Apurva Jadhav

Others

3  

Apurva Jadhav

Others

उद्या

उद्या

4 mins
374


      उद्या ही प्रत्येकासाठी एक नवी आशा असते,पण अनन्यासाठी उद्या म्हणजे एक प्रकारचे आव्हान होते.अनन्या ही मुंबईमधील एका प्रसिद्ध उद्योजकाची मुलगी होती.नुकतीच ती बी.बी.ए पास झाली होती.घरात व्यवसायाचा वारसा असल्यामुळे तिचीही रूची व्यवसायातचं होती.पुढे जाऊन तिला तिच्या बाबांची कंपनी चालवायची होती.त्यामुळे ती तिच्या बाबांबरोबर ऑफिसमधे काम करायची.आता व्यवसाय म्हणले की शत्रू हे आलेच आणि ते शत्रू जर आपले नातेवाईक असतील तर मग काही विचारायलाच नको.बाहेरील शत्रू पेक्षा घरातील शत्रू हे दुप्पट घातक असतात.या गोष्टीची जाणीव अनन्याच्या कुटुंबाला ३० वर्षापूर्वीचं झाली होती.


      एका छोट्याश्या दुकानापासून एक मोठी कंपनी उभी करण्याच्या प्रवासात अनन्याच्या बाबांचा आणि तिच्या आजोबांचा समान योगदान होता.अनन्याला एक सावत्र काका होते म्हणजेच तिच्या बाबांचे सावत्र भाऊ.ज्यावेळी अनन्याचे बाबा आणि आजोबा व्यवसायात यश मिळविण्यासाठी दिवस-रात्र झटत होते,त्यावेळी तिचे सावत्र काका मात्र या सगळ्यांपासून दुर राहुन मजा करत होते.व्यवसायात त्यांचा काहीच योगदान नव्हता.पुढे काही वर्षांनंतर अनन्याच्या आजोबांचा मृत्यू झाला.आजोबांच्या मृत्यूनंतर तिच्या बाबांमध्ये आणि काकांमध्ये मालमत्तेवरुन वाद होऊ लागले.काकांना कंपनी सोडली तर इतर कोणत्याही गोष्टीत रस नव्हता.त्यांना फक्त अनन्याच्या आजोबांची कंपनी हवी होती.ती साध्य करण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार होते.अनन्याचे सावत्र काका अत्यंत स्वार्थी आणि कपटी होते.ते नाती जाणत नव्हते.एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी त्यांना नात्यांचा खून करावा लागत असेल तरीही ते मागे हटणारे नव्हते.अनन्याच्या बाबांनी त्यांच्या सावत्र भावाला कंपनी देण्यास विरोध केला.कारण त्यांना हे चांगलेच माहित होते की काकांच्या हातात कंपनी आल्यावर काहीच प्रगती न होता कंपनी बंद पडेल.त्यांना काकांचा स्वार्थ आणि त्यांची लालसा दिसत होती.ज्यावेळी कंपनीला त्यांची खरंच गरज होती त्यावेळी ते पुढे आले नाही आणि आत्ता जेव्हा कंपनी यशाच्या शिखरावर आहे त्यावेळी ते कंपनीवर हक्क दाखवु लागले आहेत हे पाहून अनन्याचे बाबा प्रचंड चिडले.काहीकरता ते काकांना कंपनी देण्यास तयार नव्हते.अनन्याच्या आजोबांनी त्यांची वारसदार म्हणून अनन्याच्या नावावर कंपनी केली होती.काकांनी अनन्याशी बोलून अर्धी कंपनी त्यांच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला पण अनन्याही तिच्या बाबांच्या मतावर ठाम होती.त्यामुळे तिने काकांना स्पष्टपणे नकार दिला.त्या गोष्टचा काकांना प्रचंड राग आला.


      काकांना लक्षात आले की सरळ मार्गाने त्यांना कंपनी मिळणार नाही त्यामुळे त्यांनी अनन्याचे अपहरण केले.ती गोष्ट जेव्हा अनन्याच्या बाबांना कळाली त्यावेळी त्यांचा पारा चढला.पण अनन्या काकांच्या ताब्यात असल्यामुळे तिच्या बाबांचे हात दगडाखाली होते.ते काहीही करू शकत नव्हते.काकांनी अनन्याच्या बाबांना फोन केला आणि कंपनी नावावर न केल्यास अनन्याचा जीव घेण्याची धमकी दिली.त्यामुळे बाबांनी काकांना अनन्याशी बोलण्यासाठी विनंती केली.काकांनी अनन्याला फोन दिला आणि बाबा अनन्याची विचारपूस करू लागले.त्यांनी अनन्याला कंपनी काकांच्या नावावर करायला सांगितले.अनन्याच्या बाबांना माहित होते की भविष्यात त्या अश्या लाख कंपन्या उभ्या करतील.पण जर मुलीला गमावले तर तिला परत नाही आणू शकणार,त्यामुळे त्यांनी माघार घेतली.पण अनन्याने काकांच्या नावावर कंपनी करण्यास नकार दिला.अनन्याच्या बाबांनी तिला पुन्हा एकदा समजावण्याचा प्रयत्न केला पण ती तिच्या मतावर ठाम होती.त्यामुळे अनन्याच्या बाबांना ही कळेना की काय करावे.पुन्हा एकदा नकार ऐकून काकांना प्रचंड राग आला.त्यांनी अनन्याला एका दिवसाची मुदत दिली आणि तिला सांगितले की उद्या जर तिने लीगल पेपर्सवर सही केली नाही तर उद्याचा दिवस तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल.एका दिवसात अनन्याला खूप मोठा निर्णय घ्यायचा होता.एकीकडे स्वतःचा जीव होता आणि दुसरीकडे तिच्या बाबांनी आणि आजोबांनी कष्टाने उभी केलेली कंपनी होती.अनन्याला ना तर तिचा जीव जाऊ द्यायचा होता आणि नाही कंपनी.


      अनन्याने पळण्याचा प्रयत्न करू नये म्हणून तिच्या काकांनी तिला बांधुन ठेवले होते.तरीही त्यांना वाटत होते की ती पळुन जाण्याचा प्रयत्न करेल.कारण त्यांना माहित होते की ती खुप हुशार मुलगी आहे.त्यामुळे त्यांनी बेशुद्धीचे औषध मिसळलेली काॅफी अनन्याला प्यायला दिली.कॉफीचा वास घेताच तिला कळाले की कॉफीत काहीतरी मिसळले आहे.त्यामुळे तिने काकांना पाणी मागितले.काका त्यांच्या कॉफीचा कप खाली ठेवून पाणी आणण्यासाठी गेले.तेवढ्यात तिने तिचा कॉफीचा कप काकांच्या कपापासून बदलला.अनन्याच्या कपामधील कॉफी पिताच काकांच्या लक्षात आले की तिने कप बदलला आहे.कारण त्यांना ही कॉफीतून औषधाचा वास आला.पण ते काही करणार इतक्यात ते बेशुद्ध पडले.या संधीचा फायदा घेऊन अनन्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.पण त्यावेळी रात्रीचे तीन वाजले होते आणि ती ज्या ठिकाणी होती तिथल्या मेन गेट वर दोन पहारेकरी उभे होते.त्यामुळे त्यावेळी तिच्यासाठी तिथुन पळुन जाणे सोपे नव्हते.ती विचार करत होती की,आता काय करावे.तेवढ्यात तिला तिच्या काकांच्या खिश्यात एक मोबाईल दिसला.तिने तो मोबाईल खिश्यातून बाहेर काढला.पण तो बंद होता.ती तो मोबाईल चालू करण्याचा प्रयत्न करत होती.शेवटी एका तासानंतर तो मोबाईल चालू झाला आणि तिने तिच्या बाबांना फोन केला.तिच्या बाबांनी लगेच पोलिसांना कळवले.मोबाईल ट्रेस झाल्यानंतर अनन्या लोणावळ्यात आहे हे प्रमाणित झाले.मुंबई पोलिसांनी तातडीने ही गोष्ट लोणावळा पोलिसांना कळवली आणि अनन्याचे बाबा लोणवळ्याकडे निघाले.पुढचा अर्धा तास अनन्याने कसाबसा काढला.पण त्याच्या काही वेळानंतर काकांना शुद्ध आली.अनन्या पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे हे बघून त्यांनी तिच्यावर बंदुक ताणली.बंदुक बघुन अनन्याने डोळे मिटून घेतले.तिला वाटत होत की आता सगळं काही संपलं.काका गोळी चालवणार इतक्यात तिथे पोलिस आले.पोलिसांना बघुन तिने सुटकेचा श्वास घेतला.पोलिसांनी काकांना ताब्यात घेतले.काही वेळानंतर अनन्याचे बाबा तिथे आले.अनन्याला सुखरुप पाहुन त्यांचा जीव भांड्यात पडला.


      अनन्याने तिला मिळालेल्या एका दिवसाच्या मुदतीत,अत्यंत हुशारीने स्वतःचा जीव तर वाचवलाच पण तिच्या बाबांच्या कष्टाची कंपनीही वाचवली.तिच्या हुशारीमुळे तिच्यासाठी उद्या हा तिचा शेवटचा दिवस न ठरता एक नवजीवन ठरले. 


Rate this content
Log in