Apurva Jadhav

Children

3  

Apurva Jadhav

Children

पाऊस

पाऊस

3 mins
397


      पाऊस हा आपल्या बालपणातील एक गोड आठवण आहे.लहानपणी प्रत्येकालाच पावसात भिजायला खूप आवडतं.मग नंतर आजारी पडलो तरी काही हरकत नाही.बालवाडीत असताना तर पावसावर खूप छान-छान कविताही असायच्या.त्यामुळे पाऊस हा लहान मुलांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे.पावसाळ्यात बालवाडीतील मुलं जेव्हा अंगावर रेनकोट आणि खांद्यावर दप्तर घेतात तेव्हा ते खूपच गोंडस दिसतात.त्यांना पाहतचं रहावसं वाटत.आमची रिंकुसुध्दा अशीच आहे.तिलाही पाऊस खूप आवडतो.रिंकु म्हणजे माझ्या काकांची मुलगी.असायला ४ वर्षाचीच आहे.पण १४ वर्षाच्या मुलीएवढा हट्टीपणा करती ती.काही दिवसांपूर्वी तर,तिने सगळ्यांच्या जीवाला घोर लावला होता.आम्हा सगळ्यांना तिने दिवसभर पळवले होते.


      त्याचे झाले असे की,रिंकु तिच्या शाळेत होती आणि नेमकी शाळा सुटणार इतक्यात पाऊस सुरू झाला.पाऊस पडायला लागला की रिंकुला भिजायच असत.त्यादिवशीही तिला भिजायच होत.पण शाळेतल्या बाईंनी तिला बाहेर सोडले नाही.बाईंनी बाहेर जाऊ दिले नाही म्हणून ती तोंड फुगवून बसली.शाळा सुटायला अजून अर्धा तास होता,त्यामुळे ती शाळा सुटण्याची वाट बघू लागली.काही वेळानंतर शाळेची घंटा वाजली.शाळा सुटली म्हणून रिंकु खुश झाली आणि तिच्या आईच्या येण्याची वाट बघु लागली.घरी पाहुणे आले होते त्यामुळे काकुला शाळेत जायला थोडा उशीर झाला.तिकडे रिंकु,काकुची वाट बघत होती.तेवढ्यात तिथे तिच्या मैत्रिणीची आई आली आणि बाईंबरोबर बोलु लागली.याच संधीचा फायदा घेऊन रिंकु शाळेतून पळाली.आमच्या गावातली ती छोटी बालवाडी असल्यामुळे गेटवर वॉचमन नव्हते.काही वेळानंतर रिंकु वर्गात नाहीये हे बाईंच्या लक्षात आले.त्यांनी दुसऱ्या मुलींना रिंकुबद्दल विचारले.तेव्हा काही मुलींने,"ती एकटीच घरी गेली" असे सांगितले.रिंकु शाळेतून एकटीच गेली,हे ऐकल्यानंतर बाई घाबरल्या.त्यांनी लगेचच आमच्या घरी फोन केला.रिंकु शाळेत नाहीये हे ऐकून काका-काकू सुध्दा घाबरले.आम्ही सगळेजण तिला गावात शोधायला निघालो.पण ती काही सापडत नव्हती.आम्ही एका छोट्या मुलाला त्याने तिला कुठे पाहिले का म्हणून विचारले.तेव्हा तो आम्हाला म्हणाला,"हा,तुमची रिंकू ना.मगाशी ती इथेच होती.चालता-चालता ती चिखलात पडली.मी तिला उठवले आणि घरी जायला सांगितले तर ती माझ्यावर चिडली आणि मला धक्का देऊन,गाणं गुणगुणत शेताकडे निघून गेली.आम्ही तिला शेताकडे शोधले पण ती सापडली नाही.रिंकू सापडत नाहीये म्हणून काकू खूप रडू लागली.रिंकू सापडत नाहीये ही गोष्ट सगळ्या गावात पसरली.सगळेजण रिंकूला शोधू लागले.तेवढ्यात एक मुलगा आमच्याकडे आला आणि म्हणाला,"तुमची रिंकू सापडली".आम्ही धावतच त्या मुलाच्या मागे गेलो आणि आम्ही बघतोय तर काय.रिंकू मळलेल्या गणवेशात आणि भिजलेल्या अवतारात गाणं गुणगुणत नाचत होती. तेवढ्यात काकू तिथे गेली आणि तिच्या पाठीत एक दणका दिला.मार खाल्ल्यावर सुद्धा ती तेच गाणं गुणगुणत होती.ते गाणं तर मला अजूनही आठवतं.


"बालिश आई छम छम छम लेते छाता नितले हम 

फिसल पले पानी मे छापा उपल नीचे हम"


ती शाळेतून बाईंना न सांगता निघून गेली म्हणून काकूने तिला खूप ओरडले आणि समजावूनही सांगितले.तिच्याकडे तिचा रेनकोट दिसत नव्हता म्हणून मी तिला विचारले की तिचा रेनकोट कुठे आहे.तेव्हा ती मला म्हणाली,"चल तुला दाखवते".ती आम्हाला तिच्या शाळेच्या मागे घेऊन गेली. तिथे तिने तिच्या रेनकोटच्या खाली तीन छोट्या- छोट्या कुत्र्याच्या पिल्लांना ठेवले होते.तेव्हा मी तिला विचारले की तिने तिच्या रेनकोटच्या खाली कुत्र्याच्या पिल्लांना का ठेवले आहे.तेव्हा ती आम्हाला म्हणाली,""पाऊस पडत होता ना मग ते भिजले असते आणि मग त्यांना सर्दी झाली असती म्हणून मी त्यांना माझ्या रेनकोटच्या खाली ठेवले.आता त्यांना सर्दी नाही होणार".ते ऐकून सगळेजण हसू लागले आणि तिचं कौतुक करू लागले.काका तिला म्हणाले,"तू पण भिजली होतीस ना मग तुला नाही का होणार सर्दी?त्यावर रिंकू म्हणाली,"नाही मला सर्दी नाही होणार मी स्ट्रॉंग आहे".हे ऐकून सगळेजण अणखी हसू लागले.तर ही अशी आहे आमची रिंकु,हट्टी आणि प्रेमळ.


Rate this content
Log in

Similar marathi story from Children