ईश्वरचंद्र विद्यासागर
ईश्वरचंद्र विद्यासागर


बंगालमधील श्रेष्ठ संस्कृतपंडीत, उदारमतवादी सुधारक असणारे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला. वडील ठाकुरदास आणि आई भगवती देवी.
कलकत्त्याच्या संस्कृत महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. हिंदूधर्मशास्त्र विषय परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांच्या नावापुढे विद्यासागर ही उपाधी होती आणि त्यामुळे त्यांचे बंडोपाध्याय हे उपनाम मागे पडून विद्यासागर हेच पुढे प्रचलित झाले.
वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा विवाह दीनमयीदेवीसोबत झाला. त्यांनी अध्यापकापासून शिक्षण निरीक्षकाच्या हूद्द्यापर्यंत अनेक वर्षे नोकरी केली. अनेक बालिका विद्यालय उघडले. अध्यापक विद्यालय आणि शिक्षण खात्यातर्फे त्यांनी अनेक विद्यालयांची स्थापन केली.
विधवांच्या प्रश्नांकडे त्यांनी जातीने लक्ष दिले. त्यांनी आपल्या मुलाचे लग्नही एका बालविधवेशी लावून दिले होते. बंगालमध्ये बहुपत्नीत्वाची चाल, मद्यपान अशा कुलीन ब्राह्मण वर्गात अनिष्ट चालीरिती होत्या. त्याविरुद्ध त्यांनी चळवळ केली म्हणून त्यांना आधुनिक बंगाली गद्याचे जनक समजले जाते.
त्यांच्यापूर्वी राजा राम मोहन राॅय
यांनी अशी चळवळ केली होती. मुली सज्ञान झाल्याशिवाय त्यांचा विवाह करणे योग्य नाही हे त्यांनी निक्षून सांगितले होते. त्यामूळे स्वत:च्या मुलींची लग्ने त्यांनी चौदा-पंधरा वर्षांच्या होईपर्यंत केली नाहीत.
प्रमाणभूत ग्रंथांचा आधार घेऊन विधवाविवाह धर्मसंमत आहे हे कर्मठ व सनातनी लोकांना त्यांनी पटवून दिले. हजारो नागरिकांनी त्यांना दुवा दिली. उदारमतवादी व मानवतावादी असल्यामुळे लोक त्यांना 'दयासागर' म्हणत.
बंगाली साहित्याला त्यांनी लालित्याचे लेणे प्रदान केले. लेखनात मिळालेला पैसा त्यांनी बुद्धाच्या करूणेने व कर्णाच्या दातृत्वाने खर्च केला. स्वतःचे घरही गहाण टाकून त्यांनी मधुसूदन दत्तांना कर्जमुक्त केले. हरिजन वस्तीत जाऊन कॉलराग्रस्त आजाऱ्यांची सेवा केली.
अखेरीस त्यांना पोटाचा कॅन्सर झाला. हजारो लोकांनी देवाची प्रार्थना केली पण देवाने ऐकले नाही आणि २९ जुलै, १८९१ साली दयासागर अमृतसागरास मिळाले.
"मी वास्तव जगाचा व त्यात राहणाऱ्या जीवांचा विचार करत असतो माणुसकीचे वागणे हाच माझा धर्म मानतो..." असे ते म्हणत. आपला धर्म त्यांनी आयुष्याच्या अखेरीपर्यंत निष्ठापूर्वक आचरिला.