मनीच्या कानी भाग -१०
मनीच्या कानी भाग -१०


हाय मनी,
आज कॉफी पीत टेरेस वर बसले होते . एक कबूतर सगळ्या कुंड्यांमधून बागडत होतं . वाटलं, खरच त्याच्या पायाला चिट्ठी बांधून तुला पाठवावी आणि म्हणावं कबूतर जा ..जा..जा.. तुला खूपच विनोदी वाटलं ना ? खरच कबूतर यूकेच्या थंडीत मायग्रेट करत नाही, त्याचा वेग इतका नाही वगैरे शास्त्रीय शक्यता त्या क्षणापुरत्या माझ्यातल्या वेड्या आईने गुंडाळून ठेवल्या होत्या. ई मेल हे कबूतरापेक्षा वेगाने जाऊ शकत हे माहीत आहे ग मला. पण हे मन आहे ना , ते कधी कधी असं धाव घेत तुझ्याकडे. आणि या मनाचा वेग कोणालाच मोजता आला नाहीये आजवर.
मनोजवं मारुततुल्य वेगम
जितेन्द्रियं बुद्धीमतां वरिष्ठ ...
लहानपणी पाठ केलेलं हनुमान स्तोत्र , त्याचा अर्थ मोठं झाल्यावर कळतोय . वाऱ्याच्या वेगाने जाणार मन , सर्व इंद्रियांवर सत्ता गाजवणार हे मन. हे मन दृश्यमान नाही तरी याचा व्यापार मोठा, याचा गलबला मोठा.या मनाने कसं वागायचं याचे उपदेश संतानी केले. संत रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले. हे मन ताब्यात असलं ना की माणसाने आयुष्याची अर्धी लढाई जिंकली म्हणून समजावं.
मन क्यू बह्का रे बह्का.. एक सखी दुसऱ्या सखीच्या मनाची चुगली करतेय. बहकतय तिचं शरीर , पण आळ आलाय मनावर. या मनाच्याच तर हातात आहेत , शरीराचे अव्यापारेषु व्यापार. चुकत ते शरीर पण चुका करून घेत ते मन. सर्व कवींना , लेखकांना या मनावर लिहावसं वाटलं. कारण सर्वांचं नियंत्रण करणार हे मन मोजता येत नाही, हातात पकडता येत नाही. त्याला चाबकाचे फटके मारता येत नाहीत.बहिणाबाई ना पण हा प्रश्न पडला.
मन येवढ येवढ जसा खाकसचा दाना
मन केवढ केवढ आभायात बी माईना .
मन म्हटलं तर अति सूक्ष्म आहे , म्हटल तर अतीविशाल आहे.दादाकडे गेलेलो तेव्हा वॉशिंग्टनला तेव्हा पाहिलं , एयर एंड स्पेस म्युझिअम मध्ये अवकाशात जाऊन आलेली मोठमोठाली विमानं आणि रॉकेट्स ठेवली आहेत. पण त्यांना बनवणारी बुद्धी आणि त्या बुद्धीला दिशा देणारं मन नाही मांडता आलंय त्यांना प्रदर्शनात. गंमत आहे ना ?
या मनावर मणभर बोलता येईल इतकं साचलंय मनात, पण मनाने मनभरून बोलायला तू समोर हवी आहेस. अशी मी हळवी झाले की तू माझी आई होतेस . चल ,तुला रडवत नाही.
बाय मन से.
लव यू .
मम्मा