कुतुहल
कुतुहल
ही गोष्ट आहे, फ्रेड हॉईल या शास्त्रज्ञाची. फ्रेड त्यावेळी शाळेत शिकत होता. एकदा जीवशास्त्राचा तास चालू होता. एक धडा शिकवून झाला तेव्हा फ्रेडच्या शिक्षिकेनं शाळेच्या आवारातल्या एका फुलझाडाची माहिती मुलांना सांगितली. झाडाची साधारण उंची, पानांचा प्रकार आणि फुलांचा रंग आणि पाकळ्या कशा असतात, हे समजावल्यानंतर शिक्षिकेन मुलांना ते झाड पाहून यायला सांगितलं.
गडद लाल रंगाच्या पाच पाकळ्या असलेल्या फुलानी ते झाड बहरलं होतं. ते पाहताना मुलं मोहरून गेली होती. मग सगळी वर्गात परतली, फ्रेंड मात्र सगळ्यात शेवटी, जरासा उशिरानेच परतला. त्याच्या हातात त्या झाडाचं एक फूल होतं. पण त्या फुलाच्या चार पाकळ्या लाल आणि एक पाकळी फिकट गुलाबी होती. बाकी सगळ्या एकसारख्या फुलांच्या गर्दीत फ्रेडनं हे थोडं वेगळं फूल अचूक टिपलं होतं.
ते फूल शिक्षिकेला दाखवून फ्रेडनं विचारलं, 'तुम्ही सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे या झाडाची सगळी फुलं आहेत. पण या एकाच फुलात हे वेगळेपण कशामुळे आलं असेल?" फ्रेडच्या शिक्षिकेनं त्याच्या शंकेचं निरसन तर केलंच पण निरीक्षण आंधळेपणानं न करता कुतुहल जागं ठेवल्याबद्दल फ्रेडचं कौतुकही केलं.
फ्रेड पुढे मोठा शास्त्रज्ञ झाला. त्याच्या यशामागे त्याची बुद्धिमत्ता, चिकाटी, प्रयत्न जसे होते, तशी ही कुतुहलबुद्धीही होती. कुतुहल माणसाला नेहमी नव्या वाटा दाखवतं.
