Vrushali Vajrinkar

Others

2  

Vrushali Vajrinkar

Others

म प्र जरा हटके (भाग 4)

म प्र जरा हटके (भाग 4)

2 mins
446


भारताची समृद्धी भारतीय परंपरेने जाणली जाते. तसेच नैसर्गिक संपत्ती विविधता यासाठी खूप माहिती लिहली तरी अपुरीच पडेल म्हणून अनुभवलेल्या काही प्रवासातील सहज आठवलेल्या ठिकाणाविषयी थोडक्यात लिहिण्याचा माझा प्रयत्न आहे.


अमर कंटक या नर्मदा नदीच्या उगम स्थान असलेल्या, भारतीयांच्या भक्तिरसात अखंड वाहणाऱ्या नर्मदामातेच्या पवित्र क्षेत्रावरून प्रसन्न मनाने जबलपूरकडे प्रस्थान सुरू झाले.


जबलपूर मध्य प्रदेशमधील व्यापारी गजबज असणारे राजधानीचे ठिकाण, तसेच तिथल्या एेतिहासिक आणि निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेले शहर म्हणून सुप्रसिद्ध आहेच. शिवाय पुढच्या लांबच्या प्रवासाचा मधला विश्रांती टप्पा म्हणून जाण्याचे ठरवले.


भेडा घाट म्हणून प्रसिद्ध, पर्यटकांनी ओथंबून जाणारे ठिकाण आहे. प्रसिद्ध धुवांधार धबधबा रोप वे आणि तिथला मार्बल रॉक बघण्यासाठी. अतिशय सुंदर असा शुभ्र धवल पाण्याचा प्रचंड मोठा धबधबा कोसळताना बघणे म्हणजे अतीशय विलोभनीय दृश्य होय.

रोप वेमधून खाली पाहताना सुंदर असा नजारा पाहून निसर्गाचे मुक्त हस्ते मिळालेले वरदान किती घेऊ नको असे होते. इतकं छान प्रवाही पाण्याच्या असंख्य लाटा मार्बल संगमरवरी खडकातून वाहताना हिरव्या निळ्या पांढऱ्या रंगांचा अनोखा मिलाप मन प्रसन्न करून जातो. गार हवेत रोप वेचा आनंद घेत घेत आपली तृष्णा तृप्त होते.


तिथेच मार्बल रॉकमधून बोटीने एक अद्भुत सफर घडवली जाते ती वर्णावी तेवढी कमीच, अनुभवणे हाच आनंद! कारण तो एक तास, उंच उंच, रंगीत मार्बलच्या मोठमोठ्या आकारातल्या खडकातून, निश्चल अशा सुंदर पाण्यातून जाताना आपण एखाद्या कोणत्या दुसऱ्या देशात आहोत असाच भास होतो. आणि आपल्या भारतमातेच्या निसर्गाची उधळण पाहून गर्वही वाटतो आपण भारतीय असल्याचा. नावेतून जाताना तिथली माहिती हसत खेळत नावाडी देत असतो आणि आपण मनसोक्त अशा वेगळ्याच भासणाऱ्या बोटिंगचा आनंद घेत असतो.


परतताना, नुकतीच सायंकाळ होत आलेली, सूर्य मावळतीला आणि आम्ही बोटीत मस्त, तो सर्व नजारा दृश्य भारावून जाणारे होते. आजूबाजूचा परिसर सूर्याची किरणे पाण्यावर खडकावर आपला सोनेरी रंग पसरताना जो भास दृश्य जमेल तेवढं कॅमेरात बंदिस्त केलं. शेवटी डोळ्यांच्या, मनाच्या कॅमेरात भरभरून साठलं आहेच त्याची मेमरी कधी कमी झालीच तर हे क्लिक्स उपयोगाला येतील म्हणून सारं...


अतिशय प्रसन्न मनाने सुप्रसिद्ध "चौसष्ठ योगिनी" मंदिराकडे आम्ही दर्शनास गेलो, माझा या मंदिरात जाण्याचा दुसऱ्यांदा योग आला याचेही आनंद समाधान वाटले. अर्धगोलाकार शिल्पकलेचा उत्तम नमुना आणि देवीच्या 64 रूपाचे अप्रतिम दर्शन, प्राचीन मंदिर अद्भुत भासले. अंधार पडत आल्याने वेळ देता आला नाही. वाटेत बरीच भगवान विष्णुची व इतर छान मंदिरे होती. त्यांनाही धावती भेट दिली.


सुप्रसिद्ध जैन मंदिर हेही जबलपूरचे आकर्षण आहे, खरेदीसाठी मोठी बाजारपेठ आहे, तिथल्या साड्या आणि मार्बलच्या कलाकुसरीच्या वस्तू, मिठाई असे सगळं बरेचसे घेण्यासारखं आहे. आमची पुन्हा परतीला जबलपूर भेट होतीच म्हणून फारसे काही खरेदी न करता आम्ही विश्रांती घेतली, ती पुढच्या जरा हटके ठिकाणी जाण्यासाठी. मनात उद्याची स्वप्न रंगवत आम्हाला गाढ निद्रेत जायला काहीच वेळ लागला नाही.


(भौगोलिक माहिती आजकाल सगळीकडे एका क्लिकवर मिळते म्हणून लिहिणे टाळली आहे.)

क्रमशः


Rate this content
Log in