खरे प्रेम
खरे प्रेम
राधेची कृष्णावर अतिशय गाढ भक्ती होती. कृष्ण गोकुळ सोडून द्वारकेला गेला तरी तिच्या हृदयातलं कृष्णाचं स्थान तसंच राहिलं. कृष्णही राधेला विसरला नाही. रुक्मिणीशी - आपल्या पत्नीशी बोलतानाही तो राधेच्या पुष्कळ आठवणी सांगायचा. त्यामुळे राधेला बघण्यासाठी तिला भेटण्यासाठी रुक्मिणी उत्सुक होती.
एकदा तिनं राधेला मुद्दाम भेटीचं निमंत्रण दिलं, कृष्णावरचं तिच निर्व्याज्य प्रेम पाहून रुक्मिणी खरोखरंच प्रभावित झाली. तिनं राधेचं चांगलं आदरातिथ्य केलं. जेऊ-खाऊ घातलं. पुष्कळ भेटी दिल्या आणि निघताना तिला रुक्मिणीने स्वतः पेलाभर दूध दिलं. पाहुणचार घेऊन राधा आपल्या घरी परतली.
त्या रात्री झोपताना रुक्मिणीचं लक्ष कृष्णाच्या पायांकडे गेलं. त्याच्या तळपायांना खूप फोड आले होते. रुक्मिणीला आश्चर्य वाटलं. तेवढ्यात झोपलेल्या कृष्णानं डोळे उघडले. रुक्मिणीने न राहवून त्याला विचारलं, 'तुमच्या पायावर अचानक हे फोड कसे आले?' तेव्हा कृष्ण म्हणाला, "राधेनं तिच्या हृदयात मला स्थान दिलं आहे. तू तिला गरम दूध दिलंस आणि ते तू दिल्यामुळे तिनं गरम असूनही काही न म्हणता पिऊन टाकलं. तिच्या हृदयातच मी असल्यामुळे त्या गरम दुधानं माझे पाय भाजले आणि हे फोड़ आले.' हे ऐकलं आणि राधेचं कृष्णावरचं प्रेम रुक्मिणीला समजलं. ज्या माणसांवर आपलं मनापासून प्रेम असतं, त्यांची दुःखं, त्रास आणि आनंद आपल्याला लांब असलो तरी नक्की जाणवतो.
