मध्य प्रदेशची भटकंती आणि कान्हा फॉरेस्ट सफारी
मध्य प्रदेशची भटकंती आणि कान्हा फॉरेस्ट सफारी


नुकतीच मध्यप्रदेश प्रवासाहून महाराष्ट्रात निघाले होते. याच प्रवासाबद्दल लिहायला घेतले . मागच्या पोस्ट मध्ये लिहल्याप्रमाणे महिला आणि एकटीने प्रवास याबद्दल लिहायचं असं ठरवलंच होतं. तसे बरेच अनुभव डोळ्यासमोर उभे राहिले. आणि हा तर तसा जुना झालेला मुद्दा असेही वाटले. महिला, मुली स्वतंत्र झाल्यात. प्रवास करू शकतात आणि करतातच. पण, जशी मुलींवर बंधने कमी झाली शिक्षणाचा वा नोकरीसाठी गाव, शहरात, देशात ,देशाबाहेर फिरणे गरजेचे बनले. तरीही बऱ्याच वेळा घरातील महिलेने एकटीने अथवा मैत्रिणीच्या सोबतीने फिरायला ते ही बऱ्याच अंतराचा प्रवास म्हटलं की घरातले काळजीने पाठवायला तयार नसतात. अथवा, स्त्रिया ही नको म्हणतात. त्यातूनही जर ती स्त्री निघालीय प्रवासाला तर काय काळजी घेऊन एन्जॉय करू शकते याचा अनुभव मला सांगायला आवडेल.
परदेश प्रवास असो की आपला देश पर्यटन असो की तिथले वास्तव्य, काम असो की फक्त भटकंती पुरेपूर आनंद घेता आला पाहिजे . अशाच मध्यप्रदेश येथे माझ्या मुलीच्या निमित्ताने जाणे झाले. तेही खोल दाट जंगलात. वास्तव्य आणि अनुभव गमतीजमती आणि तिथली बघितलेली ठिकाणे, सफरी आणि बरेच काही.
मध्यप्रदेश प्रसिद्ध आहे धार्मिक स्थळे आणि मंदिर यासाठी. त्याहीपेक्षा आमचा प्लॅन होता जंगल सफारीचा. तितकेच महत्वाचे आणि समृद्ध असे कान्हा नॅशनल पार्क फॉरेस्ट आणि तिथले वाघ आणि त्यांची अलीकडच्या काळात जतन करून झालेली वाढ. तसेच इतर बारासिंगा आणि इतर जंगल वैभव बघणे हा उद्देश होता. त्यामुळे ओघानेच सर्व व्यवस्था आगाऊ आरक्षित करणे गरजेचे होते. याशिवाय जाणाऱ्या सर्व मैत्रिणीच. त्यातून सर्वांच्या घरी परवानगी, कामे,तारखा जुळवून आणून तयारी केली निघायची. यात महत्वाचा उद्देश आणि मदतीचा वाटा म्हणजे माझ्या मुलीचे फॉरेस्ट परिसरात कामानिमित्त वास्तव्य व तिची भेट होय.
तिची भेट आणि जंगल सफारी या योगामुळे आम्ही भन्नाट प्लॅन केले. आणि निघालो बॅगा भरभरून फिरायला. मध्य प्रदेश म्हटलं की एकीला आठवलं .जंगलसफारी, वाघ, एकीला खजुराहो तर एकीला नर्मदा नदी, मंदिर. आता झाली ना मजा! मग काय सगळंच सर्वांच्या खुशीकरता करायचं ठरवलं.
प्रथम पुणे ते कान्हा असा प्रवास मस्त मजेत करत करत मप्र. मधील कान्हा येथे पोहचलो आणि मस्त सुखद थंडीने, हिरवाईने आनंदी झालो.
पहाटेची सफारी बुकिंग असल्याने लवकरच कॅम्पफायर, गाणी गप्पा ,जेवण खाण उरकून झोपायची व उद्याची तयारी केली. कधी एकदा पहाट होऊन सफारीच्या जिप्सी गाडीत बसू असे सर्वांना झाले. पहाटे मस्त जिप्सी दारात घ्यायला आली. आम्ही थंडीत कुडकुडत चहा पिऊन तिथल्या कुक ने बनवलेला नाष्टा घेवून आणि थंडीमुळे सर्व पॅक असूनही चक्क ब्लॅंकेट घेऊन जीप मध्ये बसलो. सगळीकडे अंधार भुडुक, मुक्की गेटपर्यंतचा प्रवास भन्नाट मजेशीर. तिथून प्रवेशाचे सोपस्कार आटोपून आमच्या गाडीने जंगलात प्रवेश केला. तसा आम्ही मैत्रिणींनी मस्त भरभरून श्वास घेतला.
एका वेगळ्याच दुनियेत, वाघांच्या ,जंगली प्राण्यांच्या दुनियेत निसर्गरम्य, दाट उंच उंच झाडी ,कीटक आणि विविधरंगी पक्षी यांच्या दुनियेची सफर सुरू झाली. तब्बल ४ तास जंगलात फिरायला मिळणार होते. माझी लेक सोबत होती आणि आमच्या या पूर्वी अनेक सफारी झाल्या असल्या तरी माझ्या मैत्रिणींचा सफारीचा पहिला दिवस,अनुभव होता याचा आनंद आम्ही दोघीही घेत होतो. तरीही, आम्हला ही सगळं नव्यानेच भासत होते. जंगलात प्रवेश करताच गोंडस हरिणाने स्वागत केले. त्यानंतर असंख्य कळप बागडणारे हरीण, बारासिंगा, नीलगाय ,सांबर आणि इतर प्राणी हळूहळू दिसायला सुरुवात झाली.
वेध होते ते वाघोबा दिसण्याचे, तोपर्यंत थंडीत प्रचंड कुडकूडून ऊन यायला सुरुवात झालेलं. हळूहळू जंगलाला जाग यायला लागली होताी. कोवळ्या तांबूस सूर्यकिरणांनी जंगल अतिशय मोहक सोनेरी भासते तो नजारा डोळे भरून बघितला. समाधान नाही म्हणून पटापट मोबाईल क्लीक्स घेतले जातात.
वाघोबा कुठे लपून बसले असतील म्हणून हळूवार तीक्ष्ण नजर मागोवा घेऊ लागली. आवाज न करता हा सगळा प्रवास केले गेला. म्हणून शांत जंगल, पशु पक्ष्यांचे आवाज अनुभवायला मिळाले. सबंध प्रवास फार छान असतो भासला. अशातच वाटेत मोरांनी फेर धरला. तर, कुठून आरोळी, आवाज दुमदुमला की मस्त वाटायचे, वाघ जिथे असतो तिथे इतर प्राण्यांचे हाक मारणे सुरू असते. एका विशिष्ट अशा सांकेतिक आवाजात. त्यामुळे तुम्हाला तो कुठे असण्याची शक्यता आहे हे ठरवून गाडी तिकडे नेऊन तो जंगलाबाहेर येण्याची वाट पाहावे लागते. हे सगळं खूप भन्नाट फीलिंग असतं. उत्सुकता आणि भीती ,आपला संयम सगळं एकत्र येऊन आपण अगदी कानाकोपऱ्यात मागोवा घेत राहतो. सोबतीच्या जिप्सीचे चालक guide एकमेकात तो कुठे दिसेल याची चर्चा करत, कोणाला दिसला कोणी मिस केला. आमचेही काही तास असेच मस्त जंगल फिरण्यात गेले. वाटेत दिलेला नाष्टा ठरलेल्या ठिकाणी खाताना मजा आली. तिथून लगेच कोणी सांगितलं, वाघाचे संकेत येत आहेत, लवकर निघा, आणि काय. आम्ही भराभर आवरून जिप्सीत बसून त्या वाघोबाच्या दिशेने निघालो.
क्रमश..