एकमेकां साह्य करू...
एकमेकां साह्य करू...
'समाज' म्हटला की ठळकपणे दोन गोष्टी दृष्टीसमोर दृग्गोचर व्हायलाच हव्यात. सर्वात महत्त्वाची म्हणजे समाज'घटक' म्हणून आपण स्वतः आणि त्यानंतर लगेचच समाजाची 'रचना' ही महत्त्वाची पायरी. या पायरीवरसुद्धा आपण सर्वात प्रथम आणि सर्वात पुढे स्वतःलाच पाहायला पाहिजे, ठेवायला पाहिजे. कारणं अनेक, या गोष्टीला पैलू अनेक. 'जसा मनी वसे भाव, तसा दुसऱ्यादेखी दिसतसे देव!'
समाजाचा घटक म्हणून समाजाची रचना काय-कशी असावी, असा मनात विचार आलाच पाहिजे, आणि त्याची तयारी म्हणून काही ठराविक गोष्टी करायला हव्यात. जसं की
1) समविचारी लोकांनी एकत्र येणे.
2) काहीएक कार्यक्रम पत्रिका तयार करणे -
अ] नजीकच्या भविष्यात फायदेशीर ठरतील असे, काही लगेचच परिणाम दाखवतील असे, तर
ब] काही दीर्घकालाने आणि दीर्घकालीन परिणामकारक ठरतील असे उपक्रम सुरू करून राबविणे. सातत्याने त्या उपक्रमांवर काम करताना आपापसातील भूमिकांची अदलाबदल करत, कालसुसंगत, त्याबरोबर प्रॅक्टिकली येणाऱ्या अडचणींनुसार बदल करत, मात करत, उपाययोजना करत उपक्रम राबवत राहणे. त्यात नवीन लोकांना सामील करून घेत, योग्य ते शिक्षण-प्रशिक्षण देत - समाजरचनेचा रथ अविरत चालता ठेवणे.
मूलभूत समाजची रचना, त्याचा ढाचा समूळ उखडून टाकत, नव्याने काही करायचं नाहीये. कारण अविरत पुढे पुढे चालत आलेल्या या समाज रचनेने 'आपल्या देशाची' एक संस्कृती - काही परंपरा निर्माण केल्या आहेत. ज्यातून 'एक व्यक्ती' म्हणून, 'कुटुंब' म्हणून, 'नागरिक' म्हणून प्रत्येकाची जडणघडण होत आली आहे. पाया रचला गेला आहे - जो मजबूत आहे. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी-घटनांचा परिपाक म्हणजे 'आपल्या देशाची ओळख' विश्वामध्ये निर्माण झाली आहे. पर्यायाने ही 'ओळख' टिकवणे, वृद्धिंगत करणे, ही जबाबदारी आपल्या शिरावर आहे. खूप कुशलतेने ही जबाबदारी पेलताना -
'एकमेकां साह्य करु, अवघे धरू सुपंथ' अशी समाजाची बांधणी असायला हवी, थोडक्यात आपण ती करायला हवी. यासाठी मोठं उदाहरण म्हणजे 'भारतीय स्वातंत्र्याचा लढा', आपल्या नजरेसमोर मूर्तिमंत उभं आहे. यातूनच धडा घेत, म्हणजे, 'एकीचे बळ-मिळते फळ', म्हणजेच आपण एकमेकांसोबत, एकमेकांचा हात घट्टपणे हाती धरून मदत करण्याची, देण्याची-घेण्याची, मनाची घडण करायला हवी, घडवायला हवी.
जेव्हा आपण आपल्या भोवताली नजर फिरवतो आणि काही न्यून-कमतरता अधोरेखित करतो, त्याचवेळी त्या सगळ्यांवर उपाययोजना काय? पर्याय काय? उत्तर काय? याचाही विचार करावयास हवा. स्वतःची ही जबाबदारी मान्य करत, या सकारात्मक गोष्टींमध्ये माझ्या कौशल्यांच्या आधारे जो काही हातभार लावता येईल, खारीचा वाटा उचलता येईल तो मी उचलेनच. सोबतच अजून कोणालातरी मदतीसाठी उद्युक्त करेन, प्रेरणा देण्याचं काम करेन, अशीही जबाबदारी उचलेन. म्हणजेच, अडेल तिथे ज्याची गरज असेल त्या व्यक्तीला किमान एकदा तरी मदतीसाठी विचारेनच, असा स्वतःच स्वतःला नियम घालून घेईन.
लोकसहभागाशिवाय या गोष्टी शक्य नाहीत, हे जेवढं खरं, तेवढंच पहिलं पाऊल, एक पाऊल "मी" उचलणं आवश्यकच आहे आणि म्हणूनच 'आपल्याला' अभिप्रेत असणारी रचना अस्तित्वात येण्यासाठी, प्रथम छोटंसं पहिलं पाऊल म्हणून - योग्य त्या सकारात्मक गोष्टीसाठी 'मदत' करणार- असं जाहीररीत्या सांगण्यास, कोणताही किंतु मनात नाही आणि सोबतच आवाहन असे की,
'एकमेकां साह्य करून, अवघे धरू सुपंथ!'
