पित्याचे मोल
पित्याचे मोल
विजापूरच्या आदिलशहाच्या तावडीत शहाजीराजे सापडले होते, ते बाजी घोरपड्यांच्या दगाबाजीमुळे. शिवाजी महाराजांनी युक्ती लढवून शहाजीराजांना सोडवलं. पण त्या बदल्यात आदिलशाहानं कोंढाणा किल्ला परत करण्याची अट शहाजीराजांना घातली. शहाजीराजांनी तसं वचन दिलं. पण शिवरायांना इतका मोक्याचा गड गमावण्याची कल्पनाच सहन होईना. त्यांना वाईट तर वाटलंच पण वडिलांचा अतिशय रागही आला. त्यांच्या डोक्यातून हा विषय जाईना.
महाराजांचे ज्येष्ठ कारभारी, सोनोपंत डबीरांना महाराजांची अस्वस्थता कळली. त्यांनी महाराजांना चिंतेचं कारण विचारलं आणि त्या क्षणी राजांचा संताप धगधगत बाहेर आला, 'वडिलांनी विचार न करता कोंढाणा कबूल केला, हा वेडेपणा नाही काय? एरवी कुणाची छाती होती, आमच्याकडून कोंढाणा घेण्याची?'
सोनोपंत महाराजांकडे अचंब्यानं पाहत होते. पण महाराज बोलतच होते, 'यांना फितुरी समजली नाही. गाफिल राहून कैद झाले. ही जबाबदारीची वागणूक म्हणायची??
पंतांनी धारदार नजरेनं राजांकडे पाहिलं आणि ते म्हणाले, 'वडील बेसावध राहिले, हे खरंच. चूक कुणाच्या हातून होत नाही? पण म्हणून वडिलांची अशी निंदा तुम्ही करावी, हे योग्य नव्हे. आणि एक किल्ला वडिलांच्या जिवापेक्षा तुम्ही जास्त मानावा? राजे तुमच्यापुढे पराक्रम गाजवायला अजून पुष्कळ आयुष्य आहे.'
हे शब्द ऐकले आणि राजे चमकले. त्यांचा राग पार विझला. ते म्हणाले, 'पंत, चुकलं आमचं. तुम्ही योग्य बोललात. आमचे वडील थोर आहेत. वडिलांसाठी कोंढाणा दिला. मी तो पुन्हा घेईन.' महाराजांचा विवेक जागा झालेला पाहून पंतांनाही आनंद झाला.
