कालिदासाचे चातुर्य
कालिदासाचे चातुर्य
भोजराजाच्या दरबारात महाकवि कालिदासाला मोठा मान होता. त्यामुळे राजाकडून दक्षिणा मिळविण्यासाठी अनेक जण कालिदासाचा वशिला वापरायचे. एकदा एक गरीब माणूस कालिदासाकडे अशीच विनवणी करत आला. त्या माणसाकडे कुठलंच विशेष ज्ञान नव्हतं. पण कालिदासाला त्याची दया आली. तो म्हणाला, 'माझे गुरू म्हणून मी तुम्हाला दरबारात पाठवीन. तुमचं मौनव्रत असल्यामुळे तुम्ही फक्त आशीर्वाद द्याल, असं मी राजाला सांगतो.' कालिदासानं मग त्या माणसाला एक आशीर्वाद पाठ करायला सांगितला, 'शुभमस्तु दिने दिने राजा, दररोज तुझं कल्याण होवो.'
कालिदासाचे गुरू म्हणून राजाने पालखी पाठवली. पालखीत बसल्यावरही तो माणूस आशीर्वाद पाठ करत हाता. वाटेत एका पाठशाळेवरून जाताना विद्यार्थी 'त्रिपीडा परिहारार्थ...' हा श्लोक घोकत होते. ते शब्द ऐकल्यावर 'शुभमस्तु दिने दिने...' ऐवजी 'त्रिपीडास्तु दिने दिने...' असंच ही वल्ली पाठ करायला लागली. दरबारात गेल्यावर राजाला त्यानं तोच आशीर्वाद दिला. राजा भयंकर रागावला. त्यानं कालिदासाला विचारलं. तेव्हा कालिदास म्हणाला, 'महाराज, माझ्या गुरूंनी फार चांगला आशीर्वाद दिला आहे. ' राजा प्रश्नार्थक मुद्रेनं कालिदासाकडे पहायला लागला. कालिदास म्हणाला, 'महाराज, ज्या तीन पीडांचा उल्लेख गुरूंनी केला, त्या म्हणजे सकाळी दान मागायला येणारे गुणीजन, तुमच्या पानात जेवायला बसून तुम्हाला त्रास देणारा तुमचा मुलगा आणि रात्री शयनगृहात तुम्हाला सुखद पीडा देणाऱ्या राणी सरकार. या तीन पीडा म्हणजे खरं तर परमोच्च सुखंच. ती तुम्हाला नकोत का? माझ्या गुरूंनी अगदी योग्य आशीर्वादच दिला आहे.'
यावर राजा काय बोलणार? त्यानं कालिदासाच्या गुरूंना भरपूर दक्षिणा देऊन निरोप दिला.
