STORYMIRROR

Deepali Aradhye

Others

3  

Deepali Aradhye

Others

सडेतोड

सडेतोड

3 mins
156

त्याचा फोन आता जवळपास सहाव्यांदा वाजत होता म्हणून त्याच्या रूममध्ये जाऊन तिने उचलला, मिनिटभर बोलत होती, तेवढ्यात तो बाथरूममधून बाहेर आला, तेव्हा त्याच्याकडे फोन देत ती म्हणाली,


- इथल्या आर्ट गॅलरीमधून कॉल आहे.

  

त्याने फोन हातात घेतला, बोलायला-ऐकायला सुरुवात केली आणि क्षणाक्षणाला त्याचा चेहरा उजळत गेला. फोन ठेऊन त्याने तिच्याकडे बघितलं तसं खुलासा करत ती म्हणाली,


- परवा इथे खाली जाहिरात दिसली, मी सगळी चौकशी करून तुझं नाव नोंदवलं. फक्त जागा नेमकी कोणती मिळेल याची धाकधूक होती, पण त्यांचा फोन आला म्हणजे मी ठरवलेलीच देत आहेत. तुझं पेंटिंग झालंय ना पूर्ण आता, त्याच्यासाठी म्हणून बोलून आले आहे.


- तू बघितलं आहेस ते पेंटिंग?


- नाही, पण मला खात्री आहे की प्रदर्शनात मांडण्याइतकं खास, सुंदर नक्कीच आहे.


- हा माझ्याबद्दलचा विश्वास आहे की तुझा फाजील आत्मविश्वास? पण असो, मला एक संधी उपलब्ध करून दिलीस त्याबद्दल - थँक्स अ लॉट.


 म्हणत त्याने पटापट आवराआवरी केली आणि आवश्यक त्या गोष्टी घेत पेंटिंग आठवणीने सोबत घेतलं आणि लगबगीने निघून गेला. तो गेला त्या दिशेने ती मात्र अचंबित होऊन अचल उभी राहिली.

------------------------------------------------------------------------------


  आजची सकाळ तिच्यासाठी वेगळीच उगवली होती. आदल्या संध्याकाळपासूनच खरंतर गोष्टी स्वप्नवत घडत होत्या. कोणत्यातरी चॅनेलवर चालू असलेला रोमँटिक मूवी एक वेगळी, तरल आठवणी निर्माण करणारी वेळ घेऊन आली होती.

 मुव्ही बघताना अगदी नकळत, हळुवार वातावरण निर्मिती झाली. मनाचा संवाद झाला की नाही, ते तिच्या लक्षात आलं नाही. मात्र, डोळ्यांचा डोळ्यांशी खूपच भावुक संवाद झाला आणि मुव्ही संपल्यानंतर झालेला एकूण संवाद आणि देहबोलीतून त्यांचा वेगळ्याच जगात प्रवेश झाला आणि त्यातील सुखाचे क्षण दोघांनी सोबतीने जगले-वेचले.

 आजची सकाळ काही वेगळी आणि खासच उगवली!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

डायरीचे शेवटचे पान वाचून त्याने पुन्हा ती बॅगेत ठेवून दिली. नकळत एक नापसंतीची आठी कपाळावर आणि स्पष्टपणाची एक लकेर त्याच्या मनात उठून गेली. मग मात्र त्याने संपूर्ण लक्ष प्रदर्शनात झोकून देऊन तिकडेच लावलं. इतर चित्रकारांच्या कलाकृतींचा रसपूर्ण आस्वाद घेण्यात तो मग्न झाला.

------------------------------------------------------------------------------


 'मला वाटलं होतं, त्याचं एवढं मोठं सुंदर स्वप्न साकारण्यात मी मदत केली आहे तर, पूर्ण आदरासहीत, माझे वेगळ्या पद्धतीने आभार मानत तो मला त्याच्यासोबत प्रदर्शनात घेऊन जाईल. आभार मानताना माझाही गौरवपूर्ण उल्लेख करेल.

 काल संध्याकाळपासून ते आता मगाशी तो जाईपर्यंत, मनाला गुदगुल्या होतील, भविष्य सुंदर-सुरक्षित असेल असं स्वप्नरंजन चालू होतं माझं. पण त्याच्या एकूण वागण्याचा काही आदमासच लावता येत नाहीये.

 आता मात्र कोणत्याही गंभीर प्रसंगाला सामोरं जावं लागू नये!' तिचा मनातल्या मनात चालणारा संवाद शेवटी नकारात्मक विचाराशी येऊन थांबला.

------------------------------------------------------------------------------


काल आपल्या दोघांमध्ये जो काही संवाद आणि त्यापुढची जी काही घटना घडली ती सहसंमतीने घडली, असं माझं मत आहे. तुझं काय म्हणणं आहे यावर?

 

 परतल्या-परतल्या ती समोर दिसताच त्याने प्रश्न केला. प्रश्न स्पष्ट असल्याने आणि आठवणीही ताज्या असल्याने तिनेही लगेच उत्तर दिलं....


- होय, माझंही तेच मत आहे.


- मग सुंदर-सुरक्षित भविष्य आणि स्वप्नरंजन, या सगळ्या गोष्टी इथे निरर्थक आहेत.


- अं... म्हणजे..... हो..... खरंतर.... होय निरर्थकच आहे.


- अडखळत उत्तर का येतंय तुझं? तू ठाम नाहीस का? आणि तू ठाम नसशील तर सांगतो, काल जे काही घडलं ते तू पुढाकार घेऊन साकारलं, असं म्हणतो मी आता. याला नकार आहे??


 त्याने तीव्रपणे विचारलं आणि ती दचकली.


- होय, मी पुढाकार घेतला.


- गुड, आपल्या विचार-विकार-कृतीबद्दल माणसाने सडेतोड असलंच पाहिजे. तर मग तुझ्या-माझ्यामध्ये कोणतंही भावनिक किंवा खरंतर कोणतंच नातं निर्माण होऊच शकत नाही, हा माहिती आहे ना तुला. सो, स्वप्नरंजन वगैरे नकोच!


 आपला सडेतोड निर्णय देत तो तिथून निघून गेला.


Rate this content
Log in