प्रयत्नांचे फळ
प्रयत्नांचे फळ
सागरला अभ्यासाची फार आवड नव्हती. बुद्धीनंही तो फार तल्लख नव्हता. नेहमीच कमी मार्क्स पडायचे त्याला. त्यामुळे तर त्याचा अभ्यासातला उत्साह आणखीच मावळायचा. पण मुळात सरळ आणि प्रामाणिक असल्यामुळे परीक्षा आली की मात्र त्याच्या परीनं अभ्यास करायचा. जेमतेम पास होऊन पुढच्या वर्गात जायचा.
आता सागर दहावीत होता. पुढे काय करायचं, याचा एक ताण त्याच्या मनावर होताच. आजपर्यंतची स्थिती बघता, चांगले मार्क्स पडण्याची शक्यता नव्हतीच. त्यातून एका ज्योतिषानं त्याचं भविष्य सांगितलं, 'या वर्षी तुझे ग्रह फारच वाईट आहेत. तू पास होण्याची शक्यता फार कमी आहे. '
ही भविष्यवाणी ऐकून सागर मुळीच निराश झाला नाही. गणित आणि विज्ञान हे विषय त्याचे कच्चे होते. त्यानं त्या दोन्ही विषयांचा कसून अभ्यास केला. दिवसभरात बारा-चौदा तास तो अभ्यासाला बसायचा. हुशार मित्रांना वेळवर अडचणी विचारायचा. पुनःपुन्हा धडे वाचणं, निबंधांचा सराव करणं, एकसारखी गणितं सोडवणं, प्रश्नपत्रिकांची उत्तरं लिहून काढणं हे सगळं त्यानं मनापासून केलं. याचा अर्थातच चांगला परिणाम झाला. सागर चांगल्या श्रेणीनं पास झाला. ज्योतिषाचे शब्द त्यानं खोटे ठरवले. प्रयत्न केले तर यश मिळतंच, हे त्यानं सिद्ध करून दाखवलं.
