पुस्तक माझ्या नजरेतून
पुस्तक माझ्या नजरेतून
दुकाकी - डॉ. विजयावाड
हा एक कथासंग्रह असून, पहिलीच कथा - दुकाकी! कथेचं शीर्षक वाचल्यावर अर्थ कदाचित लक्षात येईलही अथवा नाही पण. अतिशय तरल कथा!
एकूण तीन पिढ्या या लघुकथेमध्ये गुंतलेल्या आहेत. मंडळी गुंतवणूक बरं का! थोडी गुंतागुंत आहे मात्र त्याने कथेची रंगत वाढते आणि कथा पुढेही सरकते, म्हणून ती गुंतागुंत उत्तमच किंवा कथेच्या अनुषंगाने पाहिल्यास आवश्यकच.
आप्पा (चिडका बिब्बा) - त्यांची मुलगी सुमा (स्पष्ट विचार असणारी परंतु धाडस-धैर्य नसणारी) - आणि तिची मुलगी रेशम (नवीन काळाची उत्तम प्रतिनिधी). सकस पात्र रंगवलं आहे ते रेशम आणि डॉक्टर काकू - या दोघींचं. डॉक्टर काकू कथा संपवण्याची गरज म्हणून आहेत, समजा ना की स्वादिष्ट जेवणातील मिठासारख्या. रेशम, हे पात्र फारच सुंदर रंगवलं आहे. पंधरा-सोळा वय वर्षं, मात्र नात्याची उत्तम जाण, प्रत्येक नात्यातील मर्म समजून घेऊन, योग्य निर्णय म्हणा किंवा मत-विचार स्पष्ट शब्दात आणि आत्मविश्वासाने मांडणारी. समस्या असेलच तर त्यावरचे पर्याय आणि त्या पर्यायांवर विचार करण्यासाठी वेळ देणारी रेशम!
सुमा - घर, संसार, दोन वयात येणारी मुले - त्यांची स्वप्नं आणि ती स्वप्न पुरी करण्यासाठी धडपडणारा नवरा - सारंग, त्याचे मूड, त्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने पार पाडाव्या लागणाऱ्या इतर जबाबदाऱ्या, या सगळ्यांनी पिचून जरी गेलेली नसेल तरी खंतावणारी सुमा, आईमाघारी एकट्या पडलेल्या चिडखोर वडिलांचे तंत्र पेलू न शकणारी. कधी उघड-उघड तर बरेचदा छुपे युद्ध खेळणारे सासरे-जावई यांच्यामध्ये परस्पर समतोल साधला जावा हे स्वप्न उराशी बाळगणारी सुमा, डॉक्टर काकूंच्या प्रथम आगमनातच आप्पा आणि त्यांच्यात प्रेम फुलले असेल का? या मनात आलेल्या प्रश्नाने चरकते कारण, आप्पा-डॉक्टर काकूंचे वय आणि दोघांच्याही सहचराचा मृत्यू आणि आप्पा-डॉक्टर काकू यांच्या याच नात्यावर परखडपणे आपल्या नोंदी निदर्शनास आणून देत आणि त्यावर कोणतीही हरकत न नोंदवता आपली आई, आजोबा आणि डॉक्टर काकू या सगळ्यांना हे नातं स्वतःचं स्वतःच स्वीकारण्यासाठी वेळ देणारी, मात्र तो वेळ देताना आपलं निरीक्षण स्पष्ट शब्दात नोंदवणारी रेशम!
तसं पाहिलं तर आई-मुलगी यांचं वेगळ्याच स्तरावर हळूहळू पोहोचणारं नातं, खुलणारं नातं. तसंच, आजोबांची चिडचिड नाजूकपणे हाताळणारी नात. डॉक्टर काकू, यांचंही पात्र अगदी तरल. आयुष्याच्या आणि वयाच्याही या टप्प्यावर नेमक्या कशाची गरज आहे आणि एकमेकांना पूरक असणाऱ्या गरजा कोणत्या निकषांवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा याची संपूर्ण जाण असणाऱ्या. आणि म्हणूनच रेशमसोबत वेगळं नातं रुजवणाऱ्या डॉक्टर काकू.
अप्रतिम कथानक. साधंसरळ, गुंतवणूक असलेलं - गुंतागुंत टाळलेलं - दुकाकी!
