प्रेम
प्रेम
नोकरी आणि घरकामांमधुन आज सरिताने सुट्टी घेतली.तिने ठरवले की आज स्वतःसाठी वेळ काढावा.स्वतःला आनंद होईल असं काहीतरी करावं.त्यामुळे तिने आज छान साडी नेसली,नाजुक दागिने घातले.केसांमधे गजरा माळून,डोळे काजळाने सजवले.साजश्रृंगार करुन ती आरश्यासमोर बसली.आज खुप दिवसांनी तिने स्वतःला असे निवांत आरश्यात पाहिले.खूप दिवसांनंतर तिने पुन्हा तिचे सौंदर्य तिच्या डोळ्यात भरून घेतले.स्वतःच्या ती पुन्हा एकदा प्रेमात पडली.इतरांवर प्रेम करायला आपल्याकडे खूप वेळ असतो,पण त्यांच्यावर प्रेम करता करता आपण स्वतःवर प्रेम करण्यासाठी वेळ काढणे विसरतो.आज इतक्या दिवसांनंतर जेव्हा सरिताने स्वतःसाठी वेळ काढला तेव्हा तिला स्वप्रेमाची जाणीव झाली.आपण इतरांना नेहमी म्हणतो,"तु खुप सुंदर आहेस.आज तू खूप छान दिसत आहेस".पण कधी स्वतःला म्हणतो?नाही.पण आपल्याला ते म्हणायला हवे.या जगात आपण एकटे आलो आणि एकटेच जाणार.मग इतरांच कौतुक करता करता स्वतःच्या अस्तित्वाचं कौतुक करायला नको?
सरिताने ठरवले होते,की ज्या गोष्टींमुळे तिला आनंद होईल त्या सगळ्या गोष्टी ती आज करणार.सरिता संग
ीत विशारद होती.तिला संगीताची खूप आवड होती.पण नौकरीमुळे छंद मागे सुटला.पेटीत बंद करून ठेवलेला सितार आज तिने बाहेर काढला.त्यावर लागलेली धूळ पुसली.कौतुकाने ती त्या सिताराकडे बघू लागली.त्या सितारा कडे बघून तिला तिचे जुने दिवस आठवले.कॉलेजच्या प्रत्येक संगीत स्पर्धेत भाग घेणे,त्यात जिंकलेल्या ट्राॅफ्या.ते सर्व अगदी क्षणभरात तिच्या डोळ्यांसमोर आले.नौकरी करण्याच्या आधी संगीतचं तिच्यासाठी तिचे सर्व काही होते.पण घरात कलेचा वारसा नसल्यामुळे तिला फारसे कोणाचे सहकार्य लाभले नाही.त्यामुळे ती पुढे गेली आणि छंद मागे सुटला.आज खूप वर्षांनंतर पुन्हा एकदा सितार हातात घेतल्यावर सरिता खूप भावूक झाली.तिने सितार वाजवले आणि ती संगीत साधनेत रमली.संगीताच्या सात सुरांपासून तिने सात ओळ्या तयार केल्या.
सा:साधनेत रमली आज सरिता
रे:रेशीमगाठ होती तिची संगीताशी
ग:गप्प गप्प होते सारे सूर,आज लागले बोलू
म:मनातली ती सारी गुपितं,आज लागली खोलू
प:परिचय झाला आज पुन्हा स्वत:शीच माझा
ध:धारा त्या संगीताच्या झाल्या बेभान
नी:केला निश्चय आज मी प्रेमाचा
संगीताच्या दुनियेत हरवून आज सरिताने स्वप्रेमाचा संसार थाटला.