ANJALI Bhalshankar

Action Fantasy Inspirational

4.5  

ANJALI Bhalshankar

Action Fantasy Inspirational

संशय आणि बापाचे ह्रदय

संशय आणि बापाचे ह्रदय

10 mins
1.3K


          फोटोग्राफी करत असताना असंख्य बरे वाईट अनुभव आले. खरेतर चांगलेच आले काही क्वचित प्रसंग सोडले तर माझा फोटोग्राफीचा प्रवासचा अत्यंत सुखदायी काळ होता खरंतर तोच आयुष्यातला सुवर्ण काळ होता. या व्यवसायात वेळेला फार महत्व आहे परंतु त्या त्या ठिकाणी पोहोचण्याची, परत येण्याची वेळ निश्चित नाही. ऐखादे काम हाती घेतल्यास, तिथे पोहोचायची वेळ पक्की पाळावीच लागते. अर्थात, हा आपल्या कामाचा भाग व कर्तव्य असतें खास करून लग्नाची ऑर्डर असेल तर त्या संबंधित लोकांच्या अगोदर लग्नाच्या ठिकाणी पोहोचायचे व वधूची पाठवणी होताना (अर्थात हल्ली पोरी रडत नाहीत म्हणा) अर्धा एक तास रडण्याचा सोहळा चालायचा वधुचा रडून मलूल झालेला चेहरा खुलविण्यासाठी फोटोग्राफरलाच हास्य विनोद करण्यासाठी वराती मंडळीवर जोक मारावे लागत या नव्या जोडप्याला फुलांनी सजविलेल्या गाडीत बसविल्याचे फोटो घेतल्या शिवाय अल्बम थोडाचं पूर्ण होतो? ते सुख त्यांच्या पेक्षा फोटोग्राफरलाच जास्त मिळते, त्याच्या मनासारखं काम झालेल असतं ऑर्डर पूर्ण झाल्याचं समाधानही मोठ असतं. किरकोळ काम असलं तरीही मी तितकयाच मनापासून करत असे. असाच एका प्रसंग मजेशीर आहे जो कायम आठवतो आणि माझे मला माझ्या मूर्खपणावर हसायलाही येत आणि मानसाच्या मनाची वैचारिक पातळी कधी कुठल्या गोष्टींवर कोणत्या स्तरावर जाइल याचीही प्रचिती येते एकदा असेच एका ओटीभरणाच्या कार्यक्रमाला शहरापासून दूर व मुख्य महामार्गापासून साधारण एक-दिड किलोमीटरवर असलेल्या एका बांधकाम साईट वर मी तशी नेहमीच जात असे.

          मुख्यात शनिवार-रविवारी सकाळी सातला घर सोडले की, तीन चार ठराविक साइटवर,आधी काढलेले फोटो देणे, फोटो एनलार्ज, जुने फोटो नवीन कर,रोल डेव्हलप, कर मयत लोकांचे फोटो लेमिनेशन करून दे अशी किरकोळ कामे तसेच वाढदिवस, बारसे, गणपतीत ब-याच ठिकाणी फोटो काढायला जात असे. बांधकाम साईटवर तर रविवारी फुल फोटोसेशन चालायचे. तरून पोरं निरनिराळ्या पोझमध्ये छान तयार होऊन एकेकट्याने व ग्रुपने, मुलीही मागे नव्हत्या पोरीपोरी मिळून, तर कधी संपुर्ण कुटुंब आपापले फोटोची हौस भागवत व काही छोटे कार्यक्रम असल्यास इतर दिवशीही मला फोन करून बोलवत. लग्न मात्र हे लोकं आपापल्या गावीच जाऊन करत असावेत. कारण, इतक्या वर्षात मला बांधकाम साईट वर एकही लग्नाचे काम मिळाले नाही मात्र किरकोळ कामे पुष्कळ मिळायची. अशाच एका साईटवर कार्यक्रम आटोपताना दहा कधी वाजुन गेले समजलेच नाही. फोटो काढण्या च्या नादात वेळेच भानच नाही राहिल तसे कार्यक्रम ही ऊशिराच म्हणजे सहाची वेळ ठरलेली. मात्र, प्रत्यक्षात सात साडेसात वाजता सूरू झाला. संबधित व्यक्तींनी म्हणजे ज्या मजुराच्या मुलीचा हा कार्यक्रम होता, त्याने आधी कल्पनाही दिली होती, तशी कि आमची पाच-साडेपाच ला सुटटी झाली की या तुम्ही म्याडम म्हणून. मला कल्पना होती ऊशीर होईल याची या कामात वेळेचे तारतम्य नाही तसेही मला अधुन मधुन ऊशिर होतच असे. शहरात ठिक होतं, पंरतु शहरापासून दूर या आडरानात व पुन्हा मुख्य बस स्टोप धायरी गावातला व थोडे दूरवर नव्याने विकसित झालेल्या पूणे मुंबई बंगलोर हाय-वे दोन्ही चे अंतर ही आत दिड किलोमीटर.हे बांधकाम अगदी दोन्ही च्या मध्यावरचं भोवतालचा परीसर दिवसाही निर्मनुष्य मोकळ माळरान ठराविक अंतरावर त्या त्या जागामालकांनी जागामालकांनी आपापली बांधकाम सुरू केलेली त्यावर काम करणारे मजूर बांधकामा च्या अर्धवट इमारतींवर दिसायचे. तशी ओळखी वाढल्याने भीती नाही वाटायची पंरतु दिवसा! मात्र आता रात्र होती ऊशिरही खुपच झाला होता. मी घरी कसे जावे या विचारतचं होते इतक्यात ज्याचा कार्यक्रम होता तो मजूरच येऊन बोलला. म्याडम, खर तर त्याच्या आवाजानेच मी भानावर आले. म्याडम किती झाले फोटो. पैसे कीती द्यायचेत आम्ही. आताच्या सारखा डिजिटल कॅमेरा थोडाच होता त्या वेळी माझ्या कडे? रोलचा कॅमेरा, आता ज्याला जुने मॅडेल म्हणतील पंरतु त्यावेळी निकोन 10ऐफ कॅमे-याची चलती होती माझ्याकडेही तोच रोलचा कॅमेरा होता.ज्या एका रोल मध्ये छततीस ते चाळीस फोटो येत त्यात कंपोझिग चुकले अथवा फलॅश लाईट पडली नाही तर नूकसान फोटोग्राफीरचेच,सिलेक्शन वा रीफलेकशन, डिलीट वगैरे चा प्रश्नच नाही कारण निगेटिव्ह डेव्हलप केल्याशिवाय थोडेच समजणार किती फोटो आणि काय ते ते म्हणतात ना फर्स्ट इंप्रेरेशन इज द लास्ट इमप्रेरेश! अगदी तोच मामला होता सरावानं मी माझे नुकसान होऊ नये यांसाठी प्रयत्न करीत राही. तसे, हल्ली सारखे डिजीटल कॅमेरे- नुकतेच बाजारात आलेले परंतु अगदी ठराविक कंपन्यांचे,विशिष्ट ठीकाणीच भेटायचे तेही अत्यंत महागडे जे घेण्याची माझी ऐपत नव्हती किती फोटो झाले मी कशी सांगणार खात्रीने कारण एखादं दुसरा चुकलेला फोटो स्क्रीन वर पाहून लगेच डिलीट करून दुसरा फोटो काढणे, असल्ं काही प्रकार नव्हते. म्हणूनच मी काळजीपूर्वक एकेक क्लिक करत असे. मीच काय सा-याच फोटोग्राफला हेच करावे लागे. नाहीतर, कमाई पेक्षा नुकसानच जास्त.

                 मी चार रोल संपवले होते म्हणजे अंदाजे एकशे साठ फोटो व अल्बमचे वेगळे असा पैशांचा हिशोब सांगितला खर तर पॉझिटीव्ह शिवाय थोडीच मला कळणार होते कारण एक तर तिथे लाइटच नव्हती धीम्या बल्बच्या ऊजेडात माझ्या फलेशगन च्या भरवश्यावर मी काम पूर्ण केले होते. रविवारी फोटो देते, मी निघते आता हे बोलतानाचे माझ्या चेहे-यावरील काळजीचे भाव त्या माणसाने हेरले असावेत. मॅडम तुम्हाला ऊशिर झालाय ना घरी कशा जाणार तुम्ही? आता कळलं काय याला मघापासन याचे काढा त्याचे काढा अमुक राहिला म्हणून पाहुण्यांना शोधून शोधून फोटो काढायला लावले यानं! आता म्हणतोय ऊशीर झाला मी कहिशा त्रासिक नजरेन पाहिलं. मुकादमाला गाडिवर सोडायला लावतो ना जरा वैतागून मी म्हणालं त्याची काही गरज नाही मी जाईन फक्त बस स्टॉप पर्यंत सोडा मला. ते ही मी कोणे च्या गाडीवरुन नाही जाणार असेल ना आता मी माझी चालत जाईन. खूप आग्रह करुनही मी त्या माणसाच्या गाडीवर जायला ठाम नकार दिला. मग तो मजूर शेवटी बोलला चला म्याडम मी सोडतो तुम्हाला बस स्टॉप पर्यंत. मग आपल्या भाषेतून पत्नीशी काहीतरी बोलल्यावर दोन तरण्या पोरांना सोबत येण्यास खुनावले तीघंजण पुढे. मागं मी अशी आमची सवारी निघाली. तेव्हढ्यात त्यांचा मुकादम म्हणजे ज्यांच्याकडे हे सारे मजुर काम व ज्याच्या भरवश्यावर आपले गाव सोडून ईतक्या दूर परदेशी एकटयाने वा कुंटबासह येतात हा मुकादमच त्या सा-यांचा अन्न दाता. या अनोळखी प्रदेशात त्यांचा रखवाला मालक सारचं असो.

            मुकादम समोरून आला कदाचित तोही शहराच्या मध्य वस्तीत कुटुंबासह रहात असावा त्यांच्या बोलण्यातून थोडं समजलं. त्याच्याकडे गाडी, मोबाइलही होता. रहणीमाणही शहरात शोभेल असेच होते. तो आज कार्यक्रमांसाठी आला होता अन्यथा रविवारी पगारी करण्या व्यतिरिक्त हे लोक साइटवर सहसा फिरकत नसतं. अधुन मधून कामाची, मजुरांची चौकशी करायला एक-दोन दिवसाआड पाच-दहा मिनिटांसाठी फिरकायचे. सा-याच साइट वरील ठेकेदांराची हिच पद्धत. याचे लेबर चार पाच साईटवर विखुरलेले असतात त्या सा-यांची जबाबदारी पगारी, सारं याच्या भरवश्यावरच. तसं त्यांचेही जीवण धावपळीचेच. त्या मजुरासह बोलणं झालंयावर त्याने गाडीची लाइट सुरू केला व गाडीवर न बसता हाताने ढकलत आमच्या सोबत चालू लागला आता पुढे हे चौघे आणि मागे मी या लोकांशी कामा व्यतिरिक्त कसलाच संबंध नसताना अशा अनोळखी परदेसी माणसांच्यावर विश्वास? ठेऊन मी रात्रीच्या दहा,सव्वा दहा वाजता त्या निर्जन माळरानातुन निघाले.आम्ही पुढे पुढे जात होतो आता मजुर कॅम्प व बाधकाम साइट दूर मागे गेली होती त्यामुळे जो तुरळक ऊजेडही दिसायचा बंद झाला तारूण्य खरेच!खुप हिम्मत व साहसाने भरलेले असते त्याला जणू भय नसतेच त्यानंतरच्या वयाच्या कोणत्याही टप्प्यात इतके धाडस व धैर्य क्वचितच रहात.नाहीतर वयाच्या अवघ्या वीस-एकोणिस वर्षात मी पुणे शहरातील निरनिराळ्या बांधकाम साइटवर, वस्त्यांमध्ये,गळ्यात कॅमेरा घेऊन फिरले नसते.मला कधीही भीती वाटली नाही थकवा जाणवला नाही. अगदी दिवसाला बारा-पंधरा किमी चालणे व्हायचे. साईटवरील टपरीवरच वडापाव मिसळ, भजी तर कधी रोडच्या कडेला उभ्या टपरी वरून लिंबू पाणी, कोकम सरबत, चालता चालता पिऊन घेई. परंतु कधीही लाज किंवा भय नाही जाणवले. मजूर लोकांशी जितक्या बिनधास्त तितकयाच मोठमोठ्या साहेब लोकाशींही मी बोलत असे. माझं कामात मला थ्रील वाटे हे दिवसा आणि वेळेच्या मर्यादेत ठीक पंरतु अशा रात्रीच्या वेळी!! मी जरा अस्वस्थ झाले मी फार सुंदर वगैरे नसले तरी तरुण होते. 

                   हि अनोळखी परमुलखातली माणसं यांच्या मनात चुकुन जरी काही वाइट आलं तर माझे काय होइल या विचाराने मला गार थंड वा-यातही घाम फुटला स्वताचा राग आला कशाल हे काम घेतले मी पैसा कमावण्यासाठी आता वेळ काळ ठिकाणाचही भान नाही राहिल का? आता मला खरच माझी फार मोठी चूक झाली. आज अशा विचारात स्वतालाच दोष देत, मी त्यांच्या मागेच जात होते. माझ्या कडे दुसरा इलाजच नव्हता विश्वास ठेवणे इतकंच माझ्या हाती होतं. माझ्या पुढे चारेक फुटाच्या अंतरा वरून ते चौघेजण चालतं होते मधून मधून मागे वळून आळीपाळीने म्याडम सावकाश या, नीट खाली बघून चाला मध्ये दगड आहेत, इथ खड्डा आहे अशा सुचना देत. मध्येच त्या पोरीचा बाप बोलला घाबरु नका. आम्ही आहे टेन्शन घेऊ नका आलचं आता जवळ बससटॅड. ते चौघेही कन्नड मिश्रित हिंदीत बोलत होते ठेकेदार अजूनही बंद गाडी हाताने ढकलत होता. दुचाकीची हेडलाइट सुरू ठेऊन आमच्यासह पायी चालत होता. पुढे काही अंतरा वर मोकळा सलग माळरान लागला चारी बाजुला किर्र अंधार काळयाकुट्ट रात्रीला चांदण्यांचा टिमटिमाट! दूरवर गावातल्या अंधुक विजेच्या दिव्यांचा तुरळक प्रकाश जो आमच्या पर्यंत पोहोचण्यास असमर्थ होता सध्या तरी मुकादमाच्या गाडीच्या दिव्याचीच साथ होती.आम्ही त्या उजेडात रस्ता कापत होतो तेव्हढ्यात ते चौघेही जागीच थबकले का? का थांबले हे अचानक् माझ्या काळजात चररॄ झाले का थांबले हे अचानक् एकदम काय झाले असे नक्की यांच्या मनात काय वाइट साइट तर नाही ना! असे वाटुन आल्या पावली माघारी कसे, कुठे,आणि कीती जोरात पळता येईल. हा पहीला प्लॅन व दुसरा ही लगेच सुचला कॅमेरयाची बॅग जोरात फेकुन त्यांच्यापैकी ऐकाला तरी जख्मी करायचं म्हणजे बाकीचे तीघे जण त्याला सावरण्याचा प्रयत्नात गुंततील तो पर्यंत मी दूर पळालेली असेल असे ऐक ना अनेक तरेचे भीतीदायक, धाडसी, संशयी विचार एकत्रीत पणे मसाचत होते. ते चौघे आता हळू आवाजात पुटपुटत होते मला चकार शब्द कळायला मार्ग नव्हता मी कानोसा घेत मागच्या मागे पळण्याच्या बेतान माझी चाल मंद केली तेव्हढ्यात मुकादम बोलला सावकाश सावध पणे या आमच्या मागुनच म्याडम असे म्हणून पुन्हा पुर्वीच्याच वेगाने ते चालू लागले आता जरा पुढे आल्यावर धायरी गावातलया घरांमधले व रस्त्यावरचे दिवे प्रखर जाणवू लागले तुरळक माणसेही दिसू लागली. काही जण तर त्या आडराणातून अशा अवेळी येणा-या आम्हा पाचजणांकडे संशयाने पहात आहेत, हे जाणवले. तरीही मला हायसे वाटले पंरतु मघाशी हे लोक अचानक का थांबले होते व मला कळू नये म्हणूनच फक्त त्यांच्या भाषेतूनच का बोलत होते. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे तर्कवितर्क मी मनाशी करीत त्यांना प्रश्नार्थक नजरेने पहातच होते. शेवटची अकराची स्वारगेट धायरी बस सुटायला अवघे दहा मिनिटे होती मी धावतच बसमध्ये जाऊन बसले माझा जीव भांड्यात पडला.हायसे वाटले खिडकी उघडून मी थोडी रीलॅकस झाले होते.कंडकटर अजूनही खाली बसभोवती फे-या मारत स्वारगेट स्वारगेट ओरडत होता. मला आता अजिबात घाई व फिकीर नव्हती. कारण, पुण्यात पी ऐम टी च्या तोडीचा सुरक्षित प्रवास जगाच्या पाठिवर क्वचितच असेल अशी माझी धारणा होती. आजही आहे. कदाचित जग न फिरलयाने अज्ञानही.बस संपूर्ण रिकामी होती. मी निवांत मागे टेकून दिर्घ श्वास घेतला मोठयाच संकटातून सुटल्या च्या आविर्भावात व जिंकल्याच्या आवेशात पुन्हा पुन्हा निश्वास सोडत होते. मी माझ्यातच मग्न झाले इतकी की खिडकी बाहेर मला सोडायला आलेले चार जण ऊभे आहेत हेही विसरले होते. क्षणभर मी खिडकी बाहेर पाहता क्षणी त्यांच्यातला मुकादमाने बोलायला सुरवात केली जणू काही मी त्यांच्याकडे पाहण्याचीच वाट पहात बसले होते ते. मुकादमाने अगदी उत्तम मराठीत बोलायला सुरवात केली मघाशी वाटेत येताना आम्ही अचानक थांबलो तुम्हाला सांगायचे राहिले. राग नका मानु स्वारी हा म्याडम आमच्यामुळं तुमचा गैरसमज झाला असेल ना! सहाजिकच आहे शेवटी तुम्ही बाईमाणूस आहात. म्याडम मी दहा वर्ष झालं पुण्यात आहे. त्याच्या बोलण्याचे भाषेचे आश्चर्य माझ्या चेहेरयावरन टिपून तो पुढे बोलू लागला.आहो माणसं कळतात आम्हालाही थोडीफार. तुम्हाला किती दिवसापासून पहातोय साइटवर तुमच्यासारखी तरणीताठी पोरगी आमच्या सारख्या अडाणी,मजुर लोकात घाणीघुणीत वावरते, कष्ट करते पुरूषाचं काम करते. सगळ्यांची प्रेमानं, आपुलकीन वागते दादा,ताई, काका, मावशी म्हणून आदराने वागवते हाक मारते,साहेबलोंकांशीही मर्जीने वागते, बोलते,हे सार मी ऐकतो पहातोय म्याडम आणि अस काम करणारी बाई पण पहिलांदाच पाहतोय बघा मी! तुमचे पाऊल अन नजर दोन्ही सरळ च आहेत बाई तुम्ही मला बहिणी सारख्याच. तुमच्या सारख्या सरळ बाईविषयी मनात पाप आणलं तर देव आम्हाला माफ करेल का? रोजगार देइल का? आम्ही पोटासाठी परमुलखात आलो तशा तुम्हीही घरातुन निघत असाल अशा आडराणात काठयाकूटयात, उन्हातानात पायी फिरता फोटो काढीत कष्टाने हिमतीने चार पैसे कमविता वगैरे वगैरे......मग मनसोक्त खळखळून हसत म्हणाला अरे ते मघाच सांगायचं राहिलच की घाबरू नका. पण. मगाशी आपल्या अगदी समोरणं भल मोठं जनावर (नाग) आडवं आल. गाडीचा ऊजेड होता म्हणून चमकलं. आपली चाहूल लागल्यानं तेही जागेवरच थबकल. डसायच्या बेतातच ऊभ होत महाराज गाडीचा दिवा फिरवलयावर आमच्या समोरूनच सळसळतं गेलं अंधारात गुडूप झाला बघा. तुम्ही घाबराल म्हणून तुम्हाला न सांगण्या बद्दल आपापसांत आमच्याच भाषेतून बोलत होतो म्हणून पुन्हा जोरजोरात हसू लागला मागे ऊभे असलेले तिघेही सामिल झाले. कपाळावर मारून घ्यायचा हात मी महाप्रयासाने रोखला व हसणयात सामील झाले. मग ज्यांच्या कार्यक्रमानंतर हे सारे नाट्य घडले त्या पोरीचा बाप मध्येच बोलला, रविवारी आमचे फोटो नक्की घेऊन या अन तुमचे ऊरलेले पैसे घेऊन जा. असल जनावर ऐका ठीकाणी नसतय थांबत आतापोवतोर हायवे च्या पल्याडच्या जंगलात पोचलं आसल आम्ही सारे पुन्हा हसलो. एव्हाना कंडकटर आत आला ड्रायव्हर ने गाडीला गियर टाकला ठेकेदारानेही गाडीला कीक मारली. ऊरलेले तिघे पुन्हा त्या घनदाट अंधाराला कापायला निघाले. बस सुरु झाली मी खरतर मनांत खजील झाले होते. आपल्या जीवावर शेकडो कुटुंबाना हजारो मैल दूर आणून त्यांना चार पैसे कमवायला मदत करणारा माणूस कसा वाइट असेल?आणि त्याही पुढे इतक्या गरीबीतही लेकीला पदर आल्याचा उत्सव थाटामाटाने साजरा करून तिची होसमौज पुर्ण करून देणेरा बाप दुस-याच्या लेकीच्या अब्रू चे मोल जाणणारच. जगात किती तरी श्रीमंत सुशिक्षित बाप असतीलही. पंरतु दुस-या च्या लेकीसाठी हा सुसंस्कृत पणा नसतो त्यांच्याकडे तो बाप म्हणून श्रेष्ठ आहेच पण माणुस म्हणूनही धन्य आहे. मी चालत्या गाडीतून त्या पाठमोरया बापाला मनोमन वंदन केले घरच्या ओढीने कासावीस झाले कारणं घरी माझाही बाप होता जो काळजीन माझी वाट पहात होता ना!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action