डफाचे बोल
डफाचे बोल
गावातल्या इनामदारांच्या वाड्यावर आज मोठा उत्सव होता. इनामदारांना मुलगी झाली होती. शाहिराला बोलावून इनामदार गाणी ऐकत होते. पाहुणेमंडळी जमली हाती.
तेवढ्यात इनामदारांचा एक नोकर काही कामासाठी बाहेरच्या अंगणात गेला. त्याला समोर कसलीशी हालचाल दिसली. पाहिलं तर तिथे एक हरिणी उभी होती. नोकर लगेच आत घावला. इनामदारांना तो हळूच म्हणाला, 'मालक बाहेर चला आयती शिकार आली आहे.
इनामदारांनी बाहेर येऊन पाहिलं. हरिणी तिथेच उभी होती. कान टवकारून ती डफाचा आवाज ऐकत आहे, असं इनामदारांना वाटलं. नोकरानं बंदूक पुढे केली. पण इनामदार म्हणाले, 'नको. ही शिकार म्हणजे हत्याच होईल; त्यातून आज माझ्या मुलीचा जन्मदिवस. आज ही माझी पाहुणी आहे.'
बोलता बोलता इनामदार हरिणीकडे पहात होते. त्यांना तिच्या टपोऱ्या डोळ्यांत वेदना दिसल्या. आणि एकदम इनामदारांना गेल्या महिन्यात केलेल्या काळवीटाच्या शिकारीची आठवण झाली.
जोडीपैकी नराला त्यांनी नेमकं टिपलं होतं. आणि त्याच्याच कातड्यापासून बनवलेला डफ त्यानं शाहिराला आज वाजवायला दिला होता. डफाचा हा आवाज ऐकून हरिणी तिथे आली होती. तिच्या नराचं कातडं जणू तिच्याशी बोलत होतं. डफ थांबला, तेव्हा ती शांतपणे वळली आणि निघून गेली.
इनामदारांचं काळीज या प्रसंगानं हललं. त्यांनी शिकारीचा छंद सोडून दिला. मुक्या प्राण्यांनाही भावना असतात, माणसांसारखी तीही संवेदनशील असतात, हे इनामदारांना त्या दिवशी कळलं.
