गशीर्ष महिन्यानंतर माघ महिन्यात त्यांचे निधन झाले.