न्याय
न्याय
हॅरीला स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला होता. पण तिथे दाखल होण्यापूर्वीच त्याचे वडील अचानक वारले. जवळच्या वडिलोपार्जित शेतीवाडीकडे लक्ष देणं त्याला भाग पडलं. उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी किंवा व्यवसाय करण्याची त्याची स्वप्नं विरून गेली.
न्यू मेक्सिकोच्या सीमेवरचं त्याचं घर म्हणजे एखाद्या बेटासारखं होतं. वीज नाही, शहरातल्या इतर सुविधा नाहीत, चार-दोन घरं सोडली तर बाकी वस्तीही खूप दूर. पण हॅरीनं नाईलाजानं त्या आयुष्याची सवय करून घेतली. आयुष्य पुढे जात राहिलं. हॅरीचं लग्न झालं. त्याला मुलगीही झाली. सँड्राला शाळेत पाठवायचं तर जवळपास शाळा नव्हती. हॅरीच्या बायकोनं - इडानंच - तिला घरी शिकवायला सुरुवात केली.
आपल्याला जे उच्चशिक्षण घेता आलं नाही, ते मुलीला द्यायचंच, असा निर्धार त्या पती-पत्नींचा होता. त्यामुळे परवडण्याजोग्या शाळेच्या होस्टेलवर त्यांनी सँड्राला ठेवलं.
सँड्रानं शाळा आणि कॉलेजचं शिक्षण तर पूर्ण केलंच पण १९५२ साली ती स्टॅनफोर्ड विद्यापीठातून वकिलीची परीक्षा पहिल्या श्रेणीत पास झाली. हॅरीला विलक्षण आनंद झाला. सँड्रानं कॅलिफोर्नियामध्ये सान मँटियो इथे वकिली करायला सुरुवात केली. लग्न झाल्यावर ती नवऱ्याबरोबर ॲरिझोनाला गेली. तिथे तिनं चांगलं नाव कमावलं.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बाहेर पडल्यावर २९ वर्षांनी अमेरिकेच्या सुप्रिम कोर्टाची पहिली न्यायाधीश झालेली स्त्री हा मान सँड्राला मिळाला. हॅरीला उशिरा पण योग्य न्याय मिळाला.
