पुस्तक माझ्या नजरेतून
पुस्तक माझ्या नजरेतून
'समुद्र' - मिलिंद बोकील लिखित एक छान कथा. मला या पुस्तकाबद्दल लिहायचं असेल तर मी म्हणेन की यात निसर्गाचं आणि विवक्षित स्थळी पोहोचेपर्यंत चा प्रवास आणि विवक्षित स्थळाचं वर्णन अतिशय मनोवेधक केलेलं आहे.
हा प्रवास आहे मध्यमवयीन जोडप्याचा. आयुष्यात-संसारात आता सुस्थित आहे, एकुलता एक मुलगा ही स्थिरावणार आहे - त्याबद्दलची खात्री आहे कारण जडणघडण तशी केली आहे. खरं पाहता, लौकिक अर्थाने एक सुंदर आयुष्य आहे आणि तसं ते खरोखरच आहे, असंही चित्रित केलेलं आहे. एकूणच भाषाशैली ओघवती असल्याने, पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचताना गुंगून जातो मनुष्य.
आता कथेबद्दल. त्याचा काही विशिष्ट अर्थ किंवा छुपा अर्थ असेल, गहिरा अर्थ असेल तर लक्षात आलेला नाही, समजलेला नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न आहे, काय कळालं ते मांडण्याचा.
इथे कथेमध्ये, नवरा आणि बायको, यांचे स्वतःचे म्हणूनही स्वसंवाद मांडलेले आहेत आणि एकमेकांशी असलेला संवाद ही चित्रित केला गेला आहे. म्हटलं तर एक साधी सरळ कथा. नवरा-बायको, एकाच वाड्यात राहणारे, त्यामुळे ओळख असणारे, महितीतली मुलगी आणि आवडलेलीसुद्धा म्हणून मागणी घालणारा तो. आणि नाही म्हणण्यासारखे काहीही नाही, अपेक्षाही फार नसलेली ती, म्हणजे आपापल्या मुद्द्यांचा विचार करून एकमेकांना दिलेला होकार आणि लग्न होऊन पती-पत्नीच्या नात्यात बांधले गेलेले दोन जीव. त्यानंतर मेहनतीची जोड देऊन साधलेला उत्कर्ष आणि गृहिणी म्हणून राहण्याची तिची आवड, असे एकमेकांस पूरक असणाऱ्या विचारसरणीमूळे फारसे संघर्ष नाहीत. आनंदी-समाधानी आयुष्य.
बायकोची फिरण्याची आवड लक्षात घेऊन तिच्यासाठी सरप्राईज व्हिजिटसाठी घेऊन जाणारा तो, बायकोच्या एकूण दैनंदिनीशी अपरिचित नाही. त्या एका विवक्षित गोष्टीची त्याला अंधुकशी कल्पनाही आहेच, पण त्याला कल्पना आहे या गोष्टीबद्दल बायको मात्र अनभिज्ञ आहे. विचारावे किंवा नाही हे द्वंद्व आहेच त्याच्या मनात, आणि तिने स्वतःहून - स्वतःच्या तोंडाने सांगावे, त्यापेक्षा कबुल करावे, हा ही एक विचार आहेच.
ती एकुणात सुखी. नवरा जास्त वेळ देऊ शकत नाही, हे समजूतदारपणे घेणारी तरीही अंतरात कुठेतरी एक क्षीण कळ आहेच त्याबद्दल. शिवायच, नवरा काहीही विचारत नाही स्वतःहून, हा एक सल. त्याने प्रश्न विचारले तर मी धडधड उत्तर देऊन मानसिक भारातून मोकळी होईन, हा एक विचारप्रवाह तिच्या मनाचा.
मग काय? हा साहजिक प्रश्न.
स्त्री-पुरुष मैत्रीत 'नर-मादी' हे नातं निर्माण होतं का? या प्रश्नांची उकल करायची असते, तिला, आणि बोललं गेलेल्यातून - न बोलण्यातून समजून घेणारा पुरुष, हे आणखी एक. सुरुवात मैत्रीतूनच होते. तिचा एक हेतू पक्का असतो, त्याप्रमाणे तिचा वेळ ती घेणार असते. पण तिची अंतरीची तळमळ की 'बोलण्यातून - न बोलण्यातून तिला समजून घेणारा पुरुष' तिला गवसतो. आणि 'शरीरसंबंधाची (विवक्षित गोष्ट)' पहिली हाक ती स्वतः देते आणि त्यानंतर ती गोष्ट तीन-चार वेळा घडते आणि शेवटच्या वेळी जेव्हा तो पुरुष प्रश्न करतो की तुझ्या नवऱ्याला जेव्हा कळेल की त्याची बायको मी वापरली आहे तेव्हा त्याला काय वाटेल? यामुळे ती भानावर येते, त्याला एक थोबाडीत मारते, त्याच्याशी असलेले सगळेच संबंध तोडते.
आणि हे सगळं ती नवऱ्याला समुद्रकिनारी असलेल्या त्या नितांत सुंदर स्थळी सांगते. तिच्या आयुष्यात कोणतीही कमतरता कधीच नव्हती, कोणत्याही दृष्टीने नव्हती, कोणत्याही नात्यात नव्हती - या सगळया गोष्टी ती तळतळीने त्याला सांगत असते, सांगत राहते आणि तरीही तिच्या 'विवक्षित कल्पने'बद्दल ती स्वतःदेखील अडखळत असते, तेव्हाही आणि सांगतानाही.
आणि मग परतीचा प्रवास. सगळ्या गोष्टी एकदमच मागे टाकून, जणू तो काळच नव्हता आलेला - असं म्हणून, नवरा-बायकोचा प्रवास परत सुरू - परतीचा - त्या समुद्रकाठच्या गावाहून घरी आणि दम्पती म्हणूनही!
