दिशा
दिशा
ही गोष्ट आहे ॲनमेरी मोझेस या आजीबाईची. आजींचं हे नाव मी सांगितलं खरं, पण ती अशा अनेक आज्यांची गोष्ट आहे.
• मोझेस आजींचं लग्न खूप लवकर झालं. त्यांना पाच मुलं झाली. त्यांना वाढविण्यासाठी आजींनी अपार कष्ट केले. दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून त्यांनी कुटुंब पोसल. पण हे कष्ट उपसताना त्यांनी विरंगुळा म्हणून आपला कशिदाकामाचा छंदही जपला. तेवढाच वेळ त्यांचा स्वतःचा असायचा.
वय झालं, मुलं-सुना घर सांभाळायला लागली, तरी मोझेस आजी कशिदाकाम करायच्या. पण ७८ व्या वर्षी मात्र त्यांना सुई ओवता येईना. कशिदा करताना बोटं बधीर व्हायला लागली. पण यावर आजींनी दुसरा मार्ग शोधला. घराबाहेरच्या ओट्यावर बसूनच त्या चित्रं रंगवायला लागल्या. खेड्यातलं जीवन कागदावर उमटायला त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला त्या चित्रं ओळखीच्यांना देऊन टाकत. काही वेळा कुणी धान्य वगैरे देऊन चित्रं घ्यायचं.
गंमत म्हणजे आजींच्या ८९ व्या वर्षी त्यांची कलाक्षेत्रानं दखल घेतली. आजींना मोठं नाव मिळालं. The Night Before Christmas या पुस्तकासाठी त्यांनी चित्रं काढली, तेव्हा त्यांनी वयाची शंभरी गाठली होती
खूप कष्टाचं आयुष्य जगतानाही मोझेस आजींनी साधा छंद जोपासत स्वतः ची उभारी कायम ठेवली आणि वयाची बंधनं सारत ७८ व्या वर्षीही नवं कार्यक्षेत्र शोधलं. आपल्या आयुष्याला झळाळी देणं आपल्याच हातात असतं.
