STORYMIRROR

Achala Dharap

Thriller

3  

Achala Dharap

Thriller

श्रावणसरी

श्रावणसरी

6 mins
203

'हासरा नाचरा जरासा लाजरा

 सुंदर साजिरा श्रावण आला !'


  अगदी असचं छान वातावरण होतं त्या दिवशी. आकाशात मस्त सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान..ऊन माळत माळत येणारा पाऊस! डोंगराच्या कुशीतुन वाहणारा धबधबा. कोणालाही भुल पडावी असं वातावरण.अशा वातावरणात शहरातल्या तरुणाईला तर गावात धबधब्यावर फिरायला जायला उधाणच येतं. 

   गावातली लोकं मात्र त्यांच्या नेहमीच्या कामात व्यस्त असतात. धबधबे, हिरवीगार शेते ही रोजचीच त्यांच्या बघण्यातली ठिकाणे. त्यांना त्याचे काही वैषम्य नाही.

   शेवंता नुकतीच वयात आलेली ,उत्साही, चुणचुणीत आणि कोणाच्याही डोळ्यात भरेल अशी गावातील मुलगी. ती गुरांना चरायला माळरानावर घेऊन चालली होती. तिचे आईवडील कडेच्या गावात गवंडीकामाला गेले होते. शेवंताने गुरांना रानात चरायला सोडले. ती तिथल्या खडकावर बसली होती. घरातुन निघताना पाऊस नव्हता म्हणून ती छत्री न घेताच आली होती. अचानक रीमझीम पाऊस आला. कडेला एक धबधबा डोंगर कपारीतुन नृत्य करतं करतं तालात येतं होता. शेवंताच्या मनात आलं नाहीतरी आपण भिजलोच आहोत तर धबधब्याखाली मस्त पाण्याचा आनंद लुटु या. त्या धबधब्याखाली ती बसली. तो धबधबा जणू तिच्यावर अभिषेक करत होता. शेवंता त्या धबधब्याच्या पाण्यातील तुषारांचा आनंद लुटत होती. नखशिखांत भिजून बेभान झाली होती. 

  इतक्यात तिथे चार तरुण मुले आली. शेवंताचे ते सचैल रुप बघून ते बेभान झाले. एक जण पुढे येतं म्हणाला,' अरे, ही तर मंदाकिनीचं दिसतेय! '

बाकीचे तिघे जोरजोरात हासायला लागले. एकाने तिचे फोटो काढायला सुरवात केली. तो मुलगा पुढे यायला लागल्यावर शेवंता म्हणाली," ए , म्होरं येऊ नकोस."

तिचं वाक्य ऐकून एक जण म्हणाला , 'गावरान पाखरू दिसतयं!' 

सगळेच जोरजोरात हसायला लागले. 

    आता मात्र शेवंता घाबरली. शेवंताला एक वर्षापूर्वीची घटना आठवली... 

  तिची मैत्रीण सुलभा नागपंचमीच्या आदल्या दिवशी दुपारी पुजेसाठी वेल, फुले आणायला माळरानावर गेली होती. अचानक खूप पाऊस पडायला लागला.संध्याकाळ झाली तरी ती घरी आली नव्हती. पाऊस पडायला लागल्याने तिला घरी यायला उशीर होतं असेल असं घरच्यांना वाटलं. संध्याकाळचे सहा वाजले तरी ती घरी आली नाही.काळोख पडायला लागला. घरचे शोधायला बाहेर पडले. सुलभाची आई तेव्हा शेवंताकडे ती आहे का म्हणून बघायला आल्या होत्या. शेवंताला चैन पडलं नाही म्हणून ती पण सुलभाच्या आई बरोबर सुलभाला शोधायला बाहेर पडली.'

'सुलभा ऽऽ सुलभा अशा हाक मारत शेवंता माळरानावर निघाली. अचानक 

एका धबधब्याखाली ती पडलेय असं लांबन शेवंताला वाटलं.ती धावतं पुढे आली. ते दृश्य पाहून शेवंता घाबरली. खरचटलेल्या , रक्ताळलेल्या अवस्थेत ती पडलेली होती. 'सुलभा' शेवंता जोरात किंचाळली. त्या बरोबर सुलभाचे आईवडील, गावकरी तिथे आले. तिची अवस्था बघून सगळेच घाबरले.सुलभाची आई रडायला लागली. कोणाला काही उमजेना.सुलभाची आई तिला हलवत होती. पण काही प्रतिसाद नव्हता. थोडीशी धुगधुगी आहे असं वाटलं. तिला दवाखान्यात नेलं तेव्हा कळलं की तिच्यावर तीन चार जणांनी बलात्कार केला होता. नंतर तिच्या अंगावर परत कपडे घालून तिला धबधब्यावरून खाली ढकलून दिलं होतं. सोळा वर्षाची ती मुलगी. चार नराधमांनी तिचे केलेले हाल त्याने ती बेशुद्ध झाली होती आणि त्या अवस्थेत तिला वरनं ढकलून दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. 

   सुलभाच्या घरच्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार केली. पण ती जिवंत नसल्याने त्या तरुणांचे वर्णन करायला आणि काय घडलं हे सांगायला कोणं नव्हतं. तेव्हा चौकशीला आलेल्या पोलिस बाई शेवंता मैत्रीण असल्याने तिच्या कडे पण गेल्या होत्या. शेवंताचा फोन नंबर त्यांनी घेतला होता. तिला फोन केला होता.

   आज त्या मुलांनी शेवंताचे फोटो काढले आणि त्यांची ती नजर बघून शेवंताला सुलभाच्या प्रकरणाची आठवण झाली.ती घाबरली. पण तिने मनाशी ठरवलं की आपली सुलभा होऊन द्यायची नाही. तितक्यात तिच्या आठवल की सुलभाच्या केसच्या चौकशीच्यावेळी पोलिसबाई गावात येत होत्या त्यांचा नंबर आपल्याकडे आहे. पण तिचा मोबाईल घरी होता. शेवंतानी धबधब्याच्या इथुन मागच्या बाजूला उडी घेतली.ती मुले तिचा पाठलाग करणार ह्याचा तिला अंदाज होता. ती मुद्दाम चिखलाच्या रस्त्याने घरी निघाली. तिला तो रस्ता , चिखल नेहमीचा होता.ती चिखल तुडवत तुडवत वेगाने घरी निघाली. पण ती मुले चिखलातनं वेगाने येऊ शकणार नाहीत याची तिला खात्री होती. ती धावत घरी आली. तिने मोबाईल वरुन त्या पोलिस बाईंना फोन केला नि तिच्या मागे मुले लागलेत असं सांगितल. त्यांना ताबडतोब गावात यायची विनंती केली. पोलिस स्टेशन पाच कि. मी. वर होतं. त्यामुळे बाईंनी तिला त्या येईपर्यंत काळजी घ्यायला सांगितली. 

  शेवंताला एक युक्ती सुचली. तिने शेतातील सगळा चिखल तिच्या अंगाला फासला. ती मुले येताना दिसल्यावर ती तिच्या घरात शिरली. मुले पाठलाग करतं तिच्या घरात शिरली. तिचे असं रुप बघून ते वैतागले. त्यातला एक म्हणाला, ' ए, चल आधी अंघोळ कर. जास्त हुशा-या करायच्या नाहीत. मुकाट आमच्या स्वाधीन हो. '

शेवंता म्हणाली, "चूल पेटवुन पाणी गरम करते. कडकडीत पाण्याने अंघोळ केल्याशिवाय चिखल जाणार नाही. गार पण खूप लागतयं. कुडकुडल्या सारख होतयं मला." असं म्हणत शेवंताने मुद्दामुनच हुडहुडी भरल्याच नाटक केलं.

दुसरा मुलगा म्हणाला, ' ए, आता आम्हीच गार पाणी ओतून तुला अंघोळ घालू का? की पटकन आवरुन येतेस. आम्हाला वेळ नाही जास्त. चल पटकन अंघोळ करुन ये. तो पर्यंत आम्हाला ग्लास दे. आम्ही मस्त दारुची मजा घेतो. तुला गार लागतय ना? तुला पण पाजतो थोडी. मग मस्त हाॅट होशील. '

शेवंता आता घाबरली. पोलिस बाई आल्या नाहीत तर आता तिच काही खरं नव्हतं. 

  ती अंघोळीला तिथल्या खोपटात गेली. वर तिने तिचे कपडे ठेवले होते. मुले बाहेर दारु पीतं होती. नशा चढलेल्या मुलाचं त्या खोपटाकडे लक्ष गेलं. त्याने तिथले कपडे ओढून आणले. तिला बोलला, ' चल, लवकर बाहेर ये आहेस तशीच.'

आता तर शेवंताच्या पायाखालची जमीन सरकली.इतका वेळ दाखवलेलं धारीष्ट संपल. आपली पण सुलभा होणार असं तिला वाटू लागलं. तिने आरडा ओरडा केला असता तरी काही उपयोग नव्हता. तिच्या घराजवळ कोणीच रहातं नव्हतं.तिने थरथरत आत असलेला टाॅवेल गुंडाळला आणि तिथल्या कोपर्‍यात ती उभी राहिली.लटपटत होती बिचारी.

ती बाहेर येतं नाही हे बघून एकाने त्या खोपटावर लाथ मारली. ती आता घाबरली. 

' नाही, नको...पुढे येऊ नका.'ती जोरात ओरडतं होती. 

चौघेही दारुचे ग्लास घेऊन पुढे सरसावले. ते आत खोपटात शिरले. तिचे ते रुप बघून त्याची वासना बळावली. वाघाला जसं समोर शिकार दिसली की चटक लागते. ते सावज तावडीत सापडे पर्यंत वाघाला चैन नसतं.तसच या मुलांच झालं होतं. ती चवताळली होती. एकाने तिला जवळ ओढले. तेव्हा उसने अवसान आणून शेवंताने पायाने तिथली बादली जोरात उडवली. बादली तोंडावर आपटेल म्हणून ते चौघे मागे सरकले. इतक्यात पोलिस बाई आल्या. त्यांनी जोरात आवाज काढला, ' ए, कोण आहात तुम्ही?

आता चौघांचे धाबे दणाणले. ते पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. पण बाहेर पोलिस फौज होती. ते आता सापळ्यात अडकले होते. चौघांना पकडून पोलिसांच्या गाडीत टाकलं.

पोलिस बाई शेवंताला सांगायला आल्या ,' घाबरु नकोस. काळजी घे.'

शेवंता म्हणाली, " मॅडम, त्या मुलांनी धबधब्यावर माझे फोटो काढलेत. ते मोबाईल मधुन डिलीट करा."

'करते. काळजी करु नकोस' असं सांगून त्या मुलांना पोलिस स्टेशनला घेऊन गेल्या. 

  इतक्यातच शेवंताचे आईबाबा आले. घराबाहेरन पोलिसांची गाडी जाताना बघून त्या घाबरल्या. घाई घाईने त्या आतं आल्या. आत दारुच्या बाटल्या, ग्लास पडलेले होते.आपण नसताना घरात कोणं आलं होत?हा काय प्रकार आहे. शेवंता कुठे आहे? अशा विचारात असताना समोरन शेवंता धावत येऊन आईला बिलगली नि रडायला लागली. तिला नुसता टाॅवेल गुंडाळलेला बघून शेवंताच्या आईचे पाय लटपटायला लागले. आपल्या मुलीवर कोणी काय केलं की काय या विचाराने त्यांना रडायला आलं. त्यांनी पटकन शेवंताला घालायला आधी कपडे दिले. शेवंताला हुंदका अनावर झाला. तिने झालेला सगळा प्रकार आईला सांगितला. शेवंताच्या आईने तिला जवळ घेतं तिचे मुके घेतले. त्या म्हणाल्या ," पोरी, एवढ धीरानी घेतलेस म्हणून आम्हाला धड दिसतेस. त्या काळ्या माय न तुला वाचिवलं. तो चिखल अंगाला फासलास म्हणून बरं झालं. तेवढा वेळ मधे गेला नि पोलिस बाई आल्या."

    तिकडे पोलिस स्टेशनला पोलिसांनी मुलांना काठीचे फटके द्यायला सुरवात केली. जसे जसे फटके पडायला लागले तशी मुले घाबरली. तिथे त्यांच्या समोर इन्स्पेक्टरनी सुलभाचा फोटो दाखवत विचारल, 'हीला ओळखलत ना ? '

या अनपेक्षित प्रश्नाने ते घाबरले. त्यांची बोबडी वळली. त्यांचा तो घाबरलेला चेहरा बघून ते आरोपी आसल्याचं पोलिसांना जाणवलं. प्रश्नांची फैर आणि काठ्यांच्या फटक्यांनी ते चौघे हैराण झाले. शेवटी त्यांनी सुलभावर केलेल्या अत्याचाराची कबुली दिली.

  दुसऱ्या दिवशी पोलिस स्टेशन वरुन शेवंताला न्यायला गाडी आली.शेवंता आणि तिचे आईवडील घाबरले.

शेवंताची आई म्हणाली," पोरी, काय हे मागं लागल? पोरं बड्या घरची श्रीमंत बापाची वाटत होती का? तर ते पोलिस स्टेशनला काहीतरी सांगून सुटका करून घेतील नि तुझ्या बद्दल गावात उगाच चर्चा होईल. तुझे फोटो पण काढले होते म्हणतेस. पोरीच्या वाट्याला काय येतय काय माहित? "

तिने शेवंताच्या बाबांना बरोबर जायला सांगितल 

   शेवंता आणि वडील गाडीतं बसले. पण दोघेही घाबरलेले होते. आता तिथे जाऊन कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल याची त्यांना काळजी पडली.

  ती घाबरत घाबरत पोलिस स्टेशनला गेली. इन्स्पेक्टर म्हणाले , 'घाबरु नकोस.' 

त्यांनी तिचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.तू दाखवलेल्या प्रसंगावधानाने तू तुझे प्राण वाचवलेस. पण तू आणखी एक महत्वाची गोष्ट केल्येस. तिला काही कळत नव्हतं की आपण काय केलय?

तिला पोलिस बाईंनी आतं नेलं. तिथे ते चौघे गजाआड होते. 

  त्या म्हणाल्या, ' हेच सुलभाच्या खुनाचे आरोपी आहेत. तू दाखवलेल्या धाडसामुळे आणि युक्तीमुळे आज हे पकडले गेलेत. आता यांना शिक्षा होईल.'

  हे ऐकून शेवंताच्या डोळ्यात अश्रू आले. सुलभावर अत्याचार होऊन ती मरण पावली या आठवणीने तिला दुःख झाले. त्याचवेळेस सुलभाचे आरोपी तिच्यामुळे पकडले गेले. त्या नराधमांना आता शिक्षा होणार . यामुळे शेवंताच्या डोळ्यात आनंदाश्रू पण होते. 

   श्रावणसरी तिच्या डोळ्यातुन वहातं होत्या. 


 


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller