अपूर्ण ज्ञान
अपूर्ण ज्ञान
एका प्राचीन पंथातली पर्यावरणाचं महत्त्व सांगणारी ही लहानशी कथा आहे. भृगु हे फार मोठे ऋषी होते. अतिशय ज्ञानी होते. त्यांच्या किशोरवयातली ही गोष्ट आहे. भृगु हा वरुणाचा मुलगा अतिशय विलक्षण बुद्धिमत्ता असलेल्या भृगुला आपल्या विद्येचा अतिशय गर्व झाला होता. हे जाणवलं तेव्हा वरुण एक दिवस त्याला म्हणाला, 'तू विद्यासंपन्न झाला आहेस, तर आता थोडं जग पाहून ये. सगळ्या दिशांना जा आणि जे दिसेल ते मला येऊन सांग."
मग भृगु आधी पूर्वेकडे गेला. तिथे त्याला एक विलक्षण दृश्य दिसलं. काही माणसं इतरांना मारून त्यांचे तुकडे करत होती आणि 'हे मला, हे तुला' असं म्हणत आपापसांत त्यांची वाटणी करत होती. भृगुला ते पाहवेना. तो त्या माणसांना म्हणाला, 'हे तुम्ही काय करता आहात? कशासाठी हे क्रौर्य तेव्हा ते लोक म्हणाले, 'यांनी मागच्या जन्मी आम्हाला असंच वागवलं होतं. त्याचा बदला आम्ही घेतोय.' नंतर भृगु इतरही दिशांना गेला पण त्याला अशाच प्रकारची भयानक दृश्यं दिसली. भृगु निराश होऊन घरी परतला आणि वडिलांना म्हणाला, 'मी वेदांचा अभ्यास केला. इतकी शास्त्रं शिकलो. पण मला या घटनांचा अर्थ समजला नाही.' तेव्हा वरुण त्याला त्या दृश्याचं स्पष्टीकरण देत म्हणाला, 'तू प्रथम जे लोक पाहिलेस ती झाडं होती. जे लोक अकारण झाडं तोडतात, त्यांना झाडंही त्याच पद्धतीनं मारतात. नंतर तू पाहिलेस ते प्राणी होते. प्राण्यांची शिकार करणं, त्यांच्यावर असह्य ओझी लादणं योग्य नाही. त्याची शिक्षा कधीतरी मिळतेच. निसर्गाचा प्रत्येक घटक माणसाइतकाच महत्त्वाचा आहे. ज्यांच्यामुळे निसर्ग सुंदर होतो, त्या गोष्टींवर आघात करणं ही मोठी चूक आहे. आणि निसर्गाला समजून घेतल्याखेरीज इतर सर्व ज्ञानही व्यर्थ आहे.'
हे ऐकल्यावर भृगुला आपल्या ज्ञानाच्या अपूर्णतेची जाणीव झाली. त्याचा अहंकार क्षणात नाहीसा झाला.
