Deepali Aradhye

Others

2  

Deepali Aradhye

Others

मैत्र

मैत्र

2 mins
131


कालपरवापर्यंत मी द्विधा अवस्थेत होते की, मैत्री असावी की नसावी? BFF आहे का मला? वयाचा या टप्प्यावर आणि इथून पुढे मैत्री होऊ शकते? बरेचदा निराश करणारी उत्तरं मनच मनाला द्यायचं. आणि मग आयुष्यात नव्याने येणाऱ्या प्रत्येकाकडून 'मैत्री' होऊ शकते का, याची चाचपणी व्हायला लागली. मग स्वतःलाच मी इशारा दिला की, हे काही खरं नाही.


कारण, आजूबाजूचा भवताल बदलत राहतो सारखाच, निसर्गाचा तो सातत्यपूर्ण नियम आहे. मग ज्यांना 'मैत्र' म्हटलं-मानलं ते ही परिस्थितीनुसार बदलत असतील, तर आपल्याकडे निदान ती 'बदललेली माणसं' स्वीकारण्याची ताकद तरी निश्चितच असायला हवी.


कसं असतं न, निदान मला तरी वाटतं, आपल्या भावभावनांवर आपलं नियंत्रण असायला हवं. आपले मान, त्यातुन उद्भवणाऱ्या भावना या आपल्या असतात. त्यांना आपण घडवलं असतं. मग इतक्या सहज त्यांना दुसऱ्यांच्या हातात का सोपवायचं! आपण कोणालाही कह्यात घ्यायचा प्रयत्न करत नाही, तर त्याच वेळी आपणही म्हणजे आपल्या भावना-विचार-मत दुसऱ्यांच्या कह्यात जाता कामा नये, ही खबरदारी आपली आपणच घ्यायला हवी. मग आपोआपच घायाळ होणं कमी होतं.


'मैत्री' ही फार सुखद भावना आहे. समजून-समजावून घेण्याची. मात्र हा टप्पा मैत्रीत येईलच असं नाही. बहुदा तो एकतर्फी असेल तर समजुन घेणाऱ्यालाच जास्त वेदना वाट्याला येतात. म्हणूनच जोपर्यंत हा 'समजून-समजावून' घेण्याचा टप्पा खात्रीशिरपणे आणि प्रामाणिकपणे दोन्ही बाजूने असत नाही, तोपर्यंत 'मैत्र' आहे हे समजण्याचे कारण नाही. तर मनाची तयारी हीच हवी की कदाचित हा टप्पा अजून फार दूर तरी आहे किंवा मग या ओळखीमध्ये मैत्री होण्याची शक्यताच नाहीये.

मग या note वर मात्र सरळसरळ चार पावलं मागे घेऊन, तिथेच थांबणं योग्य. नाहीतर घडणाऱ्या सगळ्या नकारात्मक गोष्टींना आपणही तेवढेच जबाबदार ठरतो, जेवढी समोरची व्यक्ती.


रक्ताची नाती, जन्माने मिळतात तर वाढीव नाती लग्नानंतर मिळतात. मात्र, मैत्री हे एकच नातं असं आहे, जे आपण निवडू शकतो. निवडलेल्या नात्यात तो 'आपलेपणा' येण्यासाठी वेळ द्यावा लागतो-वेळ घ्यावा लागतो. तरच या नात्याची सुंदर वीण गुंफली जाऊन आयुष्यभरासाठी एक सुंदर-सुखद गोफ विणला जातो. 'मैत्र' - समवयीनच असेल असं मात्र अजिबात नाही आणि वयाचा टप्पाही त्याला निषिद्ध नाही. पण कदाचित 'निवड' चुकली तर ती मान्य करायला हवी. आणि नकळत घडलेल्या चुकीसाठी स्वतःला, समोरच्याला ही माफ करता आलं पाहिजे, रादर, तसं माफ केलं गेलं पाहिजे.

मग या स्वच्छ मनाने पुन्हा एकदा सज्ज होता येईल. आपल्या प्रयत्नांना यश येईल. एक स्वच्छ-सुंदर-शुद्ध-नितळ मैत्री आपल्याला ही मिळेल. निराश होऊ नये. 'अनुभव' - बरे-वाईट येतंच असतात. त्यातून आपली काही बैठक तयार झाली की 'मैत्री'चं नातंही बहरेल-फुलेल.

अशी ही मैत्री - मी पण वाट बघत आहे!


Rate this content
Log in