मातीची महती
मातीची महती
एकदा एक स्वामीजी आपल्या शिष्यांबरोबर कुठल्याशा गावी निघ होते. रस्त्याने जाताना तहान लागली, म्हणून लगतच्या मळ्यातल्या विहिरीकडे ते गेले. शिष्यानं विहिरीतलं पाणी काढून गुरूला दिलं. मग तो स्वतःही पाण प्याला आणि ते निघाले.
विहिरीजवळच एक लहानशी झोपडी होती. मळ्यातला कामकरी झोपडीच्या कुडाला चिखल लावत होता. चिखलाचा एक फतका फेकताना चुकून त्याचे शिंतोडे स्वामीजींच्या अंगावर उडाले. त्यांचं भगवं वस्त्र चिखलाने भरलं, शेतकरी आपल्या कामात इतका मग्न होता की त्याच्या लक्षातही ही गोष्ट आली नाही. स्वामीजींच्या शिष्याला मात्र फार राग आला. तो गुरूंच्या कफनीवरचा चिखल साफ करण्यासाठी पुढे गेला, पण स्वामीजींनी त्याला थांबवलं.
पुढची वाट चालू लागल्यावर शिष्य म्हणाला, 'गुरुजी, त्या शेतकऱ्यानं तुमच्या अंगावर चिखल उडवला आणि त्याला त्याचं काही वाटलही नाही!" स्वामीजी हसले. म्हणाले, 'अरे, तो त्याच्या कामात किती तल्लीन झाला होता, त्याची ही खूण आहे आणि त्याचं अंगही चिखलानं माखलं होतंच की. हा खरा भूमिपुत्र. मातीशी बोलत होता तो. माझ्या अंगावरचा हा चिखल म्हणजे माझ्यासाठी धरणीचा प्रसाद आहे. बघ, या ओल्या मातीचा वास कसा सुंदर आहे! ज्याला मातीचा सुगंध आवडला नसेल, तो माणूसच नव्हे. अरे, चिखल म्हणजे घाण नाही. चिखल म्हणजे माती आणि पाणी. माती आणि पाणी एकत्र आल्याखेरीज सृष्टीची निर्मितीच अशक्य आहे. ही झाडंझुडपं, या वेली अन् पिकं मातीतच उगवतात. बेटा, मातीची महती समजून घे. मनाचे डोळे उघडे ठेवून भोवतालच्या सृष्टीकडे बघ. त्या खेरीज तुझ्या इतर कुठल्याही ज्ञानाला पूर्णत्व येणार नाही.'
