नागपंचमी
नागपंचमी


आज सकाळी किराणा दुकानात मी काही घ्यायला गेले होते, तिकडेच एक बाई, तिची सून, छोटीशी नात अशा तिघी आल्या. सून साडीत, ग्रामीण लुक असलेली, सासू 55-60 वयाची असेल. दुकानात सुनेने नागाच्या पुजेचे चित्र मागितले. ते 2 रुपयांचे होते. सासूने लाह्या मागितल्या. छोटी ने हे बघितलं...चॉकलेट मागितलं.
लाह्या नाहीत म्हणून दोघी तिथंच खोळंबून उभ्या, बाहेर पाऊस चालूच होता. मी मग संवाद साधावा म्हणून म्हणलं, मावशी लाह्या नाही मिळत दुकानात आजकाल जाऊ दे ना...
तर कोणताच भाव न दाखवता त्या म्हणाल्या की, तिकडे सगळ्या बायका घेऊन आल्यात की... आम्हालाच मिळना झाल्यात...
सून थोडीशी वरमली होती. तिला हे सगळं मान्य होत नव्हते का माहीत नाही, ती त्यांच्या धाकाला घाबरून माझ्याकडे स्मितहास्य करत लहान मुलीला घेऊन सासूच्या मागे गपचूप निघाली.
ती अगदी पंचविशीतली वाटत होती. तेव्हा वाटलं ही शिकली नसेल का? की वाचनात काही प्रबोधन वगैरे, की सासूला,"नको असू दे' म्हणू शकत नाहीये.
खाऊ म्हणून पौष्टिक म्हणून पोळी, लाह्या, गूळ सगळा खाऊ आणावा, पण ते चित्र घेणे महत्त्वाचे होते का,? आता त्या दगडाच्या नागोबावर दूध वाहणार, लाह्या वाहणार, राडा होणार, हे जर तिला वेळीच समजले तर पुढची पिढी... तिची मुलगीसुद्धा सुधारेल. लाह्या दूध घालून मुलीला खायला घातल्या तर मुलीचे आरोग्य चांगले होईल ही समज समाजात रुजवणे खूप गरजेचे आहे.
सणवार करू देत, ती आपली परंपरा आहे. त्यात शिथिलता आणावी, अट्टाहास नसावा, समाधान असावे, धाक नसावा.
आज काय... किती पूर्वीपासून दूध गरजूंना दान करायला सांगत आलो आहोत आम्ही. त्याचा फार छान परिणामपण दिसून आला. कुठंतरी अंधश्रद्धा कमी होण्यास आपल्या कृतीचा आपल्या लेखणीचा सदुपयोग व्हावा असेच वाटते.
कदाचित काही वर्षे लागतील पण ती छोट्या वयातली सून नक्कीच एक दिवस नागपंचमी धाकाने नाही तर आनंदाने साजरी करेल, आणि तिच्या मुलीला नागाचे महत्व पर्यावरण आणि पूजा याबद्दल नक्कीच छान शिकवेल.